You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे : मंत्रिमंडळ विस्तारावर संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे समर्थकांची नाराजी #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. मंत्रिमंडळ विस्तारावर संग्राम थोपटे, प्रणिती शिंदे समर्थकांची नाराजी
उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नाराज समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली. लोकमतनं ही बातमी दिलीये.
भोर मतदारसंघातून थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वीही त्यांच्या वडिलांनी याच भागातून राजकीय ठसा उमटवला आहे. त्यामुळे थोपटे गटाला यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. ती पूर्ण न झाल्यानं संतप्त समर्थकांनी काल भोरमध्ये आंदोलन करत घोषणाबाजी केली होती.
मंगळवारी (31 डिसेंबर) संध्याकाळी 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर भागातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली.
दरम्यान, या प्रकरणावर थोपटे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटलं, "या प्रकाराची मला माहिती नव्हती, पक्षाचा निर्णय मान्य आहे. कोण कार्यकर्ते आहेत, याची मीही माहिती घेतोय. मला स्वतःला पक्षश्रेष्ठींनी दिलेला निर्णय मान्यच आहे आणि कायम राहील."
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. यामध्ये काँग्रेसच्या सोलापूर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे आणि माजलगावचे काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नावाचा समावेश आहे.
2. अयोध्या: मशिदीसाठी 5 जागांची पाहणी; सर्व पंचक्रोशीबाहेर
अयोध्या प्रशासनानं मुस्लीम पक्षकारांना मशिदीसाठी दिल्या जाणाऱ्या 5 जमिनींची पाहणी केली आहे. या पाचही जागा अयोध्या पंचक्रोशी परिक्रमेच्या बाहेर आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.
पंचक्रोशी परिक्रमा म्हणजे 15 किलोमीटरचा तो परिसर आहे, ज्याला पवित्र क्षेत्र म्हटलं जातं. सध्या प्रशासनातर्फे पाहणी केल्या गेलेल्या या पाचही जागा पंचक्रोशीबाहेर आहेत.
अयोध्या प्रशासनानं मशिदीसाठी ज्या जागांची पाहणी केली आहे, त्या मलिकपुरा, मिर्झापूर, शमशुद्दीनपूर आणि चांदपूर गावातील जमिनी आहेत. या सर्व जमिनी अयोध्येपासून निघणाऱ्या आणि वेगवेगळ्या शहरांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं 9 नोव्हेंबरला अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत निकाल दिला. त्यानुसार वादग्रस्त जमीन रामलल्ला पक्षकारांना देण्यात आली, तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी अयोध्येतच अन्य ठिकाणी 5 एकर जमीन देण्याचे आदेश दिले.
3. नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार
नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रशासनाकडून भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीये.
असं असलं तरी, मुंबई लोकलच्या तिकीटदरात कोणतीही वाढ झालेली नाही.
उद्यापासून रेल्वेची भाडेवाढ लागू होणार आहे. एसी आणि नॉन-एसी मेल आणि एक्स्प्रेसवर भाडेवाढ केली जाणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार नॉन एसी सेकंड क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा, स्लीपर क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा आणि फर्स्ट क्लाससाठी प्रत्येक किलोमीटरमागे एक पैसा अशी भाडेवाढ करण्यात आलीय.
4. देशात 110 वाघ, 491 बिबट्यांचा मृत्यू
2019 मध्ये देशात 110 वाघांचा, तर 491 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, Wildlife Protection Society of India (WPSI) या संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
2018 मध्ये 500 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. पण, रस्ते आणि रेल्वे अपघात प्राण गमावणाऱ्या बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असंही यातून स्पष्ट होतं. 2018मध्ये 104 वाघांचा मृत्यू झाला होता.
2019मध्ये मध्यप्रदेशात सर्वाधिक 29, त्याखालोखाल महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे.
5. CCA वर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला - रवीशंकर प्रसाद
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविषयी (CCA) विधेयक पारित करण्याचा अधिकार फक्त देशाच्या संसदेला असून केरळसहित अन्य कोणत्याही राज्याला नाही, असं मत केंद्रीय न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं आहे. NDTV इंडियानं ही बातमी दिलीये.
CCA रद्द करण्यासंदर्भातलं एक विधेयक केरळ विधानसभेनं पारित केल्यानंतर रवीशंकर प्रसाद यांनी त्यावर भाष्य केलं.
ते म्हणाले, "या कायद्यामुळे कुणालाही घाबरण्याची गरज नाहीये. काँग्रेसनं हे पाऊल उचचलं असतं, तर ठीक समजलं गेलं असतं, पण मोदी-शाहांनी केलं तर याला संकट म्हटलं जातं. हा दुतोंडीपणा आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)