मोदी सरकारने परदेशात 200 टन सोनं पाठवलं का? - फॅक्ट चेक

    • Author, फॅक्ट चेक
    • Role, बीबीसी न्यूज

मोदींनी सत्तेवर येताच रिझर्व्ह बँकेत असलेलं 200 टन सोनं परदेशात पाठवलं असा दावा सोशल मीडियावर लोक करत आहेत.

बीबीसीच्या अनेक वाचकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला अनेक बातम्यांची कात्रणं आणि स्क्रीनशॉट्स पाठवले. त्यात हा उल्लेख आहे.

अनेक लोकांनी आम्हाला नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या स्टोरीची लिंक पाठवली. ही स्टोरी काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून ट्वीट केली आहे.

नवनीत चतुर्वेदी नावाच्या एका व्यक्तीच्या आरोपांच्या आधारावर ही बातमी लिहिली आहे.

"सत्तेवर येताच मोदी सरकारने 200 टन सोनं विदेशात पाठवलं का?" असा मथळा या वृत्तपत्रात आला आहे?

रिझर्व्ह बँकने हा दावा फेटाळून लावला आहे.

रिझर्व्ह बँकेचे चीफ जनरल मॅनेजर योगेश दलाल यांनी मते 2014 नंतर सोन्याचा कोणताही भाग त्यांनी परदेशात पाठवलेला नाही असं स्पष्ट केलं.

अफवा आणि आरोप

दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघात नामांकन दाखल केलेल्या नॅशनल युथ पार्टीचे उमेदवार नवनीत चतुर्वेदी यांनी 1 मे 2019 ला बुधवारी एक ब्लॉग लिहिला.

मोदी सरकारने विरोधी पक्षाला कोणतीही माहिती न देता किंवा कोणतीही सार्वजनिक सूचना न देता रिझर्व्ह बँकेचं 200 टन सोनं गहाण ठेवलं असं स्वत:ला एक शोध पत्रकार म्हणवणाऱ्या नवनीत यांनी म्हटलं आहे.

एका माहितीच्या आधारे त्यांनी लिंक्डइनवर हा ब्लॉग लिहिल्याचं सांगितलं.

नवनीत यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये माहितीच्या अधिकाराची जी प्रत शेअर केली आहे त्यानुसार भारताचं 268.01 टन सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स च्या ताब्यात आहे.

मात्र ही माहिती लपवलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर 6 जुलै 2018 ला फॉरेन रिझर्व्ह विभागात ही माहिती छापली आहे.

परदेशात असलेलं भारतीय लष्कर

सोशल मीडियावर शेअर होत असलेली बॅलन्स शीट ही जुनी आहे. ही काही गुप्त सूचना नाही. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर ही माहिती दिसते.

नवनीत यांच्या मते, "2014 च्या आधीच्या बॅलन्स शीटमध्ये असं लिहिलं आहे की परदेशात ठेवलेल्या सोन्याची किंमत शून्य आहे. 2014-15 च्या बॅलन्स शीटमध्ये असा उल्लेख नाही."

मात्र आमच्या पडताळणीत असं लक्षात आलं की 2013-14 आणि 2014-15 च्या प्रारुपात बदल झाल्यामुळे हा भ्रम पसरला आहे.

योगेश दलाल यांच्या मते जगातल्या केंद्रीय बँकासाठी अशा पद्धतीने सोनं दुसऱ्या बँकात ठेवणं ही अतिशय सामान्य बाब आहे.

याबाबतीत आम्ही नाणेतज्ज्ञ एन. सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत केली.

त्यांनी सांगितलं विदेशातल्या बँकातलं सोनं गहाण असतंच असं नाही. दुसऱ्या देशात असं सोनं ठेवणं ही अतिशय सामान्य बाब आहे. अशा पद्धतीने ठेवलेलं सोनं ज्या देशाने ठेवलं त्याच देशाच्या मालकीचं असतं.

सप्टेंबर 2018 मध्ये RBI ने जारी केलेल्या अहवालानुसार भारताकडे 586.44 टन सोनं आहे. त्यातील 294.14 टन सोनं परदेशी बँकात आहे.

RBI च्या मते हे सोनं गहाण नाही.

1991 मध्ये भारताने सोनं गहाण ठेवलं

आखाती युद्धानंतर महागाई आणि राजकीय अनिश्चितता यांच्या मते 1991 मध्ये परदेशी चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागला आहे.

त्यावेळी भारताची परिस्थिती अशी होती की काही आठवडेच आयातीसाठी पैसा होता. त्यावेळी पैसा उभा करण्यासाठी भारताला 67 टन सोनं गहाण ठेवावं लागलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)