You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कसा ठरेल सत्तास्थापनेचा फॉर्म्युला?
मंगळवारी (12 नोव्हेंबर) संध्याकाळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. पण असं असलं तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेसाठीच्या बैठका आणि चर्चा सुरू आहेत.
"आम्हाला सत्ता स्थापनेसाठी 48 तास हवे होते, मात्र राज्यपालांनी 6 महिन्यांचा अवधी आम्हाला दिला," असा टोला उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेदरम्यान लगावला होता. तर चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं.
शिवसेनेला सोबत घ्यायचं की नाही यावरून काँग्रेसच्या गोटात संभ्रम आहे का, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, मंगळवारी (12 नोव्हेंबर) रात्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात चर्चा झाल्यानंतर मात्र हे पक्ष एकत्र येऊ शकतात, असे संकेत मिळाले.
या घडामोडी आणि बैठकांचं सत्र सुरूच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसंच अशोक चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांची भेट घेतली.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तीनही पक्ष सत्ता स्थापनेच्या दिशेनं जात असल्याचं स्पष्ट केलंय. ते म्हणाले, "काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये कोण कोणत्या पदांवर काम करेल हे ठरवावं लागेल, आगामी निवडणुकांमध्ये तीनही पक्षांची काय भूमिका असेल यावर चर्चा होणं गरजेचं आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
विधानं आणि बैठकांची सत्रं पाहता पुढील घटनाक्रम कसा असू शकतो?
- राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आता सरकारमध्ये सामील होण्यासाठी जवळपास तयार आहे. आधी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा पवित्रा होता. पण अशाप्रकारे बाहेरून पाठिंबा दिल्यास सरकार स्थिर राहू शकणार नाही, असं शरद पवारांचं मत होतं. त्यानंतर आता काँग्रेस सरकारमध्ये सामील होऊ शकते.
- मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दरम्यान आधी चर्चा होईल. शिवसेनेसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे याविषयी म्हणजेच 'किमान समान कार्यक्रमा'विषयी या चर्चेमध्ये निर्णय घेण्यात येतील. मित्र पक्षांमध्ये एकवाक्यता ठेवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय. यासोबतच महत्त्वाची पदं, खातेवाटपाबद्दल चर्चा करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आधी एकत्र बसून या 'किमान समान कार्यक्रम' विषयी निर्णय घेतील. त्यानंतर हे दोन्ही पक्षं शिवसेनेसोबत चर्चा करतील.
चर्चेत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील?
लोकमत (पुणे)चे संपादक प्रशांत दीक्षित यांनी सांगितलं, "शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचं का हा पहिला मुद्दा असेल. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये काँग्रेस सामील होणार का, हा कळीचा मुद्दा असेल. काँग्रेसच्या दृष्टीने हा अडचणीचा मुद्दा आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचं झालं तर किती काळासाठी द्यायचं हे देखील महत्त्वाचं असेल. त्यानंतर समान नागरी कायद्याविषयी शिवसेना कशी भूमिका घेणार, 'कमिटमेंट' कशी देणार हा देखील प्रश्न आहेच. कारण शब्द पाळण्याबाबत भाजपप्रमाणेच शिवसेनेबद्दलही आक्षेप आहेतच."
"पण शिवसेनेकडून काहीतरी ठोस वदवून घेतलं जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नंतर येऊ घातलेल्या विविध निवडणुकांसाठी या पक्षांची आघाडी राहणार आणि ते एकत्रित भाजपविरोधात लढणार की वेगवेगळे लढणार हे ही ठरवावं लागेल. शिवाय मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचं स्थान काय राहणार, हा मुद्दाही असेलच कारण मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षात आहे," असं दीक्षित यांनी म्हटलं.
"महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम, सिंचन या खात्यांचं वाटप तिघांमध्ये समसमान होणार की राष्ट्रवादी आणि काँग्रेस महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवत शिवसेनेला मुख्यमंत्रिपद आणि सोबत इतर काही कमी महत्त्वीच खाती देणार हे देखील महत्त्वाचं ठरेल. काँग्रेस सरकारमध्ये सामील होते की बाहेरून पाठिंबा देते हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरेल. कारण बाहेरून पाठिंबा देणं त्यांना सर्वात सोयीचं ठरेल आणि ते मग इतर दोन पक्षांना नाचवू शकतील. म्हणून शिवसेनेच्या सरकारमध्ये काँग्रेस सामील होणार की राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये काँग्रेस सामील होणार हा कळीचा प्रश्न आहे," असा मुद्दा दीक्षित यांनी मांडला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)