विराट कोहलीचा नवा विक्रम, सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सहवागला टाकले मागे

पुण्यामध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने ते साध्य केलं, जे आजवर इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमलेलं नाही.

कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून खेळताना सर्वांत जास्त द्विशतकं करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झालाय.

पुण्यामध्ये सुरू असणाऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारताने पहिल्या डावात ५ विकेट्स गमावत ६०१ धावा करत डाव घोषित केला.

यामध्ये विराट कोहली २५४ धावांवर नाबाद राहिला.

कोहलीचं हे कसोटी क्रिकेटमधलं सातवं द्विशतक आहे. ही खेळी करत त्याने सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सहवागच्या सर्वाधिक द्विशतकाच्या विक्रमाला मागे टाकलं. तेंडुलकर आणि सहवागने कसोटी सामन्यांमध्ये प्रत्येकी ६ द्विशतकं केली आहेत.

ब्रॅडमन, संगकारा आणि लारा आघाडीवर

पण कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक द्विशतकी खेळी करण्याचा विक्रम आहे डॉन ब्रॅडमन यांच्या नावे. त्यांनी १२ वेळा ही किमया साध्य केली.

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कुमार संगकारा ज्याने ११ द्विशतकं केली.

तर ब्रायन लाराच्या नावावर ९ डबल सेंच्युरीज जमा आहेत.

द्विशतकांचा विक्रम करण्यासाठी विराट कोहली सध्यातरी ब्रॅडमन यांच्या भरपूर मागे असला तरी पुण्यामध्ये खेळताना त्याने ब्रॅडमन यांनी केलेली एकूण धावसंख्या ओलांडली. डॉन ब्रॅडमन यांनी ५२ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ६९९८ धावा केल्या.

पुण्यात पहिल्या डावात खेळताना कोहलीने टेस्ट क्रिकेटमधल्या त्याच्या ७००० धावांचा टप्पा ओलांडला.

कोहलीने पहिला डाव घोषित केला तेव्हा दुसऱ्या बाजूने खेळणारा रविंद्र जडेजा ९१ धावांवर बाद झाला होता तर स्वतः विराट २५४ धावांवर नाबाद होता.

पहिल्या डावात भारतीय संघाकडून खेळताना मयांक अगरवालने १०८, रोहित शर्माने १४, चेतेश्वर पुजाराने ५८ तर अजिंक्य रहाणेने ५९ धावा केल्या.

तर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील कगिसो रबाडाने तीन तर केशव महाराज आणि सेनुरान मुथुसामीने प्रत्येकी १ बळी घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)