You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची नथुराम गोडसे प्रकरणावरुन संसदेत माफी
नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा उच्चार केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली आहे.
शुक्रवारी (29 नोव्हेंबर) लोकसभेत बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांनी स्पष्ट केलं की, "मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचलं असेल, तर मी त्यासाठी माफी मागते. पण मला हेसुद्धा म्हणायचं आहे की, संसदेतील माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला आहे. ही निंदनीय बाब आहे. महात्मा गांधींच्या कार्याप्रती मला श्रद्धा आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "मी संसदेच्या लक्षात आणून देऊ इच्छिते की, संसदेतल्या एका सदस्यानं मला दहशतवादी संबोधलं. तत्कालीन सरकारनं माझ्याविरोधात कट-कारस्थान रचण्यात आल्यानंतरही न्यायालयात माझ्याविरोधात कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. कोणताही आरोप सिद्ध झालेला नसताना मला दहशतवादी संबोधण बेकायदेशीर आहे. हा एका महिलेच्या आत्मसन्मानावर हल्ला करण्यात आलेला आहे."
साध्वी प्रज्ञासिंह भाजपच्या खासदार असून 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळमध्ये पराभव केला होता.
प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. सध्या त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे आहेत.
प्रकरण काय?
लोकसभेत 'विशेष सुक्षा गट' (SPG) सुरक्षेबाबतच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान DMKचे खासदार ए. राजा यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचं उदाहरण दिलं.
"विशेष सुरक्षेअभावी गोडसे यानं कशाप्रकारे महात्मा गांधींची हत्या केली," असं ते म्हणाले. यावेळी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी त्यांना थांबवत "तुम्ही याप्रकरणी देशभक्तांची उदाहरणे देऊ नये," असं म्हटलं.
यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "दहशतवादी प्रज्ञासिंह यांनी दहशतवादी गोडसे याला देशभक्त संबोधलं. भारतीय संसदेच्या इतिहासातील हा दु:खद दिवस आहे."
"प्रज्ञा ठाकूर यांचं वक्तव्य दुर्दैवी असून संसदेत असं वक्तव्य करणं निंदनीय आहे," असं मत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केलं होतं.
दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संरक्षणविषयक सल्लागार समितीमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे.
गेल्या आठवड्यात त्यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर लोकसभेत सर्व पक्षाच्या सदस्यांनी आपल्या भावना मांडल्या. तसेच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकारची भूमिका मांडली. भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींचा नेहमीच आदर केला आहे असे त्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)