उद्धव ठाकरे सरकार : 'धर्मनिरपेक्ष' शब्द किमान समान कार्यक्रमाच्या मराठी मसुद्यातून का वगळला?

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीपूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली.

या परिषदेमध्ये तिन्ही पक्षांनी मिळून तयार केलेल्या किमान समान कार्यक्रम अर्थात 'कॉमन मिनिमम प्रोग्राम'बद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचा मसुदा नंतर पक्षाच्या नेत्यांनी ट्वीट केले तसंच माध्यमांना त्याच्या प्रति देण्यात आल्या.

या किमान समान कार्यक्रमामध्ये काँग्रेसची धर्मनिरपेक्ष मूल्यं आणि शिवसेनेचं हिंदुत्व एकत्र कसं येणार, हा सगळ्यांसाठीच औत्सुक्याचा मुद्दा होता. मात्र या कार्यक्रमाचा मसुदा पाहिल्यानंतर शब्दांचा खेळ करून धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्वाची सांगड घालण्याचा प्रयत्न झालाय का, अशी चर्चा सुरू झाली.

किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याची जी इंग्रजी प्रत आहे त्यामध्ये 'The alliance partners commit to uphold the secular values enshrined in the Constitution,' असं वाक्य आहे. या वाक्याचं मराठी भाषांतर 'आघाडीतील सहकारी पक्ष हे घटनेमध्ये नमूद केलेल्या धर्मनिरपेक्ष मूल्यांशी एकनिष्ठ राहतील.'

पण जर या कार्यक्रमाचा मराठी मसुदा पाहिला तर त्यामध्ये 'महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रत्येक निर्णय हा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकात सांगितलेल्या मूल्यांना धरून असेल,' असं म्हटलं आहे.

म्हणजेच मराठी मसुद्यामध्ये थेटपणे धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरला नाहीये. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसनं आपापल्या मतपेढीला सांभाळण्यासाठी शब्दच्छल केला आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र हा शब्दांचा खेळ नसल्याचं म्हटलं आहे. "सेक्युलर या शब्दाचं भाषांतर शब्दशः करण्याची काही आवश्यकता नाहीये. जेव्हा संविधानातील मूल्यांना असं म्हणतो, तेव्हा त्यामध्ये लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या सर्वच मूल्यांचा समावेश होतोच," असं सचिन सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

'शिवसैनिकांच्या भावना न दुखावण्याची काळजी'

मात्र, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना हा शब्दांचा खेळ आहे, असं वाटत नाही.

"दोन्ही पक्षांनी आपण घटनेशी प्रामाणिक राहणार असल्याचं पुरेसं स्पष्ट केलं आहे. वर्षानुवर्षं काम केलेले, हिंदुत्वाच्या भूमिकेशी प्रामाणिक राहिलेले शिवसैनिक हे वाचणार असल्याची जाणीव शिवसेनेला आहे. त्यामुळेच त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि आपण घटनेतील तत्वांशी प्रामाणिक राहू हे स्पष्ट होईल याची काळजी घेऊनच किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला आहे," असं प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

घटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हे मूल्य समाविष्ट आहे. त्यामुळे संविधानाच्या प्रास्ताविकातील मूल्यं असं म्हटल्यावर 'धर्मनिरपेक्ष' हे तत्वही आपसूकच त्यात येत असल्याचं अकोलकर यांनी म्हटलं.

अनवधानाने झालेली चूक

कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करताना बरीच घाई झाली होती. तिन्ही पक्षांची एकमेकांशी जुळवून घेतानाही दमछाक झाली होती. त्यामुळे शपथविधीच्या आधी दोन्ही भाषांमध्ये किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करताना ही अनावधानानं झालेली चूक आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केलं.

मुळात 'सेक्युलर' या शब्दाला मान्यता दिल्याशिवाय शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेस तयारच नव्हती. त्यामुळे किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यातील दोन्ही भाषांत काही फरक असेल ती त्यातून फार राजकीय अर्थ काढले जाऊ नयेत, असंही मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)