You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Ind vs SA: रांची टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसीने का आणला 'प्रॉक्सी कॅप्टन'?
क्रिकेटमध्ये टॉसला निर्णायक महत्त्व असतं. भारतीय उपखंडात होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या वेळी टॉसभोवती लक्ष केंद्रित होतं, कारण पाचव्या दिवशी भेगाळलेल्या पिचवर बॅटिंग करणं कुणालाच नकोसं असतं.
दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन कसोटींसाठी भारत दौऱ्यावर आहे. पुणे आणि विशाखापट्टणममध्ये झालेले कसोटी सामने जिंकत भारतीय संघाने मालिका जिंकली.
सातत्याने टॉस हरत असल्याने आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसीने शनिवारपासून रांचीत सुरू झालेल्या टॉसवेळी तेंबा बावुमा या खेळाडूच्या रूपात चक्क प्रॉक्सी कॅप्टन आणला.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने कॉइन उडवलं, आफ्रिकेचा अधिकृत कर्णधार फाफ डू प्लेसी असतानाही, बाजूला उभ्या असलेला प्रॉक्सी कर्णधार तेंबा बावुमाने कौल सांगितला. पण हा प्रॉक्सी कॅप्टन दक्षिण आफ्रिकेचं नशीब बदलू शकला का?
टॉसचा इतिहास
रांचीमध्ये आज सुरू झालेली टेस्ट दक्षिण आफ्रिकेची आशिया खंडातील 50वी कसोटी आहे. यापैकी 27 कसोटीत दक्षिण आफ्रिकेला टॉसच्या बाबतीत नशिबाने साथ दिलेली नाही. यापैकीच गेल्या 11 कसोटींपैकी 10मध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस गमावलाय. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसी मागच्या सहा कसोटीत टॉस हरला आहे.
त्यामुळे रांची कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत फाफ डू प्लेसी म्हणाला होता, "टॉसच्या बाबतीत माझं नशीब नाही. उद्या टॉससाठी कुणाला तरी घेऊन जाण्याचा विचार आहे."
फाफ गंमतीत असं म्हणाला असावा, असं पत्रकारांना वाटलं होतं. मात्र रांची कसोटीच्या टॉससाठी फाफने खरंच उपकर्णधार तेंबा बावुमाला सोबत नेलं.
टॉसच्या वेळी मॅचरेफरी उपस्थित असतात. एरव्ही दोन कर्णधार आणि मॅचरेफरी यांच्या उपस्थितीत टॉस होतो. मात्र शनिवारी सकाळी टॉसवेळी चार माणसं पाहायला मिळाली. टॉसचं अँकरिंग करण्यासाठी आलेला समालोचक मुरली कार्तिकही या प्रकाराने चक्रावून गेला.
आफ्रिकेच्या वतीने बावुमाने कौल सांगितला. मात्र बावुमाचा कौलही आफ्रिकेचं टॉस नशीब बदलू शकला नाही. टॉसचा निर्णय कळल्यावर विराट कोहलीही आपलं हास्य लपवू शकला नाही. त्याने बॅटिंगचा निर्णय घेतला.
अंधश्रद्धा का गांभीर्याचा अभाव?
काही महिन्यांपूर्वी झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला बाद फेरी गाठता आली नव्हती. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वसाधारण कामगिरीनंतर आफ्रिकेच्या कोचिंग यंत्रणेत बदल करण्यात आले. ट्वेन्टी-20 कर्णधार बदलण्यात आला. फाफ डू प्लेसी टॉस हरत असल्याने दक्षिण आफ्रिकेने वेगळ्या खेळाडूंद्वारे टॉसचा कौल सांगण्याचा प्रयत्न केला.
भारतात होत असलेल्या कसोटी सामन्यात टॉस महत्त्वाचा असतो, मात्र टॉसइतकीच संघाची कामगिरीही महत्त्वाची असते. प्रॉक्सी कॅप्टन आणून दक्षिण आफ्रिकेने एकप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं, असा आरोप होऊ शकतो. कामगिरी उंचावत दक्षिण आफ्रिकेला सन्मान वाचवण्याची संधी आहे. मात्र प्रॉक्सी कॅप्टन आणून त्यांनी हसं करून घेतलं.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ समालोचनाच्या निमित्ताने रांचीतच आहे. "जे घडलं ते आंतरराष्ट्रीय दर्जाला धरून नाही. असले प्रकार घडू नयेत," असं परखड मत स्मिथने नोंदवलं.
गेल्याच महिन्यात महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग संघसहकारी अॅलिसी पेरीला घेऊन आली होती. परंतु पुरुषांच्या क्रिकेटमध्ये असा प्रकार ऐकिवात नाही. टॉसवेळी दोन्ही संघांचे अधिकृत कर्णधार उपस्थित असतात.
आफ्रिकेचा संघ संक्रमणावस्थेत
2015मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. वनडे सीरिजमध्ये दमदार प्रदर्शनानंतर टेस्ट सीरिजमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्या संघात हशीम अमला, एबी डी'व्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, मॉर्ने मॉर्केल यांचा समावेश असूनही आफ्रिकेच्या संघाने भारताच्या फिरकीसमोर शरणागती पत्करली होती. या सगळ्या खेळाडूंनी निवृत्ती पत्करली आहे.
आफ्रिकेचा आधारस्तंभ असलेल्या डेल स्टेनने टेस्टमधून निवृत्ती स्वीकारली आहे. दक्षिण आफ्रिकेचे बहुतांश खेळाडू पहिल्यांदाच भारतात खेळत आहेत. भारतीय खेळपट्यांवर खेळण्याचा पुरेसा अनुभव नसल्याने आफ्रिकेच्या बॅट्समनची दाणादाण उडताना दिसत आहे.
कोलपॅक डीलचा फटका
न्याय हक्कांसाठी तयार झालेला एका तांत्रिक नियमामुळे दक्षिण आफ्रिकेचं नुकसान होत आहे. या नियमाचं नाव आहे कोलपॅक. गेल्या पंधरा वर्षात दक्षिण आफ्रिकेने चाळीसहून अधिक खेळाडू कोलपॅकच्या निमित्ताने गमावले आहेत.
युरोपियन युनियनचा भाग असलेल्या देशातील नागरिक या युनियनमधल्या देशांमध्ये परदेशी न ठरता काम करू शकतात. म्हणजेच जर्मनीचा एखादा खेळाडू फ्रान्समध्ये कोलपॅक करार स्वीकारून स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकतो.
पण खरी मेख वेगळीच आहे. युरोपियन युनियन असोसिएशन अग्रीमेंटचा भाग असणाऱ्या इतर देशांनाही हा करार लागू होतो. म्हणजे युरोपाच्या बाहेर असलेल्या, पण युनियनच्या कराराचा भाग असणाऱ्या देशातल्या खेळाडूंना या कोलपॅक कराराचा फायदा करून घेता येतो. उदाहरणार्थ दक्षिण अफ्रिका, झिबाब्वे आणि कॅरेबियन बेटांचा समूह.
कोलपॅक आणि क्रिकेटचा संबंध कसा?
युरोपियन युनियनशी संलग्न असलेल्या देशांचे खेळाडू अन्य सदस्य देशांमध्ये परदेशी खेळाडू न ठरता खेळू शकतात. सोप्या शब्दांमध्ये युरोपियन युनियनशी संलग्न देशांचे खेळाडू इंग्लंडमधील स्थानिक म्हणजेच काऊंटी क्रिकेटमध्ये स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकतात. जरी ते दुसऱ्या देशाचे असले तरी त्यांना विदेशी खेळाडू म्हणून गणलं जात नाही. प्रत्येक काऊंटी संघावर विदेशी खेळाडू खेळवण्यावर काही निर्बंध आहेत. कोलपॅक नियमामुळे विदेशी खेळाडू प्रत्यक्षात विदेशी ठरत नसल्याने, नियमांच्या चौकटीत राहून काऊंटी संघांना फायदा होतो.
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू कोलपॅक का स्वीकारतात?
इंग्लिश काऊंटी क्रिकेटच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी कमी मानधन मिळतं. दक्षिण आफ्रिकेचं चलन असलेल्या रँडचं मूल्यांकन कमी होत चालल्याने दक्षिण आफ्रिकेत मिळणाऱ्या मानधनाची जागतिक स्तरावरची किंमत कमी होत चालली आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी आणि मानधन दोन्ही नियमितपणे मिळत राहतं.
दक्षिण आफ्रिकेसारख्या संघासाठी कोलपॅक म्हणजे ब्रेनडेन. त्यांचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दिशेने जात असल्याने त्यांचं अपरिमित नुकसान आहे. कोलपॅकच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेच्या चाळीसहून अधिक खेळाडूंनी देश सोडला आणि इंग्लंड गाठलं.
गेल्या काही वर्षात ड्युऑन ऑलिव्हर, कायले अबॉट, सिमोन हार्मेर या तीन भरवशाच्या गोलंदाजांनी कोलपॅक स्वीकारल्याने दक्षिण आफ्रिकेचं प्रचंड नुकसान झालं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)