शरद पवार: कलम 370 हटवण्याला राष्ट्रवादीचा पाठिंबाच, पण काश्मिरी नेत्यांना असं डांबणं चुकीचं
पाहा संपूर्ण मुलाखत
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"370 हटवण्याला आमचा पाठिंबाच आहे. आम्ही त्याला विरोध केला नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
विरोधी पक्षांनी जर एवढंच काश्मीरविषयी वाईट वाटत असेल तर 5 ऑगस्टचा तो निर्णय फिरवून दाखवा, पुन्हा कलम 370 रद्द पुन्हा लागू करण्याची हिंमत दाखवा, असं आव्हान पंतप्रधान मोदींनी रविवारी एका प्रचारसभेत दिलं होतं.
त्या उत्तर देताना शरद पवार म्हणाले की केंद्र सरकारच्या त्या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठिंबा होताच, मात्र "असं करताना काश्मीरच्या लोकांना विश्वासात घ्या. तिथल्या नेत्यांना तुरुंगात टाकून हे करू नका," असं पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या आठवडाभरापूर्वी त्यांनी बीबीसी मराठीच्या मयुरेश कोण्णूर यांच्याशी थेट संवाद साधला. तेव्हा शिखर बँक प्रकरण, त्यानंतर अजित पवारांचा राजीनामा, यंदाच्या निवडणुकीत त्यांची मोहीम तसंच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
370चा मुद्दा महाराष्ट्र निवडणूक प्रचारात येण्याविषयीचं विचारलं असता पवार म्हणाले, "महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 370 हा मुद्दा नाही. 370 कलम काढलं त्याचा परिणाम एकच झाला, की आज भारतातल्या अन्य राज्यांतल्या लोकांना तिथे जाऊन शेतीवाडी-व्यवसाय करायला संधी मिळेल. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 370पेक्षा शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे."
"औद्योगिक नगरी म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक शहरांना ओळखलं जायचं. तिथली कारखानदारी आज आजारी पडलीय. मंदीचं संकट आलेलं आहे. कामगारांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तो प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो. शिक्षणाचा विस्तार झाला पण तरुण पिढीला नोकऱ्या मिळत नाहीत. बेकारांचे तांडेच्या तांडे निर्माण झालेले आहेत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
बालाकोट हल्ला आणि श्रेयनाट्य
बालाकोटचा हल्ला आणि भारतातर्फे देण्यात आलेलं प्रत्युत्तर याचं श्रेय सरकारकडून घेण्यात येतंय. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, "केंद्र सरकारने - गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांनी - सगळ्या राजकीय विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली. सीमेवर कुठं काय सुरू आहे, याविषयी लष्करी अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला माहिती देण्यात आली. मी ही त्या बैठकीत होतो. ते ब्रीफिंग झाल्यानंतर काय करायचं यावर चर्चा झाली. त्या चर्चेमधून एकमताने सगळ्या पक्षांनी एक ठराव केला की जे घडतंय त्याला ठोस उत्तर द्यायला हवं. त्यासाठी आपल्या सैन्याला पूर्ण अधिकार, पाठिंबा देण्यात यावा."

"सरकारने यासाठी केलेल्या कृतीला सगळ्यांची साथ आहे, असा एकमताचा ठराव त्या ठिकाणी झाला. या अर्थ असा की हवाई दलाने ज्या अॅक्शन घेतल्या त्या योग्य होत्या आणि त्याच्या पाठीमागे देश होता. सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून हा निर्णय घेतलेला होता. ज्यावेळी देशाच्या संरक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा काय पक्ष-बिक्ष बघायचा?
"तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन देशाच्या रक्षणासाठी एकत्र उभं रहायला हवं. किंवा जी काही पावलं टाकली जातात, त्याला साथ द्यायला हवी. ज्यावेळी राष्ट्राच्या हिताचा प्रश्न येतो, रक्षणाचा प्रश्न येतो, त्यासाठी ठरवा होतो. त्याचं राजकारण काय करायचं? त्याचे राजकीय फायदे का घ्यायचे? शौर्य दाखवलं कुणी? शौर्य आम्ही नाही दाखवलं. आम्ही निर्णय घेतला ठरावाचा. शौर्य दाखवलं भारतीय हवाई दलाने."
फडणवीस, कुस्ती आणि लढत
"मी महाराष्ट्रातल्या कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पैलवान कुठे तयार होतात, त्यांना तयार करायला काय करावं लागतं, हे फडणवीसांपेक्षा मला जास्त चांगलं माहीत आहे. मुख्यमंत्र्यांना मी परिपक्व मानत नाही. राज्याचे मुख्यमंत्री ही एक संस्था आहे. त्या पदावर बसलेल्याने परिपक्वता दाखवली पाहिजे. त्यासंबंधी शंकेची स्थिती आहे, म्हणून मला काही त्यांना अधिक महत्त्व द्यायचं नाही," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
राज ठाकरेंची भूमिका
राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका चांगली असल्याचं शरद पवार म्हणतात. "त्यांना पक्ष उभा करायचाय. आणि याची सुरुवात प्रभावी विरोधी पक्ष उभा करण्यातून करण्याची त्यांची संकल्पना दिसतेय. हा एक वेगळा मार्ग आहे आणि ते नेहमीच इतरांपेक्षा वेगळा मार्ग धाडसाने घेतात हे त्यांचं वैशिष्ट्यं आहे."
राज्यात विरोधी पक्षच अस्तित्त्वात नसल्याच्या राज ठाकरेंच्या मताशी आपण सहमत नसल्याचंही पवारांनी सांगितलं.
भाजपची 'मेगा भरती'
लोकसभा निवडणुकांपासून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांविषयी बोलताना पवार म्हणाले, "आमचे 9 सहकारी सोडून गेले. ते गेले, त्याची दोन कारणं आहेत - ज्या लोकांच्या सार्वजनिक संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत त्यांच्यामध्ये ED, CBI, अन्य चौकश्या याचा ससेमिरा लावून काही लोकांना त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला.
"काही लोकांनी खिशातून नोटीस आणून दाखवली. ज्यांची या सगळ्याला तोंड देण्याची तयारी नसेल, मी त्यांना मदत करू शकत नाही, ही भूमिका मी घेतली आणि त्याच्यामुळे माझे काही सहकारी गेले. पण परिणामी त्या सगळ्या परिसरामध्ये एक नवीन संच उभा राहिला," असं पवार म्हणाले.
अजित पवारांचं राजीनामा नाट्य
शिखर बँक प्रकरणी आपलं नाव आल्यानंतर शरद पवार हे स्वतः EDच्या कार्यालयात चौकशीसाठी गेल्याने एकूणच राजकीय घडामोडींना जो वेग आला होता, तो अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे खाली गेल्याचं छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना शरद पवार म्हणतात, "याच्यात काही खरं नाही. माझं नाव त्याच्यात आलं, याच्या वेदना त्यांना झाल्या."

फोटो स्रोत, Getty Images
"आज भाजपच्या विरोधात कोणता पक्ष आणि कोणता कार्यकर्ता तडफेने उभा आहे? त्यामुळे EDने आणि अजितने जे काही केलं, त्यामुळे काही घसरलं, असं म्हणण्याला अर्थ नाही."
बाळासाहेबांची अटक
बाळासाहेब ठाकरेंना अटक व्हायला हवी होती की नाही, हा आत्ताचा मुद्दाच नसल्याचंही शरद पवार सांगतात. "बाळासाहेब आता हयात नाहीत. या गोष्टी कशासाठी करायच्या आता? माझ्यामते हे प्रश्न आजचे प्रश्न नाहीत. आजचा प्रश्न बेकारी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे. आजचे प्रश्न याच्यापेक्षा गंभीर आहेत आणि या गंभीर प्रश्नांपासून डायव्हर्ट करण्याचं काम सरकारकडून केलं जातंय. दुर्दैवाने त्याला मीडियाही बळी पडायला लागलेला आहे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
पवारांचा महाराष्ट्र दौरा
गेले काही दिवस शरद पवारांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा सुरू केलाय. राष्ट्रवादीतले दिग्गज नेते पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवारांनी आपली जनतेवरची पकड या दौऱ्यातून दाखवून दिली. या वयामध्ये दौरे करावं लागणं, म्हणजे पुढची फळी पुढे येऊ शकली नाही, असा याचा अर्थ होतो का?
हे विचारल्यावर शरद पवार म्हणाले, "दुसरी पिढी ठिकठिकाणी कामाला लागलेली आहे. जयंत पाटील, अजित पवार हिंडत आहेत. सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे हिंडत आहेत. आम्ही सगळ्यांना जिल्हे दिलेले आहेत. माझी या सगळ्यांना साथ आहे. नेतृत्त्व करणारी उत्तम पिढी तयार केलेली आहे. आम्हाला त्याची चिंताच नाही."
पाहा संपूर्ण मुलाखत
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








