दिल्ली आग : मदतीसाठी ओरडत असतानाच त्यांचा मृत्यू झाला-प्रत्यक्षदर्शीनं दिली माहिती

"लोक जोरजोरात मदतीसाठी याचना करत होते. खिडकीतून हात बाहेर काढून ओरडत होते. आजूबाजूच्या लोकांनी शिड्या लावून त्यांना खिडकीचे गज तोडण्यासाठी हातोडा दिला. पाणी टाकलं. धुरामुळे आत अडकलेल्यांची अवस्था वाईट झाली होती," अनाज मंडी परिसरात राहणारे रौनक खान बीबीसीशी बोलताना सांगत होते.

रौनक यांनी ही सगळी दुर्घटना प्रत्यक्ष अनुभवली होती. बचावकार्य कसं पार पडलं हे पाहिलं होतं. त्यांनी सांगितलं, "पोलिसांनी ड्रील मशीननं खिडक्या उघडल्या आणि मग कोंडलेला धूर बाहेर पडायला लागला. एक माणूस जोरजोरात ओरडत होता. ओरडत असातानाच त्यांचा मृत्यू झाला. आत गेल्यावर पोलिसांना अनेक लोक बेशुद्ध पडले होते. पहाटे तीन वाजता आग लागली होती. साडेपाच-सहा वाजेपर्यंत आम्ही इथंच होतो. हे सगळं दृश्य मी कधीच विसरू शकणार नाही."

रविवारी (8 डिसेंबर) सकाळी दिल्लीतील राणी झांसी रोडवरील अनाज मंडीत भीषण आग लागली आहे. यात 43 जण मृत्यूमुखी पडले.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या सुमारे 25 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

दिल्ली अग्निशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितलं, "एकूण 63 जणांचा आतापर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. जखमींना लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय."

अरुंद गल्ली असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्या किंवा अॅम्ब्युलन्सला घटनास्थळापर्यंत जाता येत नाहीय. त्यामुळं बचावकार्य करणारे जवान जखमींना आपल्या खांद्यावरून बाहेर आणत आहेत.

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "मृतांमध्ये बहुतांश लोक 15-20 वयोगटातले आहेत. ज्या बिल्डिंगला आग लागली, तिथे खेळणी बनवण्याचा कारखाना सुरू होता."

"आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या इमारतीत मोठ्या प्रमाणात कागद आणि पुठ्ठे होते. त्यामुळं आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला. परिणामी आत अडकलेल्या लोकांना अधिक त्रास झाला," अशी माहिती अतुल गर्ग यांनी दिली.

बचावकार्यात तैनात एका अधिकाऱ्याने सांगितलं की आग आटोक्यात आली असून, संपूर्ण परिसर आता पाहिला जातो आहे. आता मदतीसाठी दिल्ली नगरपालिकेला पाचारण करण्यात येत असल्याचंही त्या अधिकाऱ्याने सांगितलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी दाखल भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवरील उपचाराचा संपूर्ण खर्च आणि एक-एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

नेत्यांनी व्यक्त केलं दुःख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना "अत्यंत भयंकर" असल्याचं म्हटलं आहे. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत पुरवली जाईल, असंही त्यांनी ट्वीट करून सांगितलं.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सकाळी ट्वीट करत "अत्यंत दुःखद बातमी. बचावकार्य सुरू आहे, अग्निशमन दलाचे जवान कसोशीने प्रयत्न करत आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातंय," अशी प्रतिक्रिया दिली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्वीट करत "अनेक जिवांचं नुकसान" झाल्याची खंत व्यक्त केली. "मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो. जखमी लवकर बरे होतील म्हणून प्रार्थना करतो."

"संबंधित प्रशासनाला सर्व ती मदत करण्याचे आदेश" दिल्याचंही त्यांनी ट्वीट केली.

बल्लीमाराना विधानसभेचे आपचे आमदार इमरान हुसैन यांनी ही आग का लागली, याची चौकशी करू, असं सांगितलं. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "जुन्या दिल्लीतील या अरुंद गल्ल्या आहेत, घरंही एकमेकांच्या अगदी जवळ आहेत."

या घरांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीररीत्या कारखान्यांविषयी विचारल्यावर ते म्हणाले की "ती दिल्ली नगरपालिकेची जबाबदारी आहे. अशा अवैध कारखान्यांवर कारवाई केली जाईल," असंही ते म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

दिल्ली भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आणि जखमींसाठी 25 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. "प्रथमदर्शनी असं दिसतंय की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. अत्यंत दुःखद घटना आहे," असं ते म्हणाले.

(ही ब्रेकिंग न्यूज सतत अपडेट होते आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)