मंत्रिमंडळ विस्तार : उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची 9 वैशिष्ट्यं

महिनाभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा सोमवारी (30 डिसेंबर) मंत्रिमंडळ विस्तार झाला. महिनाभरापासून सहा मंत्र्यांच्या भरवशावर सरकारचा गाडा हाकला जात होता.

विस्तारात एकूण 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे एकूण मंत्र्यांची संख्या आता 42 झाली आहे. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाची काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकू या.

1. शिवसेनेने ज्येष्ठ नेत्यांना डावललं

आजच्या विस्तारात शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. मागच्या सरकारमध्ये असलेल्या रामदास कदम, दिवाकर रावते, यासारख्या अनेक नेत्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्यासारखी ज्येष्ठ यावेळी मंत्रिमंडळात असली तरी अनेकांची संधी यावेळी हुकली आहे. शिवसेनेनं या विस्ताराच्या निमित्तानं पक्षातील भाकरी फिरवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे.

दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, दीपक केसरकर या ज्येष्ठानं यावेळी शिवसेनेनं संधी दिलेली नाही. तर दुसरीकडे राजेंद्र पाटील यड्रावकर, शंभूराज देसाई, संदिपान भुमरे या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसमधून आलेल्या अब्दुल सत्तारांनाही सेनेनं संधी दिलीय. शिवसेनेनं ज्यांना डावलले आहे ते रावते, कदम, सावंत हे ज्येष्ठ नेते विधान परिषदेवर निवडून आलेले होते तसेच ते मुंबई-कोकण पट्ट्यातील होते.

ज्यांना आता संधी दिली आहे, त्यामध्ये बहुतेक नेते मुंबईबाहेरचे आहेत तसेच ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत. शिवसेनेनं मंत्रिपद देत असताना पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याचा हेतू ठेवलेला दिसत आहे. तर लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या औरंगाबादमध्ये पक्ष अधिक बळकट करण्याचा विचार केलेला दिसत आहे.

2. शिवसेनेच्या कोट्यातून दोन अपक्षांना मंत्रिपदं, तरी काही अपक्ष नाराज

शिवसेनेच्या कोट्यातून बच्चू कडू आणि शंकरराव गडाख यांना संधी देण्यात आली असली तरी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मात्र नाराज झाले आहेत.

घटकपक्षांना शपथविधी निमंत्रण नाही याची भविष्यात किंमत चुकवावी लागेल असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केलं आहे.

3. मंत्रिमंडळात शिवसेनेची एकही महिला मंत्री नाही

शिवसेनेकडून एकही महिला नसणं हे आजच्या विस्ताराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.

मात्र शिवसेनेकडून एकही महिला नाही. विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हेंना संधी मिळालेली नाही. तसेच विधानसभेवर निवडून आलेल्या दोन महिला आमदारांचाही विचार झालेला नाही.

4. घराणेशाहीचा प्रत्यय

आजच्या विस्तारात अनेक मोठ्या नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. त्यात सगळ्यांत जास्त चर्चा आदित्य ठाकरेंच्या नावाची झाली. ठाकरे घराण्यातील पहिलाच मंत्री आणि मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवडणुकीच्या काळात आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही पासून आज त्यांनी घेतलेली मंत्रिपदाची शपथ हा प्रवास रंजक आहे.

पुढच्या काळात आदित्य ठाकरे हे आवाहन कसं पेलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आदित्य ठाकरेंबरोबर सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, पतंगराव कदम यांचे सुपूत्र विश्वजीत कदम, जयंत पाटील यांचा भाचे प्राजक्त तानपुरे, विलासराव देशमुख यांचा मुलगा अमित देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. यातील बहुसंख्य मंडळी तरुण आहेत.

5. अजित पवारांचे समर्थक मोठ्या प्रमाणात

महिनाभरापूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

त्याबरोबरच दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे, राजेश टोपे या आपल्या समर्थकांना मंत्रिपद मिळवून देण्यातही अजित पवार यशस्वी ठरले आहेत.

6. चार मुस्लिम नेत्यांना संधी

त्यांनी नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ या दोन मुस्लीम नेत्यांना मंत्रिपदं दिली आहेत. गेल्या मंत्रिमंडळात एकही मुस्लीम मंत्री नव्हता. तर या मंत्रिमंडळात चार मुस्लीम मंत्री आहेत. मलिक आणि मुश्रीफ यांच्यासोबतच काँग्रेसकडून अस्लम शेख यांना तर शिवसेनेकडून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आली आहे

7. काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना डावललं?

काँग्रेसच्या यादीतील ठळक मुद्दा म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिपद न मिळणे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिपद न मिळण्यामागे त्यांना राज्यात पक्षांतर्गत पाठिंबा नसणे हे कारण असल्याचं मानलं जातंय.

तसंच आता मंत्रिपद न दिल्यानं त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे

8. संजय राऊत नाराज?

संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राऊत आज शपथविधी सोहळ्याला उपस्थितही नव्हते. विद्यमान महाविकास आघाडीच्या बांधणीत संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती.

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी सांगितलं की "मी नाराज असल्यामुळे आलो नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मी सामनाच्या कार्यालयात काम करत होतो."

"मी आणि माझ्या कुटुंबानं सरकार बनवण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. ही अफवा कुणीतरी पसरवली आहे. मी नाराज नाही. तीन पक्षांचं हे सरकार असल्याने आमच्या वाट्याला कमी मंत्रिपदं आली आहे," असं राऊत म्हणाले.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी कधीच काही मागितलेलं नाही. माझा भाऊ सुनील याने देखील मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केलेली नाही. आम्ही मागणारे नसून आम्ही पक्षाला देणाऱ्या लोकांपैकी आहोत," असं राऊत म्हणाले.

9. राज्यपाल भडकले

महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शपथविधीवर नाराज होण्याची कोश्यारी यांची ही पहिलीच वेळ नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सात सदस्यांनी शपथ घेतली तेव्हा राज्यपाल कोश्यारी नाराज असल्याची चर्चा रंगली होती.

त्यावेळी आमदारांनी राज्यपालांनी शपथ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपापाले शीर्षस्थ नेते, देवदेवता यांचं स्मरण केलं. त्यावेळी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं तर कोणी बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचं नाव घेतलं. शपथविधीच्या पुढील कार्यक्रमांमध्ये असं न करण्याची सूचना राज्यपालांनी केली होती.

राज्यपालांच्या सूचनेनंतरही के.सी. पाडवी यांनी ठरवलेल्या वाक्यांव्यतिरिक्त अन्य वाक्यं उच्चारली. यामुळे राज्यपाल कोश्यारी नाराज झाले आणि त्यांनी पाडवी यांनी नव्याने शपथ दिली.

के. सी. पाडवी यांच्या शपथविधीदरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भडकले. काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार के.सी.पाडवी यांच्या शपथविधीदरम्यान राज्यपालांनी त्यांना हटकलं. शपथ घेण्यासाठी जी वाक्यं देण्यात आली आहेत तीच वाचा असं राज्यपालांनी पाडवी यांना सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी पाडवी यांनी पुन्हा शपथ दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)