You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रज्ञा ठाकूर : करकरे कुटुंबीय म्हणतात, 'भाजप शहिदांचा सन्मान करतं, तर प्रज्ञांना तिकीट का?'
- Author, सिंधुवासिनी
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
"आमचा हेमंत लाखात एक होता," असं म्हणणं आहे हेमंत करकरे यांचे मेहुणे किरण देव यांचं.
हेमंत करकरे यांचा 2008मध्ये मुंबईवर झालेल्या कट्टरवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना अशोकचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
मालेगाव येथील बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हेमंत करकरे पुन्हा एकदा चर्चेत आले.
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याबद्दल टीकेची झोड उठली. भाजपनेही त्यांच्यापासून अंतर राखणं पसंत केलं. प्रज्ञा ठाकूर यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. आयपीएस असोसिएशननेही या वक्तव्यावर टीका केली होती.
करकरेंच्या कुटुंबियांना काय वाटतं?
किरण देव हे हेमंत करकरे यांची पत्नी कविता यांचे भाऊ आहेत. कविता यांचं 2014ला निधन झालं.
किरण देव मुंबईतच राहतात. त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे.
ते म्हणाले, "कविता माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती. मी हेमंतला अगदी जवळून ओळखायचो. प्रज्ञा ठाकूरच्या म्हणण्याने काय होतंय? ती जे बोलतेय ते सगळं चुकीचं आहे."
प्रज्ञा ठाकूरला तिकीट देण्याच्या मुद्द्यावरही ते प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात, "मी स्वत:ही भाजपचा समर्थक आहे. मात्र त्यांना तिकीट देण्याच्या मुद्द्यावरून मला काही प्रश्न पडले आहेत. जर पक्ष शहिदांचा सन्मान करतं तर त्यांना तिकीट का दिलं जातं? भाजप तिला विरोध का करत नाही?"
प्रज्ञा ठाकूर यांनी, 'मी हेमंत करकरे यांना शाप दिला,' असं वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल ते म्हणाले, "पहिली गोष्ट अशी की मी अशा गोष्टीवर विश्वास नाही. कुणीही सुशिक्षित व्यक्ती अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. हेमंत करकरे मुंबई हल्ल्यात शहीद झाले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आज त्यांची तीनही मुलं आपापल्या जागी सुखात आहे. प्रज्ञा ठाकूरने शाप दिला असता तर हे सगळं झालं असतं का?"
किरण यांच्या मते हेमंत करकरे एक धाडसी, शिस्तप्रिय पोलीस अधिकारी होते.
ते म्हणतात, "ते एक उत्तम पोलीस अधिकारी होते. त्यांना अनेक पदकं मिळाली आहेत. ते सगळ्याच बाबतीत अतिशय बुद्धिमान होते."
'लाखात एक होते'
"त्यांच्यासारखा पोलीस अधिकारी होणे नाही. ते अतिशय सुशिक्षित आणि शालीन होते. आम्हाला त्यांच्यावर गर्व होता. ते लाखात एक आहेत. मी त्यांच्याबद्दल इतकंच सांगेन." किरण भावविवश होऊन सांगत होते.
हेमंत आणि कविता यांचं लग्न झालं तेव्हा हेमंत एका खासगी कंपनीत कामाला होते. लग्नानंतर ते युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची आठवणही ते सांगतात.
बलिदानावर गर्व आहे पण...
किरण सांगतात, "हेमंतच्या कामाचं स्वरूप पाहता कविता कायम चिंतेत असायची. मात्र तीसुद्धा अतिशय धीराची होती. तिने कधीही हेमंतच्या कामात ढवळाढवळ केली नाही. आम्हाला त्यांच्या बलिदानावर गर्व आहे मात्र आता आमचा माणूस तर आम्ही गमावलाच ना.."
प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याने ते दुखावले असले तरी प्रज्ञा ठाकूर यांचं ते वाईट चिंतित नाही. "हे सगळं झाल्यावरही मी तिला कोणतेही दुषणं देणार नाही. त्यांच्याबद्दल काही वाईट व्हावं असं मला कधीही वाटणार नाही. मी त्यांचा हितचिंतक आहे. त्यांचंही आपलं आयुष्य आहे. फक्त हेमंतबद्दल तिने असं बोलायला नको होतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)