दिल्ली आग : पोटासाठी हजारो किलोमीटर दूर आलेल्या तरुणांच्या मृत्यूला कोण जबाबदार?

मृत्यू कधी कोणाला सांगून येत नाही. मृत्यू म्हणजे भयाण शांतता. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या घरात, गल्लीत आणि आजूबाजूलाही अशीच भयाण शांतता पसरते.

लांबून येणाऱ्या एखाद्या व्यक्तिलाही लोकांचे सुतकी चेहरे पाहून काय घडले असेल, याचा अंदाज येऊ शकतो.

मात्र रविवारी (8 डिसेंबर) सकाळी जेव्हा रानी झांसी रस्त्यावरील अनाज मंडीच्या अरुंद गल्ल्यांमधील एका कारखान्यात आग लावली, तेव्हा तिथे मृत्यूनंतर रेंगाळणारी शांतता नव्हती. या आगीत आतापर्यंत 43 जणांनी आपले प्राण गमावले.

जवळच्या रस्त्यावरून नेहमीप्रमाणे वाहनांची रहदारी सुरुच होती. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले लोक नेमके कोण होते, त्यांचं काम काय होतं आणि ते कुठे रहायचे याची कल्पना तिथे असलेल्या आणि तिथून जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला याची कल्पना नव्हती.

कारण या दुर्घटनेत जे तरूण मृत्यूमुखी पडले ते आपल्या घरापासून हजारो किलोमीटर लांब रोजी-रोटी कमावण्यासाठी आले होते आणि या अरुंद गल्ल्यांमध्ये आपली गुजराण करत होते. लहान मुलांसाठी खेळणी आणि शाळेची दप्तरं बनविण्याच्या कारखान्यात ही मुलं काम करत होती.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिस आणि NDRF चे जवान पोहोचले होते. टीव्ही चॅनेलचे पत्रकारही इथं होते. मात्र या आगीच्या भक्ष्यस्थानी जे लोक पडले, त्यांचे कुटुंबीय इथं नव्हते.

कारखान्यात काम करणारी मुलं तिथंच राहायची

घटनास्थळी मी काही काळ होतो. आग आटोक्यात आल्यानंतर काही वेळानं जवळपास 500 मीटर अंतरावर मी काही कामगार एकत्र जमल्याचं पाहिलं.

यातील बरेचसे कामगार हे अग्निकांडात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांप्रमाणेच बिहारवरूनच आले होते.

तिथेच आरिफ नावाचा एकजण मला भेटला. अगदी दीड महिन्याआधीपर्यंत तो आग लागलेल्या इमारतीतच काम करत होता. आरिफ बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातील आहे.

आरिफने सांगितले, "या इमारतीत माझ्या ओळखीचे अनेक जण काम करत होते. कोणी सीतामढीचा होता, कोणी मोतीहारीचा तर कोणी कटिहारचा होता. हे लोक कारखान्यात काम करायचे आणि तिथेच रहायचे.

"ही मुलं दिवसभर काम करायची आणि रात्री त्याच ठिकाणी जागा मिळेल तिथे अंग टाकायची. प्लास्टिक आणि इतर सगळा कच्चा माल तिथेच असायचा. पायऱ्यांवर तयार झालेला माल पॅक करण्यासाठीचं सामान पडलेलं असायचं," असं आरिफ यांनी सांगितलं.

इथं काम करणाऱ्या मुलांचं वय 17 ते 22 वर्षांदरम्यान होतं. हे सगळे माझे मित्र होते आणि आता त्यांच्यापैकी कोणीच राहिलं नाही. आम्ही आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. कारण कोण-कोण जिवंत आहे, हे तरी कळेल. मात्र पोलिस आम्हाला आत जाऊ देत नव्हते. आम्हीही याच कारखान्यात काम करत होतो. मात्र शॉर्ट सर्किटसारख्या समस्या उद्भवायला लागल्यानंतर आम्ही इथं काम करणं सोडलं."

आरिफ बोलत होते, तेवढ्यात मागून त्यांना कोणीतरी हाक मारली. त्यामुळे ते घाईघाईनं धावत गेले. या आगीत किती लोक गेले, याची चौकशी ते करत होते.

भीती आणि निराशा

पोलिसांनी कितीही अडवलं तरी इथं जमलेले लोक घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न करत होते. इथं काम करणाऱ्या मुलांपैकी कोणीतरी दृष्टिस पडले अशी आशा त्यांना होती.

18-19 वर्षांचा ब्रजेश कुमार घटनास्थाळापासून जवळच पोलिस बॅरिकेड्सपाशी हताशपणे उभा होता. तोही या भागात काम करतो.

"त्याच्या डोळ्यांत भीती आणि निराशा होती. माझ्या ओळखीच्या कोणाचाही फोन लागत नाहीयेत आणि कोणं वाचलं आहे, हेही कळत नाहीये," असं ब्रजेश सांगत होता.

ज्या इमारतीमध्ये हे अग्नितांडव झालं होतं, तिथे काम करणाऱ्या अनेक मुलांना ब्रजेश ओळखत होता. अनेक जण त्याच्या गावातले होते. मात्र त्याचा कोणाशीही संपर्क होत नव्हता.

गॅलरीतून उडी मारून वाचवला जीव

थोड्या वेळानं घटनास्थळापाशी उभे असलेले दिनेश कुमार दास आम्हाला भेटले. जिथं मदतकार्य करणाऱ्या लोकांची गर्दी होती, त्या रस्त्यावर त्यांचे डोळे खिळून होते.

दिनेश कुमार दास बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील राहणारे आहेत आणि मोलमजुरी करून गुजराण करतात.

ते सांगतात, की सकाळी ते एका नातेवाईकाला भेटले होते. त्याने इमारतीच्या गॅलरीतून उडी मारून आपला जीव वाचवला होता.

त्यांनी सांगितलं, "सकाळी मी माझ्या भावाच्या मेहुण्याला भेटलो. तो इथेच काम करायचा. जेव्हा आग लागल्यावर लोकांनी त्याला जीव वाचविण्यासाठी गॅलरीतून खाली उडी मारायला सांगितलं. त्यानेही लोकांचं ऐकून उडी मारली आणि आपला जीव वाचवला."

अकरा वाजेपर्यंत इथं काम करणारे शेकडो मजूर जमायला सुरूवात झाली होती. त्यांची नजर या इमारतीत काम करणाऱ्या मुलांचा शोध घेत होती. या इमारतीत लागलेल्या आगीमध्ये जे तरूण मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना दुपारपर्यंत तरी आपल्या मुलांची काहीच खबरबात मिळाली नव्हती.

घटनास्थळी नेत्यांची रीघ लागायला लागली होती. एका पक्षाच्या नेत्याने या दुर्घटनेसाठी एमसीडीला जबाबदार धरलं. तर दुसऱ्या एका नेत्यानं याचं खापर दिल्ली सरकारवर फोडलं. मात्र दोन वेळच्या अन्नासाठी इतक्या दूर आलेल्या या मुलांचा दोष काय होता? का त्यांच्या नशिबी असं मरण आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)