अंडर-19 आशिया कप: भारताला जेतेपद मिळवून देणाऱ्या अथर्व अंकोलेकरची गोष्ट

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"अथर्वने त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं," अथर्वची आई अभिमानानं सांगत होती. त्याने घेतलेल्या पाच विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने बांगलादेशला नमवत अंडर-19 आशिया कपच्या जेतेपदावर नाव कोरलं.

कोलंबोत झालेल्या या अंतिम लढतीत भारतीय संघाला 106 धावाच करता आल्या. बांगलादेशचा संघ हे छोटं लक्ष्य सहज गाठणार, अशी चिन्हं असताना अथर्वने सातत्याने विकेट्स मिळवल्या नि या तरुण टीम इंडियाने बांगलादेशचा डाव 101 धावांत गुंडाळला, म्हणजे अगदी 5 धावांनी मिळवलेला थरारक विजय!

या विजयानंतर मुंबईच्या एका घरातले सर्व फोन सतत खणखणत होते, ते म्हणजे अथर्व अंकोलकरच्या घरचे. त्यांच्यापैकीच एक फोन होता बीबीसी मराठीचा. तेव्हा त्याच्या आईने भरभरून मुलाचं कौतुक केलंच, शिवाय त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी केलेल्या कष्टांची त्याला जाणीव आहे, असंही सांगितलं.

अथर्व मुंबईत अंधेरी परिसरात राहतो. पार्ले टिळक इंग्रजी माध्यम शाळेत आणि आता रिझवी महाविद्यालयातर्फे क्रिकेट खेळतो. क्रिकेटचं हे बाळकडू घरातून म्हणजे वडील विनोद यांच्याकडूनच अथर्वला मिळाले.

"त्याचे बाबा स्वत: क्रिकेट खेळायचे. इंटरडेपो मॅचेसमध्ये सहभागी व्हायचे. त्यांनीच अथर्वला बॅटबॉल आणून दिला आणि तो खेळू लागला. अथर्वला सरावाला नेता यावं म्हणून त्यांनी सलग आठ वर्षं नाईट शिफ्ट केली. त्याच्या बाबांचं प्रयत्नांचं सार्थक झालं," असं अथर्वची आई वैदेही यांनी सांगितलं.

त्याच्या बाबांनीच आमच्या वाडीतल्या अनेक मुलांना क्रिकेट शिकवलं, असं त्या पुढे सांगतात.

दहा वर्षांपूर्वी अथर्वचे बाबा गेले, मात्र त्यांचा क्रिकेटचा वारसा या परिसरात नॉट आऊट आहेच. "वाडीतल्या या मुलांनी एकत्र येऊन काही दिवसांपूर्वी आमच्या परिसरात क्रिकेट स्पर्धा भरवली होती. अथर्वच्या बाबांच्या स्मरणार्थ करंडक देण्यात आला. आमच्या घरीच ती ट्रॉफी ठेवली आहे. भारतीय संघाचा भाग असल्याने अथर्व त्यावेळी घरी येऊ शकला नाही," त्या सांगतात.

अथर्वचे बाबा गेले तेव्हा वैदेही अंकोलेकर या घरीच ट्यूशन्स घ्यायच्या. मात्र त्यानंतर घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. त्या मरोळ डेपोत कंडक्टर म्हणून रुजू झाल्या. कामाविषयी वैदेही सांगतात, "मरोळ डेपोचा व्याप मोठा आहे. इंडस्ट्रिअल भाग आहे, त्यामुळे जॉब करणं सोपं नाही. त्यातूनच तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या आहेत. मी सकाळची ड्युटी घेतली आहे, जेणेकरून दुपारनंतरचा वेळ घरच्यांसाठी देता येतो."

शनिवारी झालेली मॅच बघितली का, असं विचारल्यावर वैदेही सांगतात, "मी लवकर घरी आले. वेबसाईटवर मॅच फॉलो करत होते. भारतीय संघाकडे फार धावा नव्हत्या. अथर्वने टिच्चून बॉलिंग केली आणि भारताला जिंकवून दिलं. एकदम यादगार मॅच झाली.

"फायनलपूर्वी बोलणं झालं होतं. शांत राहून खेळ, असं त्याला सांगितलं होतं. आता त्याच्याशी व्हीडिओ कॉल करून बोललो. अथर्व आनंदात आहे. वडिलांनी त्याच्यासाठी केलेल्या कष्टांची त्याला जाणीव आहे," त्यांना भरून आलेलं सांगताना.

जॉब आणि मुलाचं क्रिकेट तुम्ही कसं सांभाळता यावर वैदैही म्हणाल्या, "कोचेसनी नेहमीच खूप सहकार्य केलं. त्यांनी नुसतं क्रिकेट शिकवलं नाही तर किटसाठी, स्पॉन्सरसाठी मदत केली. पार्ले टिळक इंग्लिश मीडियमला अथर्व शिकत होता. त्यावेळी सुरेन अहिरे आणि दिवाकर शेट्टी सरांनी मदत केली. निलेश पटवर्धन, चंदू भाटकर, प्रशांत शेट्टी यांचं मार्गदर्शन मिळालं. अरू पै सरांचं योगदान मोलाचं आहे. त्यांनी स्वत:च्या मुलासारखी अथर्वची काळजी घेतली."

विजयाचं सेलिब्रेशन कसं होणार, यावर वैदेही म्हणतात, "श्रीलंकेहून जेतेपदासह परतल्यानंतर त्याच्या मित्रांनी स्वागताची तयारी केली आहे. बॅनर तयार केला आहे, बँजो आणला आहे."

त्या पुढे सांगतात, "अथर्वला अॅक्टिव्हा घ्यायची होती. आशिया कपमध्ये चांगला खेळलास तर अॅक्टिव्हा घेऊन देईन, असं म्हटलं होतं. 26 सप्टेंबरला त्याचा वाढदिवस आहे. त्याचं अॅक्टिव्हाचं स्वप्न पूर्ण करेन. चांगला मोबाईलही घ्यायचा आहे. त्याला नॉनव्हेज आवडतं. तो घरी आला की चिकनची मेजवानी असेल. आशिया कप एक टप्पा झाला. आता त्याला पुढची वाटचाल करायची आहे. भारतीय संघासाठी खेळायचं आहे, IPL खेळायचं आहे. आता त्याला आणखी मेहनत करावी लागणार आहे."

घर, नोकरी आणि दोन मुलं हे सांभाळणं अवघड आहे. परंतु अथर्वची खंबीर साथ आहे. त्याच्या क्रिकेटचा भार कुटुंबावर पडण्याऐवजी त्याच्यामुळे भार हलका होतो, असं वैदेही सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)