You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली पोलीस आणि वकिलांमध्ये सुरू असलेला वाद नेमका काय आहे?
राजधानी दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाबाहेर शनिवारी झालेल्या पोलीस आणि वकील यांच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनेचं रुपांतर आंदोलन आणि निषेधात झालं आहे.
मंगळवारी सकाळपासून आयटीओ इथल्या दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर प्रचंड संख्येत जमलेल्या पोलिसांनी वकिलांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली.
दुपारनंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलीस जॉईंट सीपी राजेश खुराणा यांनी आंदोलकांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. आंदोलनकर्त्यांनी 'वुई वाँट जस्टीस'च्या घोषणा दिल्या.
त्याआधी पोलीस हाताला काळी पट्टी बांधून घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वकीलांविरोधात आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनकर्त्या पोलिसांना पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी संबोधित केलं.
मात्र त्यांच्या बोलण्याने आंदोलनकर्ते थांबले नाहीत आणि त्यांनी पुन्हा घोषणाबाजीला सुरुवात केली. 'दिल्ली पुलिस कमिश्नर कैसा हो, किरण बेदी जैसा हो' अशा घोषणा दिल्या.
पोलिसांचं सुरू असलेलं आंदोलन आणि घोषणाबाजी हा आमच्यासाठी कसोटीचा काळ असल्याचं दिल्ली पोलीस कमिश्नर अमूल्य पटनायक यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, 'गेल्या काही दिवसांत दिल्लीत घडलेल्या काही घटना आम्ही योग्य पद्धतीने हाताळल्या आहेत. त्या घटनेपासून परिस्थितीत सुधारणा होत आहे. हा आमच्यासाठी परीक्षेचा काळ आहे. कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. कायद्याचे संरक्षक या नात्याने आमची भूमिका आहे. आम्ही हे लक्षात ठेवायला हवं. आम्ही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू. सरकार आणि जनतेच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आम्ही शिस्तबद्धपणे कायद्याचं रक्षण केलं आहे तसंच पुढेही करावं लागणार आहे'.
उच्च न्यायालय याप्रकरणाची चौकशी करत आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी पोलिसांना शांतता राखण्याची आणि कामावर परतण्याचं आवाहन केलं.
नक्की काय घडलं?
शनिवारी तीस हजारी न्यायालयात वकील आणि पोलीस यांच्यात पार्किंगवरून झालेल्या वादविवादानंतर बाचाबाची झाली.
"तिसऱ्या बटालियनचे जवान आणि काही वकील यांच्यात पार्किंगवरून वाद झाला. त्याचवेळी आणखी काही वकील तिथं आले. बदला घेण्यासाठी ते लॉकअपमध्ये येऊ इच्छित होते. आम्ही वकिलांना आत येण्यापासून रोखलं. आम्ही लॉकअप आतून बंद केले. आमचे जवान आणि न्यायालयात हजर झालेले कैदी यांना सुरक्षित ठेवलं. वकिलांना लॉकअप तोडायचं होतं. परंतु ते त्यांना करता आलं नाही. त्यांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गेटजवळच्या दोन-तीन बाईक्सना आग लावली. काही गाड्यांची तोडफोड केली. त्यावेळी वातावरण तापलं होतं," असं दिल्ली (उत्तर) अतिरिक्त डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितलं.
मात्र पोलिसांच्या म्हणण्याशी वकील सहमत नाहीत. पोलीस आणि वकील यांच्या वादावादीत एक सहकारी जखमी झाला असं वकिलांचं म्हणणं आहे. त्याला जवळच्या सेंट स्टीफन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
बार काऊंसिल ऑफ इंडियाचे चेअरमन मनन कुमार मिश्रा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, "पार्किंगच्या वादात पोलिसांनी वकिलांना चुकीची वागणूक दिली. पोलिसांनी निरपराध वकिलांवर फायरिंग केलं. बार काऊंसिल हे कदापी सहन करणार नाही. आरोपी पोलिसांना अटक करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. तसं झालं नाही तर परिस्थिती चिघळू शकते."
वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार त्यांच्या एका पत्रकारालाही तीस हजारी न्यायालयातील वकिलांनी मारहाण केल्याचं म्हटलं आहे. वकिलांचा जत्था पत्रकारांना वृत्तांकनापासून रोखत होता. पत्रकारांचे मोबाईलही हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)