You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे वाहतूक पोलिसांची दंडवसुली आता जीएसटीसकट : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया:
1. पुणे वाहतूक पोलिसांची दंडवसुली आता जीएसटीसकट
पुण्यात नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी-चारचाकी वाहने उचलल्यानंतर त्यावर पुन्हा 18 टक्के वस्तू व सेवाकर आकारला जाणार आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे. येत्या दहा जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
शहरामध्ये नो पार्किंगच्या ठिकाणी लावल्या जाणाऱ्या दुचाकीवर 200 रुपये दंड आणि टोईंगचे 50 असे 250 रुपये आकारले जातात. आता या रकमेवर 18 टक्के जीएसटी लागू होईल. त्यामुळे दंडाची रक्कम 295 रुपये होईल. तसंच चारचाकीसाठी 200 रुपये दंड आणि 200 रुपये टोईंग शुल्क आकारलं जातं. त्यात जीएसटीची भर पडल्यामुळे दंडाची एकूण रक्कम 472 होणार आहे.
2.निधी चौधरी यांची बदली
महात्मा गांधी यांच्याविषयी ट्विटरवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांची राज्य सरकारने सोमवारी बदली केली. त्यांची नियुक्ती मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात उपसचिवपदी करण्यात आली आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेल्या चौधरी यांना राज्य सरकारने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. या प्रकरणी टीका झाल्यानंतर त्यांनी ते ट्वीट मागे घेत गांधीजींबद्दल अपार श्रद्धा असल्याचं म्हटलं होतं.
त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारं पत्र शरद पवार आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. त्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली.
3. आशा वर्कर्सच्या मानधनात सात हजारांची वाढ
आंध्र प्रदेशमधील जगनमोहन सरकारने राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. त्यानुसार, पूर्वी 3 हजार रुपये वेतन घेणाऱ्या आशा वर्कर्सना आता 10 हजार रुपये वेतन मिळणार असल्याची बातमी लोकमतनं दिली आहे.
आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या बैठकीत जगनमोहन यांनी ही घोषणा केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले आहेत.
ग्रामीण स्तरावरील आशा वर्कर्स यांच्या कामाचे महत्व आणि त्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री जगनमोहन यांनी हा निर्णय घेतला आहे. जगनमोहन यांच्या प्रजा संकल्प यात्रेवेळी, काही आशा वर्कर्सने भेट घेऊन आपल्या समस्या जगनमोहन यांना सांगितल्या होत्या. त्यावेळी रेड्डी यांनी या आशा वर्कर्सना वेतनवाढीचे आश्वासन दिले होते.
4. मायावतींची स्वबळाची भाषा
लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन झालेल्या महागठबंधनमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चिन्हं आहेत. बसप प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या 11 जागांवरील पोटनिवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयार राहण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे.
2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 403 जागांवर लढण्याचंही सूतोवाच केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
पोटनिवडणुका लढण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण 2007 चा अपवाद वगळता बसपनं फारशा पोटनिवडणुका लढवल्या नाहीत.
कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीत मायावतींनी कोणावरही अवलंबून राहू नका, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. तसंच समाजवादी पक्षाच्या कामगिरीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
5. शिक्षकांच्या बदल्या नकोत
शिक्षकांच्या बदल्यांमुळे शाळांचं नुकसान होत असल्याचं निरीक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरण आराखड्यात नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे अपवादात्मक परिस्थिती वगळता शिक्षकांच्या बदल्या करण्यात येऊ नयेत अशी शिफारस या धोरणात करण्यात आल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
माध्यान्ह भोजन आणि निवडणुकीच्या कामांमुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचंही मसुद्यात म्हटलं आहे.
शिक्षणबाह्य कामांमुळेही शिक्षक अध्यापनावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. शिक्षकांवर माध्यान्ह भोजनाचे हिशोब ठेवणं, निवडणूक आणि इतर प्रशासकीय कामं लादली जातात. त्याचाही गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो, अशी टिप्पणी या मसुद्यात करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)