You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली आग : 'मी 3 ते 4 जणांचा जीव वाचवला, पण माझ्या भावाला वाचवू शकलो नाही'
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"माझा भाऊ माझ्यापासून दूर जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं. तो प्रत्येक गोष्ट मला विचारून करायचा. आग लागल्यावर त्यानं मला म्हटलं, दादा मला वाचव. पण मी त्याला वाचवू शकलो नाही."
दिल्लीतल्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती फोनवर बोलत होती. इतर दोन जण त्यांना सावरत होते. ज्या कारखान्यात रविवारी (8 डिसेंबर) सकाळी आग लागली होती, तिथंच या व्यक्तीचा भाऊ बबलूसुद्धा काम करत होता.
घटनास्थळी पोहचूनही आपण भावाला वाचवू शकलो नाही, याचं दुःख बबलू यांचे भाऊ मोहम्मद हैदर यांना आहे.
हैदर सांगतात, "मी तिथं पोहोचलो, तेव्हा कुणीतरी म्हटलं, की तुझ्या भावाला बाहेर काढलं आहे. त्यामुळे माझं टेन्शन कमी झालं. मी 3 ते 4 लोकांना वाचवलं, पण माझा भाऊ मात्र आतच होता. मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याला भेटलो ते शवागारात."
शेजारीच बसलेली एक व्यक्ती जड स्वरात म्हणाली, "बबलू आपल्यातून गेला. राजू आणि तौकीरसुद्धा."
एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये अनेक जण असे आहेत जे घटनेची माहिती मिळताच नातेवाईंकाच्या शोधात आले होते. ही मंडळी फोन करून घरच्यांना माहिती देत होती.
सगळीकडे सुजलेले डोळे, उतरलेले चेहरे आणि आवाजातील वेदना जाणवत होत्या. आगीत मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांना इथंच आणण्यात आलं होतं.
'ज्याच्याकडून काम शिकायचं होतं, तोच नाही राहिला'
28 वर्षांचे मोहम्मद अफसाद कारखान्यात जॅकेट शिवायचं काम करत होते. त्यांचे लहान भाऊ त्यांच्याकडून काम शिकण्यासाठी दिल्लीत आले होते.
पण, अफसाद यांचा कारखान्यातील आगीत मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांचे लहान भाऊ त्यांना भेटायला पोहोचले.
त्यांनी म्हटलं, "आम्हाला आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणायला सांगितलं आहे. आम्हाला ते घरून मागवावं लागेल."
"3 दिवसांपूर्वीच तो मला भेटायला आला होता. सोमवारी (9 डिसेंबरला) तो घरी जाणार होता. तिकीटही काढलं होतं. त्यासाठी माझ्याकडून काही सामान घेण्यासाठी आला होता. रविवारी मी त्याच्यासाठी काही खरेदी करणार होतो," ते पुढे सांगतात.
"त्याच्या घरी आई, वडील, बहिणी, पत्नी आणि 2 मुलं आहेत. सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून होता."
हॉस्पिटलमधल्या मोहम्मद सद्दामच्या काकांच्या मुलासोबतही हेच झालं आहे. त्यांना फोनवरून ही घटना समजली.
सद्दाम स्वत: चांदणी चौकात चष्मा दुरुस्तीचं दुकान चालवतात.
"कारखान्यात पोहोचल्यानंतर मी त्याचा मृतदेह पाहिला. त्यांना आताच एक मुलगा झाला आहे, ज्याचा चेहराही अजून त्यानं पाहिला नव्हता. तो सोमवारी घरी जाणार होता. पण जाऊ शकला नाही. घरी कमावणारा तो एकटाच होता," सद्दामनं सांगितलं.
त्यांनी म्हटलं, "आम्हाला रेशन कार्ड आणायला सांगितलं जात आहे. इथं आधार कार्ड होतं, पण ते आगीत जळालं आहे. आता घरी जाऊन रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे की नाही, हे पाहावं लागेल."
एका कुटुंबातील दोघं गेले
मोमीना आणि रुख्साना यांचे दोन भाऊ या घटनेत बळी पडले आहेत.
बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील नरियारमधील हे कुटुंब दिल्लीतच वास्तव्याला आहे. एका भावाचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्याची अजून भेटही झालेलं नाही, असं त्या सांगतात.
"दोघं भाऊ जॅकेट शिलाईचं काम करत होते. महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवायचे. त्यांच्या कमाईवर घर चालत होतं. कुटुंबात या दोन भावांव्यतिरिक्त 4 बहिणी आहे, ज्या पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून आहेत."
आता पैशाअभावी या दोघांचे मृतदेह बिहारला घेऊन जाणं शक्य नाही. मदत न मिळाल्यास आम्ही ते गावाकडे नेऊ शकणार नाही, असं मोमीना आणि रुख्साना सांगतात.
'कुटुंबाकडे लक्ष दे'
हॉस्पिटलमध्ये उपस्थित शोभित कुमार यांनी सांगितलं, की त्यांचे मित्र मोहम्मद मुशर्रफ या कारखान्यात काम करत होते. 32 वर्षांच्या मुशर्रफ यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. ते शिलाईचं काम करतात. सकाळी त्यांचं फोनवर बोलून झालं होतं.
"त्यांनी मला सांगितलं, की कारखान्यात आग लागली आहे. माझ्या कुटुंबाची काळजी घेशील," असं शोभित यांनी सांगितलं.
शोभित यांनी त्यांच्या मित्राला कारखान्यातून उडी मारून बाहेर पडायला सांगितलं, पण तसं करू शकत नसल्याचं मोहम्मद मुशर्रफ यांनी म्हटलं.
"जीव वाचवायचा काही पर्याय तिथं उपलब्ध असता, तर त्यांनी नक्कीच प्रयत्न केले असते," शोभित यांनी पुढे सांगितलं.
मोहम्मद मुशर्रफ यांचे काका खालिद हुसैन यांनी सांगितलं, की आगीच्या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले.
मुशर्रफ 2007 पासून दिल्लीत काम करत होते.
खालिद हुसैन यांनी म्हटलं, "मुशर्रफ यांचं कुटुंब खूप गरीब आहे. त्यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबात काम करणारं कुणीच नाहीये. त्यांची छोटी मुलगी 1 वर्षांची आहे आणि मोठी मुलगी 4 वर्षांची आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)