जेव्हा उपहार चित्रपटगृहात 'बॉर्डर' पाहताना 59 जण जिवंत जळाले होते...

13 जून 1997. या दिवशी सनी देओलचा 'बॉर्डर' सिनेमा प्रदर्शित झाला होता.

फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी त्या संध्याकाळी दिल्लीतल्या ग्रीन पार्कमधील उपहार चित्रपटगृहात तुडुंब गर्दी झाली होती. मात्र, त्या गर्दीतील अनेकांसाठी ती संध्याकाळ अखेरची ठरली. ही संध्याकाळ दिल्लीसह देशभरात कधीही न विसरता येण्यासारखी.

एखाद्या जखमेनं वर्षानुवर्षे भळभळत राहावं, तशा या दिवसाच्या क्रूर आठवणी दिल्लीकरांच्याही मनात आहेत.

सिनेमा सुरू होऊ अर्धा तास लोटला होता, तोच चित्रपटगृहाच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आगीची ठिणगी पडली.

काही वेळातच आग चित्रपटगृहाच्या मुख्य हॉलमध्ये पसरली. बघता बघता आगीच्या भडक्यानं अन् काळ्याकुट्ट धुरानं काळवंडलेलं घटनास्थळ मृतदेहांनी भरलं आणि आक्रोश-आसवांनी परिसर हुंदके देऊ लागला. त्या घटनेला 22 वर्षे उलटून गेली.

दिल्लीतल्या अनाज मंडीत लागलेल्या आगीनं 'उपहार' चित्रपटगृहात लागलेल्या आगीच्या नको वाटणाऱ्या आठवणी ताज्या केल्या. उपहार चित्रपटगृहाच्या आगीत 59 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 103 जण जखमी झाले होते.

नेमकं काय घडलं होतं?

3 जून 1997 च्या संध्याकाळी उपहार चित्रपटगृहात संध्याकाली 3 ते 6 वाजताचा शो सुरू होता. सनी देओलच्या 'बॉर्डर' सिनेमाचा तो फर्स्ट डे, फर्स्ट शो होता. त्यामुळं चित्रपटगृह हाऊसफुल्ल होतं.

लोक चित्रपट पाहताना कथेत गुंग झाले असताना, चित्रपटगृहाच्या ट्रान्सफॉर्मर कक्षात आगीची ठिणगी पडली. अत्यंत वेगानं आग भडकली आणि काही क्षणात आग चित्रपटगृहाच्या मुख्य हॉलपर्यंत पोहोचली.

चित्रपटगृहाच्या मुख्य हॉलपर्यंत, जिथं लोक 'बॉर्डर' पाहत होते तिथवर पोहोचल्यानंतर हाहा:कार माजला. आगीमुळं एकीकडे चटके, आगीच्या ज्वाळा आणि दुसरीकडे वाढत जाणारा धूर, यामुळे लोक गुदमरले.

चित्रपटगृहातील बाल्कनीत 52 अतिरिक्त सीट्स बसवण्यात आल्या होत्या. शिवाय, कुटुंबांसाठी खास बॉक्सही तयार करण्यात आले होते. यामुळे उजव्या बाजूकडील बाल्कनी बंद झाली होती.

जे लोक बाल्कनीत बसले होते, ते लॉबी एरियात येऊ शकले नाहीत. कारण गेटकीपरनं चित्रपट सुरू झाल्यानंतर मुख्य एक्झिट गेट लॉक केलं होतं. बाल्कनीतल्या काही जण आगीपासून बचावासाठी टॉयलेटमध्ये गेले असता, तिथेच गुदमरून त्यांचा जीव गेला.

या जीवघेण्या कोंडमाऱ्यात 59 लोकांनी अखेरचा श्वास घेतला आणि जवळपास 103 जण गंभीररित्या जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेल्या 59 जणांमध्ये 23 लहान मुलांचा समावेश होता.

भारतातल्या सर्वात भीषण अग्निकांडांपैकी ही एक घटना मानली जाते.

पुढे काय झालं?

उपहार चित्रपटगृहाच्या आगीची चौकशी सुरू झाली. चित्रपटगृहात आगीबाबत कुठलीही खबरदारी घेतली गेली नव्हती, असं समोर आलं.

पुढे 22 जुलै 1997 रोजी पोलिसांनी चित्रपटगृहाचे मालक सुशील अन्सल आणि त्यांचा मुलगा प्रणव अन्सल यांना मुंबईतून अटक केली. दोनच दिवसांनी म्हणजे 24 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केलं.

सीबीआयनं पुढे सुशील अन्सल, गोपाळ अन्सल यांच्यासह 16 जणांवर आरोपपत्र दाखल केलं आणि 10 मार्च 1999 पासून सेशन कोर्टात सुनावणी सुरू झाली.

27 फेब्रुवारी 2001 रोजी कोर्टानं हत्या, हलगर्जीपणा आणि इतर गुन्ह्यांमध्ये आरोप निश्चित केले. त्यानंतर साक्षीदारांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर 20 नोव्हेंबर 2007 रोजी सेशन कोर्टानं सुशील अन्सल, गोपाल अन्सल यांच्यासह 12 आरोपींना दोषी ठरवून, दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, लगेच 4 जानेवारी 2008 रोजी अन्सल बंधूंसह इतर दोघांना जामीन मिळाला. मात्र, सप्टेंबर 2008 मध्ये अन्सल बंधूंचा जामीन रद्द करून त्यांना तिहार तुरूंगात पाठवलं.

2008 च्या डिसेंबर महिन्यात हायकोर्टानं अन्सल बंधूंची शिक्षा दोन वर्षांवरून एक वर्षांची केली आणि इतर सहा आरोपींची शिक्षा कायम ठेवली. मात्र, पीडितांच्या संघटनांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर मार्च 2014 साली त्यावर निर्णय आला. सुप्रीम कोर्टानं अन्सल बंधूंची शिक्षा कायम ठेवली.

मात्र ऑगस्ट 2015 मध्ये सुप्रीम कोर्टानं अन्सल बंधूंना प्रत्येकी 30-30 कोटींचा दंड ठोठावून सोडून दिलं.

शेवटी फेब्रुवारी 2017 मध्ये सीबीआयच्या पुनर्विचार याचिकेनंतर सुप्रीम कोर्टानं गोपाल अन्सल यांना एका वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, त्यांचा भाऊ सुशील अन्सल यांना त्यांच्या वयामुळं शिक्षा झाली नाही. मात्र, सुनावणीदरम्यान सुशील अन्सल यांनी 5 महिने 20 दिवस तुरूंगात काढले होते.

कोर्टाच्या निर्णयाबाबत नीलम कृष्णमूर्ती यांनी निराशा व्यक्त केली. कृष्णमूर्ती या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करत होत्या. कृष्णमूर्तींचा मुलगा आणि मुलगी या आगीत मृत्यूमुखी पडले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)