You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Pakistan IAF Strikes: जैश-ए-मोहम्मदचा कँप खरंच उद्ध्वस्त झाला होता का? - फॅक्ट चेक
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
भारतीय वायुदलाने 26 फेब्रुवारीच्या पहाटे पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई कारवाई केल्याचं सांगितलं. 14 फेब्रुवारीच्या पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या 'जैश-ए-मोहम्मद' या कट्टरतावादी संघटनेचा तळ हे या हल्ल्याचं लक्ष्य होतं, असं नंतर भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी स्पष्ट केलं. ही कारवाई यशस्वी झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
पण लगेचच पाकिस्तानने या हल्ल्यात कुठलंही नुकसान झालं नाही, असा दावा केला. एका रिकाम्या जागी पडलेल्या काही बाँबमुळे फक्त काही झाडांचं नुकसान झालं, असा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला होता.
तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये या हल्ल्याचं यश-अपयश सिद्ध करण्यासाठी चढाओढ लागली आहे. एकीकडे पाकिस्तानचा दावा आहे की पाकिस्तानी वायुदलाच्या विमानांनी भारतीय वायुदलाचे विमान परतवून लावले तेव्हा बालाकोटच्या जाबा टॉप गावात भारतीय वायुदलाने बाँब टाकले. त्यांना लक्ष्य साधण्यात अपयश आलं, असा पाकिस्तानचा दावा आहे.
दुसरीकडे, हवाई दलाने सीमा ओलांडून केलेली कारवाई पूर्णपणे यशस्वी ठरली असून, निश्चित लक्ष्य साधण्यात यश आलंय, असं भारताकडून वारंवार सांगितलं जात आहे.
पण भारत सरकारचे विरोधक या दाव्यावर संतुष्ट नाहीत. या हल्ल्याचा ते वारंवार पुरावा मागत आहेत. नेमके किती लोक मारले गेले, याचा स्पष्ट आकडा मागत आहेत.
या हल्ल्यात 250 कट्टरवादी मारले गेल्याचं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले तर केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनी 400जण मारले गेल्याचा दावा केला.
दरम्यान, वायुदलाने म्हटलं आहे की आमचं काम मोहीम फत्ते करणं होतं. लक्ष्य गाठण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, मात्र किती मारले गेले, याची आकडेवारी जाहीर करणं आमचं काम नाही.
त्यातच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी एका हिंदी टीव्ही चॅनलची क्लिप ट्वीट करत या हल्ल्यामुळे जैशच्या तळाचं झालेलं नुकसान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या क्लिपमध्ये जाबा टॉप परिसराची सॅटलाईट फोटो दाखवण्यात आले आहेत, जे भारतीय वायुदलाच्या कारवाईच्या आधीचे, म्हणजे 26 फेब्रुवारीच्या आधीचे आणि नंतरचे आहेत.
"भारतीय वायुदलाने पाकिस्तानातला दहशतवादी ट्रेनिंग कँप उद्ध्वस्त केल्याचं या फोटोतून स्पष्ट दिसतं," असं लिहून त्यांनी हा व्हीडिओ ट्वीट केला आहे.
हा व्हीडिओ आतापर्यंत शेकडो लोकांनी शेअर केला आहे आणि हजारो लोकांनी तो पाहिला आहे, मग ते फेसबुकवर असो, युट्यूबवर किंवा ट्विटरवर. "भारतीय हल्ल्यात जैशचा कँप नष्ट झाला, हा घ्या पुरावा," अशा आशयाच्या ट्वीटसह हा व्हीडिओ अनेकांनी शेअर केला आहे.
पण सत्य सिद्ध करण्याचा दावा करणारा हा व्हीडिओ संशयास्पद आहे.
फोटोंचं सत्य काय?
गिरीराज सिंह यांनी ट्वीट केलेल्या व्हीडिओमध्ये ज्या दोन सॅटेलाइट इमेजेस जवळजवळ ठेवून त्यांची तुलना करून दाखवली जात आहे.
यातील एक फोटो 23 फेब्रुवारीचा आहे, म्हणजे भारताच्या हवाई कारवाईपूर्वीचा आणि दुसरा 26 फेब्रुवारीचा, म्हणजे कारवाईनंतरचा असल्याचा दावा केला जात आहे.
'या दुसऱ्या फोटोमध्ये हवाई हल्ल्यामुळे एका इमारतीचं कसं नुकसान झालं आहे, असं दिसतंय', असा दावा करण्यात आला आहे. पण या दुसऱ्या फोटोला 'रिव्हर्स इमेज सर्च' करून पाहिल्यावर हा फोटो गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर असल्याचं लक्षात येतं.
तसंच रॉयटर्सने काही दिवसांपूर्वी या जागेच्या दाखवलेल्या सॅटेलाईट फोटो आणि या फोटोंमध्ये साधर्म्य नाही.
या व्हीडिओमध्ये सांगण्यात आलेले कोऑर्डिनेट्स (अक्षांश-रेखांश) तपासले तर हा फोटो Zoom Earth या सॅटेलाईट फोटोंच्या वेबसाईटवरचा असल्याचं कळतं. मायक्रोसॉफ्ट बिंग मॅप्सच्या सहाय्याने ही Zoom Earth नावाची वेबसाइट काम करते.
Zoom Earthचे संस्थापक पॉल नीव्ह यांनी बीबीसीला सांगितलं की या फोटोचा आणि भारताच्या हवाई कारवाईचा काहीही संबंध नाही.
बीबीसी प्रतिनिधी प्रशांत चाहल यांच्याशी बोलताना ते म्हणाले, "हा फोटो याच परिसरातला असू शकतो, पण तो खूप जुना आहे. कदाचित या फोटोमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत आहे, असं दिसतंय,"
फक्त NASA चे फोटो रोज अपडेट केले जातात, पण बिंग मॅप्सवरचे फोटो रोज अपडेट केले जाऊ शकत नाहीत. ते अनेक वर्षं जुने असू शकतात, असंही ही वेबसाइट सांगते.
पॉल नीव्ह यांनी जाहीर ट्वीट करूनही फोटो संदर्भातील दावे खोटे असल्याचं सांगितलं. 'आमच्या वेबसाइटवर सॅटलाईट इमेजेस अपडेट व्हायला कधीकधी अनेक वर्ष लागतात', असंही ते म्हणाले.
Zoom Earth वर आपण काही वर्षांचा काळ टाकून एखाद्या जागेचा त्या काळातील सॅटेलाईट मॅप मिळवू शकतो. आम्ही '2015 ते 2019' असा काळ टाकून पाहिला, तेव्हा आम्हाला हाच फोटो उपलब्ध झाला.
आता या पहिल्या फोटोचा विचार करू. हा फोटो आजही गुगल मॅप्सवर उपलब्ध आहे. जर तुम्ही बालाकोट असं शोधलंत, तर हा फोटो पुढे येतो. त्यामध्ये ही इमारत अगदी शाबूत आहे.
गुगल मॅप्सवर ही जागा सध्या एक मुलींची सरकारी शाळा असल्याचं दिसत आहे. शिवाय, आता काही लोक या फोटोवर जाऊन त्या जागेला JeM Madrasa आणि Jaish Training School असं टॅग करत आहेत, जे कुणीही करू शकतं. अशा टॅग्सची वेगळी शहानिशा करून काही आक्षेपार्ह किंवी चुकीचं आढळल्यास गुगल मॅप्स ते बदलू शकतं.
पण जर खरंच या ठिकाणी कुठला बाँब हल्ला झाला होता तर मग गुगलवर त्या जागेचं सॅटलाईट चित्र का बदललं नाही, असाही सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित केला जात आहे
असे काही प्रश्न गिरीराज सिंह यांनी ट्वीट केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
(तुमच्याकडेही येणाऱ्या बातम्या, फोटो, व्हीडिओ संशयास्पद किंवा खोटेआहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांची पडताळणी करायला +91-9811520111वर व्हॉट्सअॅप पाठवा. किंवा इथं क्लिक करून बीबीसीला पाठवा.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)