प्रमिला बिसोई : अंगणवाडीत स्वयंपाकीण ते आता लोकसभेतील खासदार

यावेळच्या म्हणजेच 17 व्या लोकसभेमध्ये तब्बल 78 महिला खासदार निवडून आलेल्या आहेत. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

यामध्ये राहुल गांधींना हरवणाऱ्या स्मृती इराणी आहेत आणि सगळ्यांत तरूण ठरलेल्या चंद्राणी मुर्मूसुद्धा आहेत.

पण यासोबतच चर्चेत आहेत ओडिशाच्या खासदार प्रमिला बिसोई. कारण त्या यापूर्वी अंगणावाडीमध्ये स्वयंपाक करण्याचं काम करायच्या. त्यानंतर त्यांनी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यासाठी भरपूर काम केलं.

साडी, कपाळावर टिकली, भांगामध्ये शेंदूर आणि नाकात पारंपरिक नथ घातलेल्या 70 वर्षांच्या प्रमिला बिसोई यांना ओडिशातल्या अस्का मतदारसंघातून बिजू जनता दल (बीजेडी) कडून तिकीट देण्यात आलं आणि त्या तब्बल 2 लाखांच्या मताधिक्याने निवडून आल्या.

स्थानिक लोक प्रेमाने त्यांना 'परी माँ' म्हणतात. बचतगटातली एक सामान्य महिला ते एक खासदार होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे.

प्रमिला फक्त 5 वर्षांच्या असताना त्यांचं लग्न लावून दिलं गेलं. म्हणून मग पुढे फारसं शिक्षण त्यांना घेता आलं नाही.

यानंतर प्रमिला यांनी गावतल्याच अंगणवाडीमध्ये स्वयंपाकीण म्हणून काम करायला सुरुवात केली. मग त्यांनी गावामध्येच एका बचतगटाची सुरुवात केली. त्यात त्यांना यश मिळालं आणि मग त्या ओडिशामधल्या महिला बचतगटांच्या 'मिशन शक्ती'च्या प्रतिनिधी झाल्या.

बीजेडी सरकारने प्रमिला बिसोईंना आपल्या मिशन शक्ती या महत्त्वाकांक्षी योजनेचा चेहरा बनवलं. तब्बल 70 लाख महिलांना या योजनेचा फायदा झाल्याचा दावा करण्यात येतो.

"मिशन शक्तीमध्ये सहभागी झालेल्या लाखो महिलांसाठी ही एक भेट आहे," असं म्हणत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मार्चमध्ये प्रमिला बिसोई यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.

यापूर्वी छापून आलेल्या माहितीनुसार प्रमिला यांचे पती हे चतुर्थ श्रेणीतले सरकारी कर्मचारी होते. त्यांचा मोठा मुलगा दिलीप यांचं चहाचं दुकान आहे आणि धाकटा मुलगा रंजन यांचा गाड्या दुरुस्त करण्याचा धंदा आहे. पत्र्याचं छप्पर असलेल्या एका लहानशा घरात हे कुटुंब राहतं.

त्यांचे शेजारी जगन्नाथ गौडा त्यांना बालपणापासून ओळखतात. ते म्हणतात, "त्या फक्त तिसरीपर्यंत शिकलेल्या आहेत, पण त्यांनी आसपासच्या गावांतल्या गरीब महिलांचं आयुष्य बदललं. गेली 15 वर्षं त्या समाजसेवा करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी गावामध्ये एक इको पार्कही बनलंय."

कमी शिकलेल्या असल्या तरी प्रमिला यांच्याकडे नेतृत्त्वगुण आहेत आणि सामाजिक घडामोंडीवर कविता करण्यात त्या पटाईत असल्याचं जगन्नाथ सांगतात. महिलांना प्रेरित करण्यासाठी त्या ही गाणी गाऊनही दाखवतात.

प्रमिला यांचं शेत एक एकरापेक्षा लहान असून अनेकदा त्या स्वतः त्या शेतात काम करत असल्याचं जगन्नाथ सांगतात.

बचत गटांमध्ये सहभागी असणाऱ्या महिला प्रमिला यांना आई मानत असल्याचं त्यांच्यासोबत बचतगटाचं काम करणाऱ्या शकुंतला सांगतात. प्रमिला यांच्या सांगण्यावरूनच 10 वर्षांपूर्वी शंकुतलाच्या गावातल्या 14 महिलांनी मिळून एक बचतगट सुरू केला होता.

या महिलांनी मका, शेंगदाणा आणि भाज्यांची शेती सुरू केली आणि यामुळे त्यांचं उत्पन्न बरंच वाढलं.

प्रमिला यांना नीट हिंदी बोलता येत नाही. पण फक्त हिंदी किंवा इंग्रजी बोलता येणाऱ्यांनाच राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात सफल होता येतं यावर आपला विश्वास नसल्याचं प्रमिला यांनी 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

त्या म्हणाल्या, "मी संसदेत माझी मातृभाषा उडियामध्ये अगदी अभिमानाने बोलेन."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)