You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पैशाची गोष्ट : असा सुरक्षित ठेवाल तुमचा बँकेतला पैसा
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी
सध्या सगळीकडे नीरव मोदी आणि त्यांनी केलेला PNB घोटाळा गाजतो आहे. पण, त्याचवेळी रिझर्व्ह बँकेनं सादर केलेला एक अहवालही लक्ष वेधून घेणारा आहे.
नीरव मोदींचा घोटाळा 11,500 कोटी रुपयांचा आहे. पण मागच्या तीन ते चार वर्षांत एक लाखांपेक्षा जास्त रकमेची अफरातफर झालेले एकूण 25,800 बँक घोटाळे आहेत.
सर्वसामान्यांशी संबंधित घोटाळे
25,000पेक्षा जास्त झालेले हे घोटाळे आहेत अफरातफरीचे. म्हणजे कधी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डाची चोरी आणि ऑनलाईन गैरव्यवहार करून खात्यातले पैसे गायब करणं किंवा तुमच्या कार्डवरून ऑनलाईन शॉपिंग करणं असे हे फसवणुकीचे प्रकार आहेत.
रिझर्व्ह बँकेची आकडेवारी बघितली तर अशी मागच्या चार वर्षांतली प्रकरणं एकत्र करून लोकांना किमान 2 अब्ज रुपयांचा चुना लागला आहे.
बनावट वेबसाईट
इथं ऑनलाईन चोर बँकेची बनावट वेबसाईट बनवतो. ही साईट दिसते मूळ साईटसारखीच. साईटच्या स्पेलिंगमध्ये एखाद्या अक्षराचा फरक असतो.
आपण नजरचुकीनं ही साईट उघडतो. त्यात आपली माहिती भरतो. आणि बँक अकाऊंट, पासवर्ड सारखी गोपनीय माहिती मग चोरांच्या हातात पडते.
त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना वेबसाईट नकली तर नाही ना याची नीट खात्री करून घ्या.
ATM कार्ड
ATM चा गैरफायदा दोन प्रकारे घेतला जातो. एकतर तुमचं कार्ड चोरून मग फोनवर तुमच्याकडून पिन नंबर घेणं.
आणि दुसरं म्हणजे एटीएम मशिनमध्ये फेरफार करून. यात मशिनमध्ये तुम्ही जिथे कार्ड आत सरकवता तिथं स्किमर बसवला जातो.
पिन नंबर टाईप करतो तिथे गोंद लावलेली असते. त्यातून त्यांना पिन नंबरही कळतो. आणि स्किमरमुळे डेबिट कार्डावरचा मॅग्नेटिक डेटा अलगदपणे चोरला जातो.
तेव्हा एटीएम सेंटरवर गेलात की स्किमर दिसत नाही ना आणि चिकटसा पदार्थ किपॅडवर नाही ना हे निश्चितपणे पाहा.
खोटे फोन आणि ईमेल
खोटे फोन कॉल आणि ईमेलपासूनही सावध राहा. कार्डावरचा तुमचा सीवीवी नंबर किंवा ओटीपी नंबर तुमच्याकडे मागितला जातो. आणि त्यानंतर तुमच्या अकाऊंटवरचे पैसे गायब होतात.
ही पद्धत अलीकडे सर्रास वापली जाते. तेव्हा फोनवर तुमची बँकेविषयीची माहिती उघड करू नका.
वाय-फाय नेटवर्क
लोकल ट्रेन, मॉल किंवा एकूणच खुलं असलेलं वाय-फाय नेटवर्क वापरत असाल तर तुम्हाला बँकेचे व्यवहार करताना सावध राहण्याची गरज आहे.
कारण, वाय-फायच्या माध्यमातूनही तुमची माहिती चोरांना कळत असते. मोफत डेटा मिळतो म्हणून आपण सार्वजनिक वाय-फायचा उपयोग करतो.
पण, अशावेळी जास्त सावध राहण्याची गरज आहे.
काय काळजी घ्याल?
- साईटवर सीव्हीव्ही नंबर टाकताना तो '***' असा येईल असं पाहा. हा क्रमांक इतरांना दिसता कामा नये. नाहीतर ही साईट खोटी असल्याचं समजून चाला.
- कुठलीही ऑनलाईन सेवा वापरल्यावर त्याचा SMS किंवा ईमेल अलर्ट देण्याची सोय असते. या सेवेचा जरुर फायदा घ्या. निदान चोरी झाल्याचं लगेच समजेल तरी.
- क्रेडिट किंवा डेबिट कार्डाचा गैरवापर झाला असल्यास त्वरित कार्ड बंद करा. बँकेला लेखी तक्रार करा. अशा तक्रारीची 30 दिवसात चौकशी करणं बँकेसाठी बंधनकारक आहे.
- बँकेकडे किंवा इतर वित्तीय संस्थेकडे केलेल्या तक्रारीला उत्तर मिळालं नाही तर जिल्हा ग्राहक फोरम किंवा ग्राहक न्यायालयात तुम्ही दाद मागू शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)