Ind vs Ban: भारतातील पहिला डे-नाईट कसोटी सामना कसा असेल?

तुम्हाला माहितीये, भारतात डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार आहे?

होय, भारतीय भूमिवर 22 नोव्हेंबरपासून पहिली डे-नाईट टेस्ट होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यानच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोलकातामध्ये होणारा दुसरा कसोटी डे-नाईट स्वरूपात खेळवला जाईल, याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तसंच त्यांच्या संघाने डे-नाईट कसोटी खेळण्याची तयारी दर्शवल्याबद्दल सौरव गांगुली यांनी त्यांचे आभार मानले.

सौरव गांगुली म्हणाले, "ईडन गार्डन्स मैदानावर पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार आहे, याचा मला अभिमान वाटत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि त्यांच्या संघाने इतक्या कमी कालावधीत माझी विनंती मान्य केली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही सहकार्य केल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो."

आतापर्यंत 11 डे-नाईट कसोटी सामने

BCCIची धुरा हाती घेतल्यानंतर सौरव गांगुलीने प्रेक्षकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून डे-नाईट कसोटी सामन्यांचे आयोजन करण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

डे-नाईट कसोटी सामन्यात लालऐवजी गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येतो. तर मैदानात काळ्या रंगाचे 'साईडस्क्रीन' वापरले जातात.

क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 11 डे-नाईट कसोटी खेळवण्यात आले आहेत. पण भारत आणि बांगलादेशने आतापर्यंत एकही डे-नाईट कसोटी सामना खेळलेला नाही.

सुमारे साडेचार वर्षांपूर्वी पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान अॅडलेड मैदानावर हा सामना झाला होता. या सामन्या ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून विजय मिळवला होता.

ईडन गार्डनवर घडणार इतिहास

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने पाच, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी तीन, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी दोन तर झिंम्बाब्वेने एक डे-नाईट कसोटी सामना खेळला आहे.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर यापूर्वीही अनेक इतिहास रचले गेले आहेत. ईडन गार्डन्स मैदान आशिया खंडातील सर्वात जुनं क्रिकेटचं मैदान म्हणून ओळखलं जातं. इथं पहिला कसोटी सामना 5 जानेवारी 1934 ला भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान झाला होता.

इंग्लंडबाहेर पहिल्यांदा झालेल्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामनासुद्धा ईडन गार्डन्स मैदानावरच खेळवला गेला होता. हा सामना 8 नोव्हेंबर 1987 रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदाच जगज्जेता बनला होता.

याच मैदानावर एशियन टेस्ट चॅँपियनशिपचा पहिला सामना 16 फेब्रुवारी 1999 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)