छगन भुजबळ: बाळासाहेब ठाकरेंची अटक आणि नंतर मातोश्रीवर सहकुटुंब जेवण | विधानसभा निवडणूक

पाहा व्हीडिओ -

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

"माझ्यात आणि बाळासाहेबांमध्ये मातोश्रीवर काय चर्चा झाली, हे सगळ्या लोकांना ठाऊक नाही. आमच्यातलं वैर संपलं होतं. मग हा मुद्दा निवडणुकीत कसा काय वापरू शकतात लोक? EDवर, दडपशाहीवर बोलावं. तोंडं बंद करण्यासाठी भारतभरात EDचं शस्त्र वापरलं जातंय," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बीबीसीशी बोलताना केलं.

बीबीसी मराठीचे अभिजीत कांबळे यांच्याशी बोलताना छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांबरोबरची दिलजमाई, EDची कारवाई, गुंडेवार कमिशन, पक्षांतर यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या संदर्भात सध्या बरीच चर्चा सुरू आहे…

मला वाटतं हा विषय 20-22 वर्षांपूर्वीच संपलेला आहे. यावर मोठी चर्चा होत नाहीये. त्यावेळेला श्रीकृष्ण कमिशन शिवसेना-भाजपनं स्थापन केलं होतं, त्यात बाळासाहेबांवर अनेक ठपके ठेवण्यात आले होते. त्या काळात सेना-भाजपच्या राज्यामध्ये अनेक फाईल्स क्लिअर केल्या. आम्ही त्यावेळेला लढलो होतो. तेव्हा आम्ही श्रीकृष्ण आयोगानुसार कारवाई करू, असं वचन जनतेला दिलं होतं.

मी गृहमंत्री झाल्यानंतर ती जुनी फाईल पुन्हा दाखल करण्यात आली, ती माझ्यासमोर आली. मी ती लॉ-ज्युडिशिअरीला पाठवली. त्यांच्याकडूनही तोच अभिप्राय आल्यावर मी त्या फाईलवर सही केली. अर्थात त्यावेळेला मला फार आनंद होत नव्हता. सुडाची भावनाही नव्हती.

त्यामुळं मी माझ्या अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या अधिकारात सांगितलं होतं की, बाळासाहेबांना जामीन मिळाला नाही, तर बाळासाहेबांना त्यांच्या मातोश्रीवरच ठेवण्यात यावं. नजरकैदेसारखं फार फार तर. ती सगळी काळजी आम्ही घेतलेली होती. सुदैवानं त्यांना सोडण्यात आलं.

रमाईनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. आंदोलन झालं. अकरा लोक ठार झाले. सरकारनं हे खून पाडले, अशी भूमिका घेत मी सरकारवर हल्लाबोल केला. मी विरोधीपक्ष नेता होतो. त्यानंतर माझ्या घरावर हल्ला झाला. पूर्णपणे बंगला उद्ध्वस्त करण्यात आला.

छगन भुजबळ

माझ्यावर शिवसेनेकडून दोन खोटी अफिडेविट करण्यात आली. ती खोटी होती हे सिद्धही झालं नंतर. पण भुजबळानेच हे सर्व घडवून आणलं आहे, असा वातावरण तयार केलं गेलं आणि 'सामना'मध्ये `हाच तो राक्षस ज्याने बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली' अशी मोठी हेडलाइन करण्यात आली.

यात दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. घरावर हल्ला करणाऱ्यांवर खटला चालला. मी तुरुंगात असताना हा खटला शेवटच्या टप्प्यात आला. मला कोर्टात बोलावलं गेलं. मी तेव्हा इतकंच सांगितलं की, हे लोक वीस वर्षं कोर्टात येतायंत. मला आता हा खटला अधिक चालवायचा नाही. तेव्हा ते म्हणाले, की वीस वर्षं खटला चालला आता कसा तुम्ही तो मागे घेताय. पण मी म्हटलं की मी याच्यातल्या कुणालाच ओळखत नाही. यातलं कुणी तिकडे आलंच नव्हतं. तो खटला तिथंच एका मिनिटांत संपला.

हे सगळं होत असताना दुसरीकडे गुंडेवार कमिशनची स्थापना झाली होती. हे कमिशन पुतळ्याची खरोखर कुणी विटंबना केली, फायरिंग कुणी केली याची चौकशी करत होते. त्यामध्ये छगन भुजबळाचा काही दोष नाही हे सिद्ध झालं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश गुंडेवार यांनी सांगितलं.

त्यानंतर मी बाळासाहेबांवर अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला, कारण ते 'सामना'चे संपादक होते. दहा-अकरा वर्षं तो खटला चालला. 2009च्या दरम्यान हा खटला अगदी शेवटच्या टप्प्यात आला. त्यावेळेस सुभाष देसाई आणि संजय राऊत माझ्याकडे आले. पत्र दिलं त्यांनी मला आणि म्हणाले, 'साहेबांची तब्येत आणि वय पाहाता आपण सहकार्य करायला पाहिजे'.

मी त्यांना म्हणालो, 'एक शब्दही आणखी सांगू नका.'

कोर्टात गेलो. न्यायाधीशांपुढे हात जोडले आणि म्हणालो, मला हा खटला चालवायचा नाही. मी खटला मागे घेतला. उद्धव ठाकरे त्यावेळेस हजर होते. चहासाठी त्यांनी बोलावलं. पण मी जरा कामात असल्यानं जमलं नाही.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

दोन दिवसांनी बाळासाहेबांचा फोन आला. सहकुटुंब जेवायचं आमंत्रण दिलं. मी खरोखरच मुलाबाळांना, सुनांना घेऊन मातोश्रीवर गेलो. तीन तास तिथं होतो. त्या काळात आमच्यातली सगळी कटुता संपून गेली. आमची मनं जवळ आली.

तिथंच हा विषय संपला. मग ही चर्चा निवडणुकीची कशी काय होऊ शकते. आज सुरू असलेल्या मुद्द्यांवर निवडणुकीत चर्चा व्हायला पाहिजे. EDच्या कारवाईची दडपशाही चाललेली आहे. अटका चाललेल्या आहेत. त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे.

पण ही जी चर्चा आहे ती तुमच्याच पक्षात होते आहे. ही चूक होती, असं अजित पवार म्हणाले आहेत. तुमचं त्यावर काय म्हणणं आहे?

अजित पवारांनी स्वतः असं म्हटलेलं नाही. तुम्ही त्यांना या प्रश्नात अडकवलंय. बाळासाहेबांच्या अटकेवर तुम्ही त्यांना मत विचारलंत. छगन भुजबळांना विचारा, असं त्यांचं उत्तर असायला हवं होतं. ते पुढचं का बोलले, ते मला कळत नाही. त्यावेळेला ते फारच ज्युनिअर होते. आमच्यात काय बोलणं झालंय याबद्दल त्यांना कितपत माहिती होती ते मला ठाऊक नाही. पण ते त्या प्रश्नावर अडकले.

पण आताचा फोकस EDच्या कारवाईवर आहे. पवारांच्या ED कारवाईवर महाराष्ट्र उठलेला आहे. त्यामुळं तुम्ही कितीही वेळा बाळासाहेबांचा प्रश्न चघळण्याचा प्रयत्न केलात, तरी आमच्या त्या भेटीत तो विषय संपलेला होता. हा महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय असूच शकत नाही. उद्धव ठाकरे हा प्रश्न उपस्थित करत नाहीत, तर बाकीच्यांना तो उपस्थित करायची गरजच काय?

अजित पवार आणि शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

आता प्रश्न EDचा आहे. चिदंबरमना दोन महिने झाले आत टाकलंय. मला अडीच वर्षं आत टाकलेलं होतं. भ्रष्टाचार झाला म्हणतात. एक रुपया अजून कॉण्ट्रॅक्टरला दिला नाही. पवार साहेबांचा (शिखर) बँकेबरोबर काही संबंधही नाही. त्यांच्यावर तुम्ही EDची कारवाई करताय. फक्त भीती घालण्यासाठी, तोंडं बंद करण्यासाठी EDची भारतभरात EDचं शस्त्र वापरलं जातंय.

ज्यांचे हात बरबटलेले आहेत, त्यांच्याभोवती EDच्या नाड्या आवळल्या जाणार, असं उद्धव ठाकरे म्हणतायंत...

ठीक आहे. कुणाचे हात बरबटलेले आहेत किंवा नाहीत ते न्यायालय सांगेल ना. चिंदबरमना जामीन तर द्या ना. ते म्हणतायंत, की काय गुन्हा ते तर सांगतच नाहीयेत.

मी तर उघडपणे सांगतोय. सगळे लोकं वापरतायंत ते फाइव्ह स्टार 'महाराष्ट्र सदन' बांधून झालंय. त्यासाठी एक रुपया तुम्ही दिला नाही. मग तो मला 850 कोटी रुपये कुठून देईल.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

दुसरी गोष्ट म्हणजे याच उद्धव ठाकरेंनी मला सामनातून पाठिंबा दिलेला आहे. संजय राऊतनं माझ्यासाठी लेख लिहिलेला आहे.

EDच्या कारवाईनंतर महाराष्ट्रातून शरद पवारांच्या बाजूनं एक लाट उसळली. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं ती ओसरायला लागली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

मला असं वाटतं, की त्यांनी आपल्या भावना दोन दिवस दाबून ठेवायला पाहिजे होत्या. त्यामुळं पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात फक्त EDची आणि पवारांवरच्या अन्यायाची चर्चा झाली असती. ते वातावरण निवडणुकीला जास्तीत जास्त पोषक झालं असतं. परंतु त्याच दिवशी राजिनाम्याची घोषणा केल्यामुळे एकदम फोकस तिकडे वळला. त्यामुळं शरद पवार बाजूला पडले, ED बाजूला पडली.

तुम्ही राज्यातले एक महत्त्वाचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जाता. तुमच्या भाषणात तुम्ही मराठा, माळी जातीचा असा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला स्वतःला हा त्रास जाणवतोय का. राज्यात हा प्रश्न नेमका कसा आहे?

राज्यात हा प्रश्न अजिबात नाही. काही लोकांनी जाणूनबुजून माझ्याविरोधात हा प्रचार चालवलेला आहे. खरंतर मी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, ही जी पवार साहेबांची, काँग्रेसची, शिवसेना-भाजपाची भूमिका होती तीच भूमिका मी मांडली. परंतु केवळ निवडणुकीमध्ये पाडाव करण्यासाठी काही लोक याचा उपयोग करतायंत. हा प्रश्न पुन्हा-पुन्हा मांडून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून सगळ्यात जास्त नेते बाहेर पडले. त्यातही दबावाचा तुम्ही आरोप करताय. पण संघटनात्मक रचनेत काही त्रुटी आहेत असं तुम्हाला वाटतं का?

तुम्ही नेमका उलटा का नाही विचार करत. हे सगळे नेते जातात आमच्यातून आणि त्यांना उमेदवारी देणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत फरक आहे असं तुम्हाला का नाही वाटत. ते साधे उमेदवारसुद्धा निर्माण करू शकले नाहीत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)