शिवसेनेची फसगत की उद्धव ठाकरेंना अन्य पर्यायही खुले?

शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेच्या समीकरणांची चाचपणी सुरू केलीये. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचं अद्याप ठरता ठरत नाहीये. त्यामुळं शिवसेनेची अवस्था फसल्यासारखी झालीये का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यपालांनी शिवसेनेला 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी अवधी दिला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारांच्या सह्या असलेलं पाठिंब्याचं पत्र शिवसेनेला दिलं गेलं नाही.

त्यामुळे सेना सत्तास्थापनेचा दावा करू शकली नाही. शिवसेना नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांना वेळ वाढवून देण्याची विनंती केली. मात्र राज्यपालांनी तीही नाकारली.

काँग्रेसच्या दिल्लीत, तर राष्ट्रवादीच्या मुंबईत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी कुठल्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचत नसल्यानं मुख्यमंत्रिपदासाठी युती तोडून बाहेर पडलेल्या शिवसेने समोर आता काय पर्याय आहेत.

'गंभीर असल्याचं दाखवून सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र नाही'

सोमवारी (11 नोव्हेंबर) दिवसभरातील राजकीय घडामोडी पाहता, शिवसेना या सगळ्यात फसलीये असंच असल्याचं मत बीबीसी इंडियाचे डिजिटल संपादक मिलिंद खांडेकर यांनी व्यक्त केलं.

"शिवसेना नेते अरविंद सावंतांनी काल केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. म्हणजेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यास गंभीर आहोत, असं सेनेनं दाखवून दिलं. एवढं झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंब्याचं पत्र देईल, ही आशा त्यांना होती. मात्र, ते पत्र काही आलं नाही. याचा अर्थ आताच्या घडीला शिवसेनेची संधी गेलीये. मात्र ती पूर्ण गेली नाहीये. कारण ते पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात."

"ज्या आशेनं शिवसेनेनं भाजपला सोडलं होतं, ते आता या घडीला तरी होताना दिसत नाहीये. त्यामुळं शिवसेनेची स्थिती सध्या नाजूक आहे," असंही मिलिंद खांडेकर म्हणतात.

'शिवसेनेची अपरिपक्वता दिसून आली'

"आताच्या घडीला शिवसेनेची शंभर टक्के कोंडी झालीये. या सगळ्या घडामोडींमध्ये शिवसेनेची अपरिपक्वता दिसून आली," असं ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

प्रशांत दीक्षित यांनी म्हटलं, "जर शिवसेनेनं भाजपशी पहिल्या दिवसापासून ताणून धरलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोनही उद्धव ठाकरे उचलत नव्हते आणि त्याचवेळी संजय राऊत उघडपणे शरद पवारांना भेटत होते. मग या भेटींमध्ये त्यांनी काही चर्चा केली नाही का?"

"राजकीय पक्ष प्लॅन ए, प्लॅन बी तयार ठेवतो. शिवसेनेच्या इथेच दोन गोष्टी चुकल्या. एक म्हणजे, भाजपची साथ सोडताना सेनेकडे पुढची कुठलीच व्यूहरचना नव्हती आणि दुसरं म्हणजे भाजपसोबत वाटाघाटीच केली नाही. भाजपसोबतही वाटाघाटीही नीट केल्या नाहीत आणि राष्ट्रवादीसोबतही नीट चर्चा केली नाही. त्यामुळं आता कोंडीत पडल्यासारखं झालंय."

काँग्रेसनं पूर्णपणे सरेंडर होत सत्तेत सहभागी होणं, हीच गोष्ट फक्त शिवसेनेची कोंडी फोडू शकते, असं प्रशांत दीक्षित यांनी म्हटलं.

'शिवसेनेसमोर इकडे आड आणि तिकडे विहीर आहे'

काँग्रेस-राष्ट्रवादीचं शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काहीच ठरलं नाही, तर शिवसेना काय करेल, शिवसेना पुन्हा भाजपच्या जवळ जाईल का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

याबाबत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, "भाजपकडे जाणं म्हणजे शिवसेनेनं स्वत:ची खिल्ली उडवून घेण्यासारखं ठरेल आणि एकट्यानं वाटचाल करणं धोकादायक ठरेल. म्हणजे, शिवसेनेसमोर इकडे आड आणि तिकडे विहीर आहे."

तर ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणतात, "जर कुणीतरी मध्यस्थी करून शिवसेना-भाजपला जवळ आणण्याचा प्रयत्ना केला, तरी भाजप मुख्यमंत्रिपद सोडेल याची खात्री नाही. मग इतके दिवस का ताणून धरलं होतं, अशी टीका शिवसेनेवर होईल."

"शिवसेनेनं पुन्हा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न केल्यास भाजप ताणून धरेल. मुख्यमंत्रिपदापासून सर्वच ठिकाणी शिवसेनेला माघार घ्यावी लागेल. शिवसेनेला नमतं घ्यावेच लागेल," असंही राही भिडे म्हणतात.

नव्या समीकरणांसाठी धावाधाव

शिवसेनेच्या अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना आणि भाजपची युती 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर फिस्कटली आहे. केवळ राज्यातील युतीच नव्हे तर केंद्रातूनही सेना नेते अरविंद सावंत यांनी अवजड उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळं शिवसेना एनडीएतूनही बाहेर पडल्यात जमा झालीये.

भाजपशी युती तोडल्यानंतर शिवसेनेनं आपला मुख्यमंत्री करण्यासाठी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केलीये. याचाच भाग म्हणून काल (12 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मुंबईत बैठकही झाली. त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातही चर्चा झाली.

मात्र अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलं नसल्यानं सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)