उद्धव ठाकरे नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्याबद्दल माफी मागतील? – भाजपचा सवाल

नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभेत माफी मागितली. मात्र नथुराम गोडसेबाबत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेलं विधान आणि त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधींची प्रतिक्रिया यातून आता नवीन वाद उद्भवला आहे.

राहुल गांधी यांनी नथुराम गोडसेंना देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांना दहशतवादी म्हटलं होतं. त्याचाच संदर्भ देत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

"काँग्रेसनं महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं आहे. शिवसेनेनं सामनामधून नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं होतं. काँग्रेस सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते," असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं.

आपल्या वक्तव्याला पुरावा म्हणून दुबेंनी चक्क सामनाचा तो जुना अग्रलेखच आणला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीचं समर्थन करणारे आणि एका अर्थानं या आघाडीला कारणीभूत ठरलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनीच हा अग्रलेख लिहिला होता. या लेखात नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं असल्याचं दुबे यांनी सभागृहाला सांगितलं.

केवळ निशिकांत दुबेच नाही तर भाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनीही काँग्रेसच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयावर या निमित्तानं टीका केली.

जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटलं, "मी विचारु इच्छितो, की गोडसे भक्त उद्धव ठाकरे यांना माफी मागण्याबद्दल राहुल गांधी केव्हा सांगणार आहेत. आमच्या पक्षानं साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाई केली आहे. मात्र राहुल गांधींनी त्या व्यक्तिशी हातमिळवणी केली आहे, ज्यांनी सामनामधून गोडसेंना देशभक्त म्हटलं होतं."

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही जीव्हीएल नरसिंह राव यांनी त्यांना खोचक शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी म्हटलं होतं, की गोडसेभक्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. आता सामनाचं नाव सोनिया नामा असं करा.

या टीकेनंतर राहुल गांधी यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी माध्यमांनी गराडा घातला. पण मी माझा मुद्दा मांडला आहे, एवढं म्हणून ते निघून गेले.

शिवसेनेच्या हिंदुत्ववादी प्रतिमेमुळेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या सुरूवातीला महाराष्ट्रातील आघाडीसाठी तयार नव्हत्या. कारण सावरकर, अयोध्या, कलम 370 अशा वेगवेगळ्या विषयांवरील शिवसेनेची भूमिका ही राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससाठी अडचणीची ठरु शकते, अशी साशंकता काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मनात होती.

लोकसभेत निशिकांत दुबे आणि जीव्हीएल नरसिंह राव यांनी गोडसे प्रकरणाचा दाखला देत काँग्रेस-शिवसेना आघाडीवर उपस्थित केलेलं प्रश्नचिन्ह ही त्याची सुरूवात तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि शिवसेनेच्या परस्परविरोधी विचारधारा एकत्र आणण्याची कसरत महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातही दिसून आली.

किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याची जी इंग्रजी प्रत आहे त्यामध्ये 'The alliance partners commit to uphold the secular values enshrined in the Constitution,' असं वाक्य आहे. या वाक्याचं मराठी भाषांतर 'आघाडीतील सहकारी पक्ष हे घटनेमध्ये नमूद केलेल्या धर्मनिरपेक्ष मूल्यांशी एकनिष्ठ राहतील.'

पण जर या कार्यक्रमाचा मराठी मसुदा पाहिला तर त्यामध्ये 'महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रत्येक निर्णय हा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकात सांगितलेल्या मूल्यांना धरून असेल,' असं म्हटलं.

म्हणजेच मराठी मसुद्यामध्ये थेटपणे धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरला नव्हता. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसनं आपापल्या मतपेढीला सांभाळण्यासाठी शब्दच्छल केला आहे का, हा प्रश्न उपस्थित झाला.

आधी धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आणि आता गोडसे प्रकरणावरून लोकसभेत झालेला वाद यांमुळे काँग्रेसची धर्मनिरपेक्ष मूल्यं आणि शिवसेनेचं हिंदुत्व यांची सांगड घालणं दोन्ही पक्षांना भविष्यात जड जाऊ शकतं, याची ही नांदी असू शकते.

प्रज्ञा ठाकूर यांच्या कोणत्या वक्तव्यामुळे झाला वाद?

लोकसभेत मंगळवारी (27 नोव्हेंबर) 'विशेष सुक्षा गट' (SPG) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान DMKचे खासदार ए. राजा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचं उदाहरण दिलं.

"विशेष सुरक्षेअभावी गोडसे यानं कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली," असं त्यांनी म्हटलं. यावेळी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांना थांबवत "तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये," असं विधान केलं.

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "दहशतवादी प्रज्ञासिंह यांनी दहशतवादी गोडसे याला देशभक्त संबोधलं. भारतीय संसदेच्या इतिहासातील हा दु:खद दिवस आहे."

प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी "प्रज्ञा ठाकूर यांचं वक्तव्य दुर्दैवी असून संसदेत असं वक्तव्य करणं निंदनीय आहे," अशी प्रतिक्रियाही दिली होती.

दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संरक्षणविषयक सल्लागार समितीमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं.

या सर्व घडामोडींनंतर प्रज्ञा सिंह यांनी शुक्रवारी (29 नोव्हेंबर) लोकसभेत माफी मागितली. "मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचलं असेल, तर मी त्यासाठी माफी मागते. पण मला हेसुद्धा म्हणायचं आहे की, संसदेतील माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला आहे. ही निंदनीय बाब आहे. महात्मा गांधींच्या कार्याप्रती मला श्रद्धा आहे," असं साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)