अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री, पण आज शपथ नाही - नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हेच राज्याचे उपमुख्यमंत्री होतील. मात्र, त्यांचा शपथविधी आज होणार नाही, असं नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी संकेत सबनीस यांच्याशी बोलताना सांगितलं आहे.

"येत्या 10 डिसेंबरपासून विधीमंडळाचं अधिवेशन सुरू होणार असल्याने ही प्रक्रिया त्याआधीच पार पडेल. 3 डिसेंबरपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाईल आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. त्यानंतर अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी निवड होईल. सध्या अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्या बातम्या पूर्णतः खोट्या आहेत. अजित पवार नाराज नाहीत. ते लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री होतील," असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

मी नाराज नाही - अजित पवार

अजित पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत, त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज जयंत पाटील आणि छगन भुजबळ शपथ घेणार आहेत.

इतर मंत्र्यांचा शपथविधी विधानसभा अध्यक्षांची निवड आणि विश्वासदर्शक ठरावा नंतर होणार असल्याच अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण यावेळी त्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत मात्र मौन बाळगलं आहे.

"मी अजिबात नाराज नाही, मी नारज असल्याची चर्चाच कुठे येत नाही, मी नाराज आजही नाही कालही नव्हतो उद्याही राहणार नाही," असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी त्यांच्या नाराजीच्या चर्चेवर दिलं आहे.

"बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत मी मार्गदर्शन सुद्धा केलं मी त्यावेळेस भूमिका घेतली होती, त्याविषयी आता मला काही बोलायचं नाही, मी आणि सुप्रिया एकत्र शपथविधीला जाणार आहे," असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

अजित पवार सकाळपासून फोनवर अनरिचेबल होते. त्यामुळे ते नेमके कुठे गेले, याबद्दल सकाळी संभ्रमाचं वातावरण होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)