एकनाथ खडसेंची पहिल्या यादीवर नाराजी : पक्षाशी प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केला

"25 वर्षे झाली. मी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि इतर मोठ्या नेत्यांसोबत मिळून आम्ही निर्णय घ्यायचो. तिकीटवाटपाच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता. राज्यभरात युती तोडण्याची घोषणा असेल किंवा भाजपने ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्या मी पार पाडत आलेलो आहे. आता या गोष्टीला फक्त 'कालाय तस्मै नमः' असं म्हणता येईल."
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विद्यमान सरकारमधील बहुतांश मंत्र्यांना तसंच आमदारांना भाजपने पुन्हा तिकीट दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं नाव या यादीत नाही. तसंच माजी मंत्री प्रकाश मेहता, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचंही नाव अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.
यादी जाहीर होण्यापूर्वीच एकनाथ खडसे मंगळवारी (1 ऑक्टोबर) आपला उमेदवारी दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
"आज चांगला मुहूर्त असल्यामुळे मी माझा अर्ज दाखल केला आहे. आज यादीत नाव आहे की नाही याची मला कल्पना नाही. परंतु पुढच्या यादीत नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्ज तर केलेलाच आहे. यापुढे मी यादीची वाट पाहीन. वरिष्ठांशी याबाबत बोलेन, असंही खडसेंनी म्हटलं आहे.
"ही जागा शिवसेनेकडे जाईल की नाही हे मला माहीत नाही. 42 वर्षे झाली मी या मतदारसंघात भाजपचं काम प्रामाणिकपणे करत आहे. 42 वर्षांमध्ये मला अनेक प्रलोभनं आली. अनेकवेळा पक्ष सोडावा, असा दबाव आला. परंतु मी भाजपपासून दूर गेलो नाही. पक्षाशी प्रामाणिक राहणं हा जर गुन्हा असेल तर तो मी केला आहे," असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
'तिकीट न मिळणं हा अन्याय नाही'
खडसेंच्या नाराजीवर बोलताना, 'तिकीट मिळणं हा न्याय-अन्यायाचा निकष असू शकत नाही,' अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली. खडसे हे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे ते भाजप सोडून कोठेही जाणार नाहीत, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
कथित घोटाळ्यावरून खडसेंनी दिला होता राजीनामा
भाजपने जवळपास सगळ्याच प्रमुख नेत्यांचा समावेश पहिल्या यादीत केला आहे. कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सात ते आठ जणांचा समावेशही पहिल्या यादीत करण्यात आला आहे. असं असताना खडसे आणि तावडे या ज्येष्ठ भाजप नेत्यांचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
2014 च्या निवडणुकीत एकनाथ खडसे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ते 1995 पासून सलग सहावेळा या मतदारसंघातून निवडून येतात. एकनाथ खडसे विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांना भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानलं जात होतं. पण पक्षानं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. पुढे कथित भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून त्यांनी राजीनामा दिला होता. या आरोपांबाबत पुढे काहीही निष्पन्न होऊ शकलं नाही. पण त्यानंतर खडसे यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला नाही.
विनोद तावडे 2014 ला बोरीवली मतदारसंघातून निवडून आले आहेत. विनोद तावडे यांना पूर्वीपासूनच भाजपचा मराठा चेहरा मानलं जातं. त्यांनी भाजपच्या संघटनात्मक पदावर बराच काळ काम केलं आहे. ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस होते. काही काळ ते विधानपरिषदेचे सदस्यही राहिले. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बोरीवली मतदारसंघातून विजय मिळवला.
त्यांचं नावही मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चेत होतं. पण फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. पुढे ज्ञानेश्वर विद्यापीठच्या पदवी आणि इतर कारणामुळे त्यांच्याबाबत वाद निर्माण झाला होता.
गडकरी गटातली नावे डावलली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद दाखवून दिल्याचं भाजपच्या पहिल्या यादीतून दिसून येत आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत बावनकुळे आणि दिलीप कांबळे हे पाचही नेते नितीन गडकरी यांच्या गटातले मानले जातात. त्यामुळे त्यांची नावे पहिल्या यादीत दिसून आली नाहीत. ती दुसऱ्या यादीतही दिसतील की नाही हा प्रश्न आहे, असं राजकीय अभ्यासक संदीप आचार्य म्हणाले.
पुढच्या यादीत नावे येतील
भाजपच्या पहिल्या यादीत खडसे, तावडे यांची नावे नसण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला. "आता फक्त पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच पुढची यादी जाहीर करण्यात येईल. त्यामध्ये दोघांचाही समावेश असेल," असं माधव भांडारी यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








