You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवार : उपमुख्यमंत्रिपदाची आज शपथ नाही; नाराजी कायम?
अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत, त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेणार आहेत.
इतर मंत्र्यांचा शपथविधी विधानसभा अध्यक्षांची निवड आणि विश्वासदर्शक ठरावा नंतर होणार असल्याच अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण यावेळी त्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत मात्र मौन बाळगलं आहे.
"मी अजिबात नाराज नाही, मी नारज असल्याची चर्चाच कुठे येत नाही, मी नाराज आजही नाही कालही नव्हतो उद्याही राहणार नाही," असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी त्यांच्या नाराजीच्या चर्चेवर दिलं आहे.
"बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मी मार्गदर्शन सुद्धा केलं मी त्यावेळेस भूमिका घेतली होती, त्याविषयी आता मला काही बोलायचं नाही, मी आणि सुप्रिया एकत्र शपथविधीला जाणार आहे," असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
अजित पवार सकाळपासून फोनवर अनरिचेबल होते. त्यामुळे ते नेमके कुठे गेले, याबद्दल सकाळी संभ्रमाचं वातावरण होतं.
अजित पवारांवरून एवढं संभ्रमाचं वातावरण का आहे, हा प्रश्न आम्ही तीन ज्येष्ठ पत्रकारांना विचारला. त्यांनी सांगितलं:
'पवारांवर आमदारांचा दबाव'
पराग करंदीकर, निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स, पुणे:
अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची किंवा एकूणच मंत्रिपदाची शपथ घेतील, असं वाटत नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांवर विश्वास ठेवावा लागेल. त्यामुळे आज मंत्रिपदाची शपथ दिली गेली नाही, तरी दोन-चार महिन्यांनी त्यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावंच लागेल. कारण राष्ट्रवादीतल्या निवडून आलेल्या आमदारांपैकी अनेक जण अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत. भले हे आमदार त्यांच्यासोबत बाहेर गेले नाहीत. मात्र, सरकार असताना ते त्यांना टाळू शकत नाहीत. त्यामुळे अजित पवारांना सरकारमध्ये प्रतिष्ठा द्यावीच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने म्हणजेच शरद पवारांनी कितीही अजित पवारांशी अंतर राखायचं ठरवलं, तरी राष्ट्रवादीचे निवडून आलेले आमदार अंतर राखणार नाहीत. आमदारांच्या दबावाखाली तरी त्यांना मंत्रिपद द्यावेच लागेल.
अजित पवारांनी स्वत:बद्दल अविश्वास निर्माण केलाय. मात्र तरीही पक्षातील स्थान कमी झालेलं नाहीये. कारण राज्यभर नेटवर्क असलेला राष्ट्रवादीकडे दुसरा नेता नाहीय.
अजित पवारांना मंत्रिपद मिळण्यास काही काळ जावा लागेल. लगेच त्यांना मंत्रिमंडळात घेणार नाहीत. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यांच्या खेळी काही वेगळ्या असू शकतात. शरद पवारांकडून अजित पवारांना स्वीकारण्यास वेळ जाईल. किंबहुना, अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास शरद पवार स्वत:च वेळ घेतील.
शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहता, पवारांनी आपल्या कुठल्याच प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी सोडलं नाहीये. मात्र हेही खरंय की, पवारांनी लगेच अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास सहमती दर्शवली, तर पवारांनीच अजित पवारांना भाजपकडे पाठवलं होतं, याला पुष्टी मिळेल. हे गृहितक टाळण्यासाठी तरी शरद पवार हे अजित पवारांना काही काळ दूर ठेवतील.
अजित पवारांना उशिरा मंत्रिपद मिळालं, तरी तो उशीर नसेल. कारण त्यांची प्रतिष्ठा कायम असेल. विधिमंडळातही ते पहिल्या रांगेतच बसतील.
आता शरद पवार आहेत म्हणून कुणी आमदार अजित पवारांसोबत गेले नाहीत, अन्यथा अख्खी राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेली असती.
एकूण जेव्हा कधी अजित पवारांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल, तेव्हा त्यांना राष्ट्रवादीला मिळालेल्या मोठ्या पदांपैकी एक अजित पवारांना द्यावेच लागेल.
'अजित पवारांना सबुरीचा सल्ला'
सुधीर सूर्यवंशी, संपादक, कट्टा न्यूज:
शिवतीर्थावरील शपथविधी कार्यक्रमात जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना पक्षातर्फे संधी देण्यात येणार आहे. सध्या तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना सबुरीचा सल्ला दिलेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलेलं असलं तरी ते कधी देणार हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. सध्यातरी तुम्ही शांत राहा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
आज शिवतीर्थावर होणारा शपथविधी हा एक मोठा इव्हेंट असणार आहे. या ठिकाणी शपथ घेण्याला एक वेगळं महत्त्व असेल. त्यामुळे अजित पवारांनाही या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे.
आजच्या शपथविधी कार्यक्रमात शपथ न घेतल्यास त्यांचं पक्षातलं स्थान दुय्यम असण्यावर शिक्कामोर्तब होईल. आज शपथ न घेणं म्हणजे त्यांचा प्राधान्यक्रम कमी झाला तसंच त्यांना डावलण्यात आलंय असा संदेश जाईल, अशी त्यांना भीती आहे.
अजित पवारांची पक्षावर पकड आहे. त्यांच्या गटात काही आमदार आहेत. पण त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची प्रतिमा वेगळी बनली आहे. त्यांच्या या कृत्याचा संबंध त्यांनी आधी केलेल्या नाराजीनाट्याशी जोडला जात आहे. त्यांची राजकीय अपरिपक्वतासुद्धा यातून दिसून आलेली आहे.
या वादावर सध्या पडदा पडलेला असला तरी हा संघर्ष पुढेसुद्धा चालू राहण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवार यांचा 'नारायण राणे' होतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
धोका काय आहे...
अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक:
अजित पवारांचं राजकीय पुनर्वसन करणं आवश्यक आहे. कारण भाजप पुन्हा त्यांच्या संपर्कात येऊ शकतं. कर्नाटकात वर्षभरातनंतर भाजपने काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडलं होतं. त्यामुळे अजित पवारांची नाराजी नंतर त्रासदायक ठरू शकते.
अजूनही अजित पवार नाराज आहेत, असं दिसतंय. त्यामुळे बैठका सुरू आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांचा पाठिंबा आहे, हे शरद पवारांनाही ठाऊक आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)