शिवसेनेला पाठिंबा न देऊन काँग्रेसकडून सत्तास्थापनेत अडसर?

भाजपनं महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी असहमती दर्शवल्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेबद्दल विचारणा केली होती. त्यानुसार आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे बडे नेते राजभवनात दाखलही झाले होते. मात्र, बहुमताचा आकडा पार करण्याएवढी विधानसभा सदस्यसंख्या नसल्यानं शिवसेनेनं दावा केला नाही.

भाजपसोबतची युती तोडल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचा शिवसेनेचा मनसुबा असल्याचे समोर आले आहे. काल (11 नोव्हेंबर) संध्याकाळी साडेसातपर्यंत सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती.

या पार्श्वभूमीवर दिवसभर वेगवान राजकीय हालचाली झाल्या. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठकही झाली. राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचे वृत्त येत असतानाच काँग्रेसपाशी पाठिंब्याचं घोडं अडलं.

दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसची दीर्घ बैठक झाली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. पर्यायानं काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंब्याचं कुठलंही पत्र पाठवलं नाही. त्यामुळं शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही.

मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसवण्यासाठी भाजपसोबतची 30 वर्षांची मैत्री तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार झालेल्या शिवसेनेला ऐनवेळी काँग्रेसनं पत्र दिलं नाही. त्यामुळं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं आणि राजकीय हालचालीही तीव्र झाल्या.

काँग्रसेनं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न देण्यामागे नेमकं काय कारण असावं, असा स्वाभाविक प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. या प्रश्नाचा धांडोळा बीबीसी मराठीनं घेतला आहे.

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणतात, "शिवसेनेचा पूर्व इतिहास हाच काँग्रेससाठी मोठा अडथळा आहे. बाबरी मशिदीसारख्या अनेक मुद्द्यांवरून आगामी काळात काँग्रेसची मोठी अडचण होऊ शकते."

शिवसेनेनं त्यांच्या वाटचालीतला मोठा भाग मराठी आणि महाराष्ट्र या मुद्द्यांवर घालवला असल्यानं, मराठी भाषिकांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख अजूनही पुसली गेली नाहीये.

याबाबतच प्रधान म्हणतात, "शिवसेनेची 'मराठी'ची भूमिका आहे. त्यामुळं सेनेची भूमिका ही इतर भाषिकांबाबतची द्वेषाची राहिलीये. त्यामुळं संजय निरूपमांसारख्या नेत्यांचा सेनेसोबत जाण्यास विरोध आहे."

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमुळं काँग्रेस तळ्यातमळ्यात?

"दोन ते तीन वर्षात उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण देशात कमबॅक करायचं असल्यास उत्तर प्रदेश महत्त्वाचं असेल. सध्या सुरू असलेला राम मंदिराचा मुद्दा उत्तर प्रदेशात चालला नाही, तर देशभरात काँग्रेसला आशा निर्माण होऊ शकते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा आग्रह धरणाऱ्या सेनेसोबत युती केली, तर त्याच विपरित परिणाम काँग्रेसच्या संभाव्य यशावर होऊ शकतो," असं संदीप प्रधान म्हणतात.

मात्र, संदीप प्रधान असंही सांगतात, की काँग्रेसमधल्याच काही नेत्यांचं म्हणणं होतं की, देशभरात काँग्रेसला रोखणं आवश्यक आहे. याची सुरूवात महाराष्ट्रातून होऊ शकते. त्यामुळं भाजपव्यतिरिक्त इतर पक्ष एकत्र यायला हवं.

एकूणच वैचारिक मतदभेद आणि भविष्यकालीन पडसाद या मुद्द्यांमुळं काँग्रेसनं काल शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र दिलं नसावं, असं दिसतंय, असं प्रधान म्हणात.

माणिकराव ठाकरे-अजित पवारांचे आरोप-प्रत्यारोप

दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काल (11 नोव्हेंबर) झालेल्या बैठकीतल्या तपशीलाबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं, "काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. काल सकाळी शिवसेना नेतृत्त्वाशी काँग्रेस पक्षनेतृत्त्वाचा संपर्क झाला. त्यानंतरच खऱ्या अर्थानं चर्चेला सुरूवात झाली. काँग्रेस कार्यकारिणीत निर्णय झाल्यानंतर सोनिया गांधींनी शरद पवारांशी चर्चा केली. शरद पवारांनीच आधी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चेची भूमिका मांडली. त्यामुळं मग अंतिम निर्णय पुढे ढकलला."

"राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आज (12 नोव्हेंबर) संध्याकाळी बैठक होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा पुढे जात नाही, तोपर्यंत बहुमत होणारच नाही. गरज पडल्यास शिवसेनेसोबतही चर्चा करू," असंही माणिकराव ठाकरेंनी सांगितलं.

शरद पवारांमुळे अद्याप निर्णय झाला नसल्याचे माणिकराव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलं असलं तरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या विलंबाबद्दल काँग्रेस नेत्यांना जबाबदार धरलं आहे.

"काँग्रेसचे नेते जयपूरमध्ये होते आणि ते तिथून दिल्लीत गेले. अजूनही ते मुंबईत आल्याचं दिसत नाहीत. त्यामुळं चर्चेत अडचणी येत आहेत. काँग्रेस सोबत आली तरच मार्ग निघू शकतो. स्थिर सरकारसाठी सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एकवाक्यता असणं आवश्यक आहे."

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे कालच्या फिस्कटलेल्या चर्चेवरून आरोप-प्रत्यारोप करत असले, तरी मुंबईतली आज संध्याकाळची या दोन्ही पक्षांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

त्यामुळं आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णयापर्यंत पोहोचल्यास शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं जाईल का आणि राज्यपालांकडे शिवसेना व काँग्रेसच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी सत्तास्थापनेचा दावा करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महाराष्ट्रात नव्या समीकरणांची नांदी

शिवसेना आणि भाजपनं 2019 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढवली. या दोन्ही पक्षांची 1990 सालापासून म्हणजे 30 वर्षांपासून युती आहे. 2014 साली विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळल्यास गेल्या 30 वर्षांपासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुका खांद्याला खांदा लावून हे दोन्ही पक्ष लढले.

मात्र शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून शिवसेना आणि भाजपची युती 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर फिस्कटली आहे. केवळ राज्यातील युतीच नव्हे, तर केंद्रातूनही सेना नेते अरविंद सावंत यांनी अवजड उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळं शिवसेना एनडीएतूनही बाहेर पडल्यात जमा झालीये.

भाजपशी युती तोडल्यानंतर शिवसेनेनं आपला मुख्यमंत्री करण्यासाठी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू केलीये. याचाच भाग म्हणून काल (12 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात मुंबईत बैठकही झाली. त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातही चर्चा झाली.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांची वैचारिक बैठक वेगळी आहे. त्यामुळं एकत्रित येताना कुठल्या मुद्द्यांवर एकत्र येतात, हे पाहण्यासाठी महाराष्ट्राला उत्सुक आहे.

मात्र, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यास भाजप आणि शिवसेनेत एकही समान मुद्दा नाहीये. किंबहुना, त्यांच्यात मतभेद होणारे मुद्देच अनेक आहेत. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यास शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर वेळोवेळी अडचणच होईल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीलाही शिवसेनेची अडचण होईलच."

मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)