येवला: छगन भुजबळ विजयी तर नांदगावमधून पंकज भुजबळांचा पराभव

छगन भुजबळ

फोटो स्रोत, facebook

येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांना हरवलं आहे.

छगन भुजबळ हे 2004 पासून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

2014 साली झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून छगन भुजबळ यांना 1 लाख 12 हजार 787 मतं मिळाली. ते 46 हजार 442 मतांच्या फरकांनी जिंकले होते. तेव्हा संभाजी पवार यांना 66 हजार 345 मतं मिळाली होती.

दुसरीकडे नांदगाव मतदारसंघात मात्र छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे शिवसेनेच्या उमेदवारांकडून हरले आहेत. शिवसेनेच्या सुहास खांडे यांनी त्यांना हरवलं आहे.

या लढतीचा विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेला वेध

या निवडणुकीत येवला विधानसभा मतदारसंघात 67.75 टक्के मतदान झालं होती.

भुजबळांना जड जाणार का?

'सकाळ'चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने म्हणतात, "येवल्यात छगन भुजबळांसमोर नक्कीच आव्हान आहे. लोकसभेत समीर भुजबळांचा पराभव झाल्याने ते आता विधानसभेला रिस्क घेऊ इच्छित नसल्याचे दिसतात."

"माणिकराव शिंदे यांच्यासारखे भुजबळांचे निकटवर्तीय नेते दूर गेलेत. शिवाय गेल्या तीन वर्षांत विविध संकटं त्यांना आली. वातावरण प्रतिकूल असल्यानं ते मतदारसंघात थांबले असावेत," असा अंदाज श्रीमंत माने व्यक्त करतात.

तर वरिष्ठ पत्रकार दीप्ती राऊत सांगतात, "नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून गेलेत, 15 वर्षं भुजबळ आमदार असल्यानं प्रस्थापितविरोधी जनभावना, तुरूंगात जाऊन आल्यानं प्रतिमा मलीन इत्यादी अनेक प्रतिकूल गोष्टी भुजबळांसमोर असल्यानं आव्हान मोठं आहे."

भुजबळांनी मतदान केलं नाही

निवडणुकीतील उमेदवार म्हणून येवला हा छगन भुजबळांचा मतदारसंघ असला, तरी त्यांचं मतदान नाशिक पश्चिम मतदारसंघात आहे. सिडको भागातल्या ग्रामोदय मतदान केंद्रावर दरवर्षी भुजबळ कुटुंबीय मतदान करतात आणि दौऱ्यावर निघतात. यंदा मात्र हे चित्र दिसलं नाही.

विशेष म्हणजे, छगन भुजबळांचे पुत्र आणि नांदगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांनीही मतदान केलं नाही. तेही नांदगावमध्येच तळ ठोकून होते.

बीबीसी मराठीनं छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले, "येवल्यात स्वत: मी उमेदवार होतो, बाजूला पंकज भुजबळ उमेदवार होते. तिथून नाशिक 100 किलोमीटर आहे. जाऊन-येऊन पाच तास गेले असते. म्हणजेच अर्धा दिवस गेला असता. निवडणूक चालू होती. आमचे मतदारसंघ पण मोठे-मोठे होते. त्यामुळं जाणं शक्य नव्हतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)