You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA-NRC आंदोलन: उत्तर प्रदेश पोलिसांनी माझ्या मुलाला ठार केलं - महिलेचा आरोप
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी प्रतिनिधी, लखनौहून परतल्यानंतर
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून निदर्शनं सुरू आहेत.
या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन शेजारील राष्ट्रांमधून भारतात आलेल्या बिगर-मुस्लीम अवैध प्रवाशांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार असल्याचं सत्ताधारी भाजपचं म्हणणं आहे.
या सुधारित कायद्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 20 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील बहुतांश मृत्यू आणि अटक उत्तर प्रदेशात झाले आहेत.
निदर्शकांवर अधिक बळाचा वापर आणि मुस्लिमांच्या घरात तोडफोड केल्याचे आरोप उत्तर प्रदेश पोलिसांवर करण्यात आले आहेत.
पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र राज्यातून येणारे व्हीडिओ वेगळीच कहाणी सांगत आहेत.
कानपूरमधील निदर्शनाच्या एका व्हीडिओत एक पोलीस अधिकारी निदर्शकांवर गोळ्या झाडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तर मुजफ्फरनगरमधील निदर्शनांच्या एका व्हीडिओमध्ये पोलीस निदर्शकांवर जोरदार लाठीचार्ज करत असल्याचं दिसतंय. एका व्हीडिओत पोलीस एका वृद्धाला मारहाण करत असल्याचं दिसतंय.
मेरठमध्ये पोलीस मुस्लीम समाजाच्या दुकानांमध्ये लावलेले CCTV कॅमेरे तोडत असल्याचं दिसतं.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांशी संबंधित व्हीडिओ राज्यात मुस्लीम निदर्शकांसोबत पोलिसांच्या वर्तणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.
आतापर्यंत राज्यात 19 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हे सर्व सामान्य नागरिक आहेत. यातील अनेकांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे. 28 वर्षांचे मोहम्मद मोहसीन यांचा मृत्यू छातीवर गोळी लागल्याने झाला आहे.
'मोहसीन निदर्शनासाठी गेला नव्हता'
मोहसीन निदर्शनांमध्ये भाग घ्यायला गेलेला नव्हता, असं त्यांची आई नफीसा परवीन म्हणतात. तो गुरांसाठी चारा घेण्यासाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही, असं त्या म्हणतात.
मोहसीनला एक छोटं बाळही आहे. नफीसा परवीन म्हणतात, "आम्हाला काहीही माहिती नाही. आम्हाला फक्त न्याय हवा. पोलिसांनी त्याला ठार केलं. त्याच्या मागे त्याच्या बाळाचा सांभाळ कोण करणार?"
सुरुवातीला यूपी पोलिसांनी सांगितलं की त्यांनी गोळीबार केलाच नाही. मात्र, पोलिसांमधल्या काहींकडे बंदुका होतं, असं निदर्शकांचं म्हणणं आहे. मात्र, आपण गोळीबार केल्याचं पोलिसांनीही मान्य केलं.
बीबीसीने एका अशा कुटुंबाची भेट घेतली ज्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी रात्रीच्या अंधारात त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली.
हुमायरा परवीन सांगतात की कपाटात पैसे आणि दागिने होते. ते रात्री लुटून नेले.
त्या म्हणतात, "आमच्या सामानात काही दागिने होते आणि टिनच्या डब्यात पैसे ठेवले होते. आता सगळे चोरी झाले. त्यांच्यासोबत साध्या कपड्यात लोकं होती. त्यांनी आम्हाला खोलीबाहेर जायला सांगितलं. ते म्हणाले लवकरच आमचं घर त्यांचं होणार आहे. आम्ही देश सोडून निघून जावं."
हुमायरा विचारतात, "आम्ही मुस्लीम आहोत म्हणून काय झालं. भारतात राहण्याचा आम्हाला अधिकार नाही का?"
बीबीसीच्या टीमने मोहल्ल्यातला लोकांशी बातचीत केली. जवळपास सगळ्यांनीच हा आरोप केला की त्यांच्या घरात तोडफोड करून लुटालूट करण्यात आली.
अनेकांनी सांगितलं की पोलिसांचं वर्तणूक आणि नवा कायदा दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या हिंदू राष्ट्रवादाच्या अजेंड्याचा भाग आहेत.
सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशातल्या मुस्लिंमावर काहीही परिणाम होणार नाही, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. हिंसाचार निदर्शकांकडूनच होत असल्याचा सरकारचा आरोप आहे.
भाजप नेते आणि मुजफ्फरनगरचे खासदार संजीव बालयान म्हणतात, "पन्नास हजार माणसं होती. कदाचित भारतात पन्नास हजार माणसं कधीही एकत्र आलेली नव्हती. जी मोटरसायकल समोर यायची तिला पेटवून देण्यात येत होतं. मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. मी घटनास्थळी स्वतः उपस्थित होतो."
"फुटेजमध्ये जे लोक गोळीबार करताना किंवा दगडफेक करताना स्पष्ट दिसत आहेत, त्यांना पोलिसांनी अटक करू नये का?"
"पोलिसांनी आधीच स्पष्ट केलं आहे आणि मीही स्पष्ट केलं आहे की निदर्शनांमध्ये सहभागी लोकांविरोधात कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, ज्यांनी दगडफेक केली, सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं, गाड्या पेटवल्या आणि गोळीबार केला आणि ज्या लोकांचे व्हीडिओ आहेत, केवळ त्याच लोकांवर कारवाई करण्यात येईल. त्यांना सोडलं जाणार नाही."
गेल्या काही दिवसात राज्यात निदर्शनांनंतर जे काही दिसलं त्यानंतर आता तिथल्या मुस्लीम समाजाला त्याच्या भविष्याची चिंता भेडसावत आहे.
ही काळजी मिटवण्यासाठी सरकार सोशल मीडियावर सुधारित नागरिकत्व कायद्याशी संबंधित माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र, हा कायदा लागू होण्याआधी जे आरोप पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्यावर झाले आहेत यावरून कायद्याचा परिणाम दिसू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
देशात आता धर्मावरून ध्रुवीकरण वाढतंय. राज्यातील अनेक भागांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि लोकांचा संतापही आतल्याआत धुमसतोय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)