अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले, पण ‘7 प्रश्न अनुत्तरित ठेवूनच...

"मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. शरद पवार हेच आमचे नेते आहेत. मी कधीच राष्ट्रवादीमधून बाहेर गेलो नव्हतो. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा परिवार आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.

आपण राष्ट्रवादीसोबतच आहोत, हे सातत्यानं ठसवून सांगण्याची वेळ आज अजित पवारांवर का आली आहे?

23 नोव्हेंबरच्या सकाळी महाराष्ट्रानं एक वेगळंच राजकीय नाट्य अनुभवलं. आदल्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं सरकार स्थापनेची तयारी दर्शवली होती. मात्र मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला, देवेंद्र फडणवीस यांचा. त्यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शपथविधीची दृश्य पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली की अजित पवारांनी बंड केलंय हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाणं हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्याला आमचा पाठिंबा नाही, असं ट्वीट केलं. पाठोपाठ त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदावरूनही हकालपट्टी करण्यात आली.

या सर्व घडामोडींमुळे अजित पवार फुटले आहेत हे स्पष्ट झालं. 'पक्ष फुटला आणि कुटुंबही' या सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्स अॅप स्टेटसमुळे पवार कुटुंबातले मतभेद बाहेर आले, अशी चर्चाही सुरू झाली.

अजित पवारांसोबत किती आमदार गेले आहेत, त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकतो का, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून अजित पवारांचा व्हीप आमदारांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी लागू होणार का, या सगळ्या तांत्रिक बाबींचा उहापोह होऊ लागला.

त्याचवेळी सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्यावेळी अजित पवारांनी नेमकं काय केलं, हे स्पष्ट झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता या अधिकारानं 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र त्यांनी राज्यपालांना सादर केलं होतं. पक्षाच्या भूमिकेशी पूर्णपणे फटकून अशी ही कृती होती.

पक्षातून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीनं अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांनाही परत आणण्याची मोहीम हाती घेतली.

सरतेशेवटी साडेतीन दिवस देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला.

मंगळवारी (27 नोव्हेंबर) संध्याकाळी महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं, की ही आघाडी मजबूत करण्यासाठी अजित पवारांची गरज आहे. माझी विनंती आहे की सगळ्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अजित दादांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आणण्याची जबाबदारी घ्यावी.

याच बैठकीनंतर रात्री साडे नऊच्या सुमारास अजित पवार सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या घरी गेले. धावत आपल्या काकांच्या घराच्या पायऱ्या चढणारे अजित दादा न्यूज चॅनेल्सच्या कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर अजित पवारांची घरवापसी झाली का, पवार कुटुंबानं पुन्हा एकदा आपल्या घरातले मतभेद सावरून घेतले का अशा चर्चांना सुरूवात झाली.

शपथविधीच्या वेळेस अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या गळाभेटीच्या फोटोनं सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र निर्माण केलं. मात्र खरंच तसं आहे का? अजित पवार यांच्या औट घटकेसाठी का होईना पण भाजपसोबत सरकारमध्ये जाण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्याची उत्तरं ना अजित पवारांनी दिली आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेसनं. याचा प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.

1. अजित पवार राष्ट्रवादीत होते तर ते पक्षाविरोधात भाजपसोबत का गेले?

मी राष्ट्रवादीतच होतो, असं अजित पवार सांगत आहेत. राष्ट्रवादीचे अन्य नेतेही अजित पवार आमच्यासोबत आहेत हेच म्हणत आहेत. पण नेमका कोणता विचार करून अजित पवार भाजपसोबत गेले होते, याबद्दल भाष्य करायचं टाळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी हे झालं नसतं तर बरं झालं असतं एवढीच प्रतिक्रिया व्यक्त केली.

पण निकालाचे आकडे आल्यापासूनच अजित पवार आणि राष्ट्रवादीतला एक गट हा भाजपसोबत जाण्याच्या विचारांचा होता. पण शरद पवारांचा याला विरोध होता. शेवटी काहीच घडत नाही असं लक्षात आल्यावर अजित पवार भाजपसोबत गेले, असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

"तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर अजित पवार राष्ट्रवादीतून फुटून भाजपमध्ये गेले नव्हते, तर पक्षाचे गटनेते म्हणूनच समर्थनाचं पत्र घेऊन गेले होते. आपल्यासोबत पक्षातील 26-27 आमदार येतील असा त्यांचा अंदाज होता. मात्र तसं काही घडलं नाही," असंही अभय देशपांडे यांनी म्हटलं.

"17 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र शरद पवारांनी याला विरोध केला. 22 नोव्हेंबरला संध्याकाळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल अशी घोषणा केली आणि 23 नोव्हेंबरला अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन शपथ घेतली. हा घटनाक्रम विचार करण्याजोगा आहे," असं राजकीय विश्लेषक पवन दहाट यांनी म्हटलं.

शिवसेनेसोबत जाऊन आपल्याला उपमुख्यमंत्रिपद मिळणार नाही. ते जयंत पाटील यांनाच मिळेल, असंही अजित पवार यांना वाटलं असण्याची शक्यता असल्याचं दहाट यांनी म्हटलं.

2. दुसऱ्या कोणत्याही नेत्यानं पक्षाची कागदपत्रं अशी परस्पर नेऊन भाजपसोबत हातमिळवणी केली असती तर त्याच्यावर कारवाई करण्यात आली असती?

या प्रश्नाचं उत्तर निश्चितच हो आहे, असं अभय देशपांडे यांनी म्हटलं.

अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांना घरी आणणं हे पक्षाच्या आणि कुटुंबाच्या दृष्टिनंही महत्त्वाचं होतं. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी कोणतीही फाटाफूट होऊ नये यासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांना परत आणण्याचे प्रयत्न केले, असं अभय देशपांडे यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवारांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्यावर पक्षातून निलंबनासारखी कारवाईसुद्धा करण्यात आली नाही, या बाबीकडेही अभय देशपांडे यांनी लक्ष वेधलं.

अजित पवारांना काढलं असतं तर पक्षात दुफळी माजली असती. राज्यात आणि बारामतीत अजित पवारांना समर्थन देणारे नेते-कार्यकर्ते आहेत. पक्षातून काढल्यानंतर त्यांनी आपलं राजकीय करिअर दुसरीकडे शोधलं असतं. पण त्यामुळे पक्षावर आणि कुटुंबावर परिणाम झाले असते, असं अभय देशपांडे यांनी म्हटलं.

3. केवळ पवार कुटुंबातले आहेत म्हणून अजित पवारांना विशेष वागणूक मिळतीये का?

पवार कुटुंबातील सदस्य या एकमेव कारणामुळे अजित पवारांना विशेष वागणूक मिळत असावी, असं नाहीये. राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांच्यामते अजित पवारांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढणार नाही.

प्रकाश पवार यांनी म्हटलं, "अजित पवारांना पक्षात घेतल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढणार नाही आणि टिकणारही नाही. त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा प्रस्थापित करण्याशिवाय शरद पवारांकडे दुसरा पर्याय नसेल. पण आता अजित पवारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम शरद पवारांना करावं लागणार आहे."

"दुसरीकडे राष्ट्रवादीत एक गट असा आहे, ज्याला अजित पवारांना हेतूपूर्वक पक्षातून बाहेर काढायचं होतं. त्यामुळे अजित पवार समर्थकांचा एक गट आणि अजित पवार विरोधकांचा एक गट, असे दोन गट या पक्षात तयार झाले आहेत. त्यामुळे पक्षात दुफळी माजण्याचा प्रकार आहे. पण असं असलं तरी अजित पवार हे शक्तिशाली नेते आहेत. त्यांनी मनात आणलं तर ते दुसरा पक्षही स्थापन करू शकतात, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे," असं प्रकाश पवार यांनी म्हटलं.

4. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे नेते अजित पवारांवर पूर्ण विश्वास ठेवू शकतात का?

अजित पवारांनी त्यांच्या राजकीय हालचालींमुळे विश्वासार्हता गमावल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी व्यक्त केलं.

त्यांनी म्हटलं, की "कधी बैठकीतून उठून जाणं तर कधी पदाचा राजीनामा देणं, हे अजित पवारांचं वर्तन पहिल्यापासून राहिलं आहे. पण यावेळेस अजित पवारांनी विश्वासार्हता गमावली आहे. एकीकडे तीन पक्ष सत्तास्थापनेची चर्चा करत असताना एका रात्रीत भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणं इतकं सोप नव्हतं. सिंचन घोटाळ्याशी संबंधित चौकशीचा धाक अजित पवारांना दाखवल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललं असावं. त्याचा मोबदल्यात म्हणून या घोटाळ्याशी संबंधित 8 ते 9 फाईल्स लगेच बंद करण्यात आल्या."

अर्थात, अजित पवार यांना या सिंचन गैरव्यवहारप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचं वृत्त अजूनही स्पष्ट नाही.

5. कुटुंबातले मतभेद जगासमोर येऊ नये म्हणून पवार कुटुंब सारवासारव करत आहे का?

आपलं कुटुंब हे एकत्र आहे, हे पवार कुटुंब वारंवार सांगत असतं. आमच्यात कुटुंबप्रमुखाचा शब्द अंतिम असतो, असं शरद पवारांकडून सांगितलं जातं. बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत अजित पवार यांनी म्हटलं होतं, की वारसाहक्कावरून बाकीच्यांमध्ये जे झालं ते पवारांमध्ये होणार नाही. पण असं म्हणणारे अजित पवारच पक्ष आणि कुटुंबापासून काही काळ वेगळे झाले.

अर्थात, पवार कुटुंबीयांनी त्याची वाच्यता टाळली. म्हणूनच आमदारांच्या शपथविधीच्या वेळेस सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची गळाभेट घेतली आणि हा फोटो ट्वीट केला.

6. वारंवार नाराजी जाहीर करून नंतर अजित पवार लोकांसमोर वेगळं का बोलतात?

विधानसभा निवडणुकांपूर्वी काही दिवस आधी शरद पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते नॉट रिचेबल होते.

त्यावेळीही पवार कुटुंबात सर्व आलबेल नाही का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र शरद पवार यांनी पुढे येत आमच्या कुटुंबात माझाच शब्द शेवटचा असतो, असं सांगितलं होतं.

अजित पवारांनाही नंतर माध्यमांसमोर येत आपल्यामुळे शरद पवारांवर आरोप झाल्यानं व्यथित होत राजीनामा दिल्याचं सांगितलं. पण तेव्हा अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा काही थांबल्या नाहीत.

अजित पवारांची नाराजी नवीन नाहीये. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार असतानाही अजित पवारांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.

मात्र पुन्हा सारवासरवही केली होती. अगदी काही दिवसांपूर्वी अजित पवार आघाडीच्या बैठकीतून निघून गेले. माध्यमांनी त्यासंबंधी विचारल्यावर त्यांनी चिडून मी आता बारामतीला जातोय, असं सांगितलं.

त्यानंतर पुन्हा शरद पवार, जयंत पाटील यांना पुढे येऊन अजित पवार चेष्टेनं असं बोलले वगैरे सांगून वेळ मारून न्यावी लागली होती.

7. शरद पवार अजित पवारांचे पंख कापतात अशी भावना अजित पवारांचे निकटवर्तीय बोलून दाखवतात. त्यात काही तथ्य आहे?

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना कधीच 'ऑल पॉवरफुल' होऊ दिलं नाही, हे खरं असल्याचं मत पवन दहाट यांनी व्यक्त केलं.

"अजित पवार यांचा स्वभाव तापट आहे. ते अनेकदा भावनेच्या भरात निर्णय घेतात. त्यांच्या स्वभावातील या त्रुटी शरद पवारांना चांगल्याच माहीत आहेत. त्यामुळेच त्यांनी अजित पवारांच्या हाती पक्षाची सूत्रं पूर्णपणे जाऊ दिली नाहीत. अजित पवारांना आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आलेलं नाही. 1999 पर्यंत वेगवेगळ्या मंत्रिमंडळांमध्ये अजित पवार हे राज्य मंत्रीच होते," असं पवन दहाट यांनी सांगितलं.

पवन दहाट यांनी म्हटलं, "दुसरीकडे आपल्याला काकांनी मुख्यमंत्री बनू दिलं नाही ही सल अजित पवारांच्या मनात होती. उदयनराजे भोसलेंचं पक्षात येणंही अजित पवारांना रुचलं नव्हतं. त्यावेळीही अजित पवार भर बैठकीतून निघून गेले होते. कारण सातारा जिल्ह्याची सूत्रं आपल्या हातून निसटतील अशी भीती कुठेतरी त्यांना होती. पुढच्या पिढीतील नेतृत्वाचा उदयही अजित पवारांच्या असुरक्षिततेचं कारण आहे. त्यांचे पुत्र पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीत पराजित झाले तर रोहीत पवार हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. रोहीत पवार हे बऱ्याचदा शरद पवारांसोबत असतात, पण पार्थ नसतात. यांमुळेही अजित पवार असंतुष्ट असावेत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)