You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बालाकोट हल्ल्यातल्या मृतांचा आकडा किती? कोण काय म्हणतंय? - सोशल
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती जण ठार झाले, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू आहे. या आकडेवारीवर अनेकांनी विविध मतं प्रदर्शित केली आहेत. यांतील काही वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
काय आहेत ही वक्तव्यं?
"पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये २५०हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत." - अमित शहा, भाजप अध्यक्ष
"भारतीय वायुसेनेचा निशाणा कधीच चुकू शकत नाही. किती मेलेत ही संख्या ज्यांना जाणून घ्यायची आहे, त्यांनी पाकिस्तानात जाऊन संख्या मोजावी." - राजनाथ सिंह, गृहमंत्री
"रात्री साडेतीन वाजता डासांची संख्या खूप होती. त्यामुळे मग मी HIT मारलं. आता त्यामुळे किती डास मेले हे मोजत बसू की निवांत झोपी जाऊ? - व्ही. के. सिंग, परराष्ट्र राज्यमंत्री
"पुढच्या वेळी भारतानं जर काही केलं, तर मला वाटतं विरोधक जे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यांना विमानाच्या खाली बांधून नेलं पाहिजे. जेव्हा बॉम्ब सोडणार असतील तेव्हा टार्गेट बघून घेतील. त्यानंतर त्यांना तिथेच उतरवलं पाहिजे. यानंतर त्यांनी मोजणी करावी आणि परत यावं," असं व्ही. के. सिंग यांनी म्हटलं आहे.
"बालाकोट येथे भारतानं केलेला हवाई हल्ला ही लष्करी कारवाई नव्हती, तर ती निर्लष्करी कारवाई होती. त्यामुळे मृतांचा आकडा दिला नाही."- निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री
"पाकिस्तानमधील भारताच्या कारवाईचा उद्देश मेसेज देणं हा होता, कुणाचा जीव घेणं हा नव्हता." - एस. एस. अहलुवालिया, केंद्रीय मंत्री
यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "अमित शहा म्हणत आहेत की 250 जण मारले गेले. याचा अर्थ अमित शहा लष्कराला चूक ठरवत आहेत. देश कोणत्याच स्थितीत हे सहन करू शकणार नाही."
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "अमित शाह यांच्या मते लष्कर खोटं बोलत आहे का? निवडणुकीच्या फायद्यासाठी अमित शाह आणि भाजप लष्काराला खोटं ठरवत आहेत," असं ते म्हणाले.
"किती जण मारले गेले याचा आकडा वायुसेना मोजत नाही." - बी. ए. धनोआ, एअर चीफ मार्शल
याचाच संदर्भ देत पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी अमित शहा यांना ही संख्या कशी समजली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे नेते मनीष तिवारी म्हणतात, "वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी आर. जी. के. कपूर यांनी मृतांसंदर्भात काही आकडा जाहीर करणं घाईचं होईल, असं म्हटलं होतं. तर आता अमित शाह म्हणतात या कारवाईत 250 जण मारले गेले. हा हवाई हल्ल्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न नाही का?"
भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचे काही तर पुरावे मोदी सरकारने द्यावे, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
"पंतप्रधान मोदींनी हल्ला केल्यानंतर विरोधी नेत्यांची एक साधी बैठकही बोलावली नाही. त्यातच अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की भारताने केलेल्या हल्ल्यात एकही जण मारला गेला नाही, तर काही वृत्तांनुसार एकाचा जीव गेला आहे. मग अशात मोदी सरकारने पूर्ण माहिती द्यावी. नाहीतर असं वाटतंय की मोदी जवानांच्या रक्ताचं राजकारण करत आहेत. कुणी जवानांबरोबर असं कसं करू शकतं?" - ममता बॅनर्जी
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)