You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजी भिडे : गांधीबाधा नामशेष करणारा मंत्र शिवाजी आणि संभाजी महाराज #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. गांधीबाधा हा देशाला झालेला रोग - संभाजी भिडे
"देशातील इंग्रजांचे राज्य घालवण्यासाठी क्रांतिकारकांनी आयुष्याचा उदंड होम केला. परंतु आमच्या देशाला स्वातंत्र्य 'पूज्य' महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामुळे मिळाले. हा 'गांधीबाधा' देशाला लागलेला रोग आहे," असं वक्तव्यं वक्तव्यं शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केलं आहे. सकाळनं ही बातमी दिलीये.
म्लेंच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधीबाधा नामशेष करणारा मंत्र शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहे, असंही भिडे यांनी म्हटलं.
शिवप्रतिष्ठानच्या वतीनं CAA आणि NRC च्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
त्यांनी म्हटलं, "CAA आणि NRC कायदा देशहिताचा आहे. कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आणि इरसाल आहेत. हिंदू माणसाला आत्मोद्धार कळतो, पण राष्ट्रोद्धार कळत नाही. व्यक्तिगत पातळीवर जगात तोड मिळणार नाही, इतका हिंदू माणूस चांगला आहे. पण, राष्ट्र, समाज आणि धार्मिक पातळीवर तो पराभूत झालेला आहे."
2. 'मंत्री आहोत याचे भान ठेवा, उगाच पाण्याच्या टाकीवर चढू नका'
"आपण आता मंत्री आहात याचे भान ठेवून वागा. उगाच कोणत्याही विषयावरून पाण्याच्या टाकीवर चढण्याचं आंदोलन करू नका," असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर झालेल्या बैठकीत दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"आपण वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आलो असलो, तरी आपल्याला जनतेनं निवडून दिलं आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्याबाबत आपण सगळे एक आहोत. एक कुटुंब म्हणून आपल्याला काम करायचं आहे. एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली, तरी राज्यासाठी हिताचे काय याचाच विचार आपल्याला करायचा आहे याचं भान सर्वांनीच ठेवू या," असं उद्धव यांनी म्हटलं.
2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणू, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
याविषयी ते म्हणाले, "आपण आता मंत्री आहात याचे भान ठेवून वागा. उगाच कोणत्याही विषयावरून पाण्याच्या टाकीवर चढण्याचं आंदोलन करू नका. आता तुम्हाला कोणी खाली उतरवणार नाही. त्यामुळे कर्जमाफी तसंच सरकारचे अन्य निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम करा."
3. पॅन-आधार कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ
पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारनं मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 होती. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
आयकर कायदा 1961 मधील तरतूद 139AA नुसार, पॅन कार्ड हे आधार कार्डाशी लिंक असायला हवं. यासाठीची मुदत आता 31 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 करण्यात आल्याची माहिती CBDT (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस्) ने अधिकृत ट्वीटर हँडलवर दिली आहे.
ही मुदत केंद्र सरकारनं आठव्यांदा वाढवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निर्णय दिला होता की, आधार कार्ड हे आयकर परतावा भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळण्यासाठी बंधनकारक असेल.
4. CAA च्या समर्थनार्थ मोदींची मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ एक मोहीम सुरू केली आहे. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केलीये.
या अभियानाचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सोमवारी (30 डिसेंबर) अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हीडीओ पोस्ट केला.
मोदींनी ट्वीट केलं की, नागरिकत्व दुरूस्ती कायद्याशी निगडीत बाबींची स्पष्ट व्याख्या आणि इतर काही गोष्टी सद्गुरूंकडून ऐका. त्यांनी अनेक ऐतिहासिक संदर्भांचा हवाला दिला आहे. तसंच आपली बंधुत्वाची संस्कृती उत्तम प्रकारे समजावून सांगितली आहे. याचसोबत स्वार्थासाठी पसरवण्यात आलेल्या काही समूहांच्या गोष्टींचं सत्य सर्वांसमोर मांडलं आहे."
पंतप्रधानांच्या खासगी वेबसाईटच्या ट्विटर हॅन्डलवरही एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, "नागरिकत्व दुरूस्ती कायदा हा अन्याय झाल्यामुळे भारतात शरण आलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. तसेच यामुळे कोणत्याच व्यक्तीचं नागरिकत्व धोक्यात येणार नाही."
हा मेसेज 'इंडिया सपोर्ट्स सीएए' या नावाच्या हॅशटॅगने पोस्ट करण्यात आला आहे.
5. जनरल रावत पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'
मावळते लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची सोमवारी (30 डिसेंबर) 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'पदी नियुक्ती करण्यात आली. लोकमतनं ही बातमी दिलीये.
लष्करप्रमुखपदाची कारकीर्द संपवून मंगळवारी (31 डिसेंबर) निवृत्त झाल्यानंतर ते पहिले 'सीडीएस' म्हणून सूत्रं स्वीकारतील.
लष्कर, हवाई दल आणि नौदलात समन्वय साधण्यासाठी आतापर्यंत 'जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी' होती. तिन्ही दलांच्या प्रमुखांतील ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्यास ते पद दिलं जायचं. याऐवजी 'सीडीएस' पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
याशिवाय संरक्षण मंत्रालयात मिलिटरी अॅफेअर्स विभागही स्थापन केला आहे. सीडीएस संरक्षणमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)