You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मिरात खरंच दगडफेक करणाऱ्यांवर जवानांनी कुत्रे सोडले? : बीबीसी फॅक्ट चेक
- Author, सुरप्रीत अनेजा
- Role, बीबीसी फॅक्ट चेक टीम
सैन्यदलाचे दोन कुत्रे काश्मिरात एका दगडफेक करणाऱ्या व्यक्तीवर धावून जात आहेत, अशा प्रकारचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, "दगडफेक करणाऱ्या एका काश्मिरी मुसलमान तरूणाने सैन्याच्या दोन कुत्र्यांवर दगडफेक केली. कुत्रे शासनाच्या परवानगीची वाट पाहात नसल्याने त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं."
हा व्हीडिओ 70,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.
या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती कुत्र्यांच्या अंगावर काहीतरी फेकताना दिसते. हे कुत्रे बांधलेले नाहीत आणि व्हीडिओत ते हिंस्रपणे त्या व्यक्तीवर हल्ला करताना दिसतात.
हा व्हीडिओ खरा आहे, पण संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे. आमच्या पडताळणीत आम्हाला आढळून आलं की या व्हीडिओबाबत केले जाणारे दावे खोटे आहेत.
नक्की सत्य काय?
आम्हाला लक्षात आलं की हा व्हायरल व्हीडिओ 2013 सालचा आहे आणि उत्तर आफ्रिकेतल्या मोरोक्को देशातला आहे.
या व्हीडिओतल्या की फ्रेम्सच्या इमेजेसचा रिव्हर्स सर्च केल्यानंतर आम्ही 'युट्यूब' आणि 'डेलिमोशन' पाशी पोहचलो.
या व्हीडिओनुसार दोन कुत्र्यांनी मोराक्कोमधल्या कॅसाब्लांकामध्ये एका माणसावर हल्ला केला.
या व्हीडिओत ज्या गोष्टींचा उल्लेख आहे, त्या गुगलमध्ये शोधल्यानंतर आम्हाला 2013 मध्ये घडलेल्या या घटनेचे अनेक रिपोर्ट्स सापडले.
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, एका मोराक्कन माणसाला रस्त्यावर दोन मोठे कुत्रे दिसल्याचा राग आला. त्याने त्या कुत्र्यांवर आणि त्यांच्या मालकावर दगडफेक केली. पण याचा परिणाम काय होईल याचा अंदाज त्याला आला नाही.
त्याने कुत्र्यांना दगड मारायला सुरुवात करताच कुत्रे मालकाच्या हाती असलेली दोरी तोडून पळाले आणि त्यांनी त्या माणसावर हल्ला केला.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर IPS डी रूपा यांनी ट्वीट केलं, "भारतात, पोलीस आणि सैन्यदल गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी कुत्र्यांचा वापर करत नाहीत. अर्थात इतर काही देशात असा वापर होतो. आपल्याकडे दोन गोष्टींसाठी कुत्र्यांचा उपयोग होतो, एक म्हणजे चोर-लुटारुंचा माग काढण्यासाठी आणि स्फोटकांचा वास घेत ते शोधण्यासाठी. याचाच अर्थ हा व्हीडिओ भारतातला नाही. "
बीबीसीने निवृत्त IPS अधिकारी डॉ. विक्रम सिंग यांच्याशी बातचित केली आणि त्यांना विचारलं की आपल्याकडचे पोलिसांचे कुत्रे असे दोरी सोडून कोणाच्याही अंगावर सोडता येतात का?
त्यावर ते म्हणाले, "आपल्याकडे कुत्रे फक्त सुरक्षेच्या कारणासाठी, विमानतळांवर किंवा स्फोटकं शोधण्यासाठी वापरले जातात. आम्ही आमच्या हातातली कुत्र्यांची दोरी कोणत्याही परिस्थिती काढत नाही. कुत्र्यांची दोरी सोडण्याची पद्धत पूर्वीच्या सोव्हिएत रशियात आणि दक्षिण आफ्रिकेत होती. भारतात असं काही करण्याचा प्रश्नच नाही."
एका म्हाताऱ्या माणसावर कुत्र्याने हल्ला केला असाही व्हीडिओ शेअर केला जातोय. त्यासोबत पोस्ट लिहिली आहे की, काश्मिरातल्या या माणसावर हल्ला केला म्हणून दुसऱ्या व्यक्तीने सैन्यदलाच्या कुत्र्यांवर दगडफेक केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)