राज ठाकरे : निवडणूक लढवणं ही मनसेची राजकीय अपरिहार्यता ?

फोटो स्रोत, Getty Images
2019 ची लोकसभा निवडणूक न लढवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही घोषणा केली.
5 ऑक्टोबरला मनसेची पहिली प्रचारसभा होईल, असं राज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
पक्षाची ताकद विधानसभेत दाखवणार, असं म्हणत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध कॉर्पोरेट-स्टाईल प्रचार केला होता.
भाजप आणि शिवसेना यांच्या विधानसभेसाठीच्या प्रचारयात्रा सुरू झाल्या, तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीही आपापल्या जागावाटपाची चर्चा करत होते. मात्र या सर्व गडबडीत मनसेच्या तंबूत शांतता असल्याने राज ठाकरे हे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक लढवणार नाही का, हा प्रश्न विचारला जाऊ लागला होता.
आतापर्यंत राज ठाकरे कुठे होते?
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज ठाकरे नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न करताना दिसले. सर्वप्रथम राज ठाकरे दिल्ली दरबारी दाखल झाले. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीची सुद्धा भेट घेतली. EVM ला विरोधासाठी एकत्र येण्याबाबत ही भेट घेतल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. पुढे राज ठाकरे ममता बॅनर्जी यांनाही भेटले. त्यानंतर महाराष्ट्रात EVM विरोधी आंदोलनाला गती देण्याचाही प्रयत्न राज ठाकरेंनी केला.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाचे ढग दाटून आले. त्यांना EDची नोटीसही आली आणि 22 ऑगस्टला कोहीनूर मिलप्रकरणी EDने त्यांची जवळपास नऊ तास चौकशी केली.
भारतीय जनता पक्ष ED चा राजकीय हत्यार म्हणून वापर करून घेत आहे, ED च्या चौकशीमुळे आपल्याला काहीच फरक पडणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
मनसे किती जागा लढवणार?
मनसे निवडणूक लढवणार असली तरी नेमक्या किती जागा लढवणार आहे, हे मात्र अजून जाहीर करण्यात आलेलं नाही.
बीबीसी मराठीला याविषयी सांगताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी म्हटलं, "आम्ही किती जागा लढवणार हे आता सांगू शकत नाही. पण ठराविक शहरातच लढणार असं नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही लढू."

फोटो स्रोत, Getty Images
इतर पक्षांची जागावाटपावर चर्चा होत असताना मनसे मात्र ही निवडणूक लढवणार की नाही, हे देखील स्पष्ट नव्हतं. पण ही गोष्ट जाहीर करायला उशीर झाला नसून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसल्याचं संदीप देशपांडे म्हणतात.
"निवडणूक लढवणार नाही, असं आम्ही कधीच म्हटलं नव्हतं. त्यामुळे निवडणुकीचा निर्णय जाहीर करायला उशीर झालेला नाही. आमची तयारी सुरू होती. कार्यकर्त्यांमध्ये काहीच संभ्रम नाही. इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या, त्यांची यादी शॉर्टलिस्ट करणं सुरू होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असायचं कारण नाही," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
मनसेनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यासाठी उशीर केला आहे का? असा प्रश्न मनसे नेते अभीजीत पानसे यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की "आता महाराष्ट्रातील जनतेने उशीर न करता त्यांची हाती सत्ता दिली पाहिजे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
निवडणूक लढवणं राज ठाकरेंची अपरिहार्यता
राज ठाकरेंच्या या घोषणेचं विश्लेषण करताना दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "राज ठाकरेंनी जर ही निवडणूक लढवली नसती, तर ते आत्महत्येचं पाऊल ठरलं असतं. कारण पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी 13 आमदार दिले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा एकच आमदार निवडून आला होता. पण चढउतार प्रत्येक पक्षात येतातच. पण पक्षाचा जिवंतपणा टिकवण्यासाठी निवडणूक लढवणं, ही एक अपरिहार्य बाब आहे. कारण आपल्याकडच्या राजकीय व्यवस्थेत निवडणुकीला सर्वात जास्त महत्त्व असतं. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे."

"आता जरी त्यांच्यावर आरोप, ईडीची चौकशी असे विषय असले तरी राज ठाकरेंविषयीचं तरुणांच्या मनातलं आकर्षण कमी झालेलं नाही. नाशिक, पुणे, औरंगाबादचा शहरी भाग यामध्ये तरुणांच्या मनात राज ठाकरेंविषयी आकर्षण आहे. आज ना उद्या हा माणूस आपल्याला चांगलं नेतृत्त्वं देईल, असं तरुणांच्या मनात आहे. त्या भावनेचं भांडवलं करून बऱ्याच ठिकाणी तरुणांची मतं अनेक ठिकाणी निर्णायक ठरू शकतात. कारण विधानसभेची आघाडी चार हजार - तीन हजार इतकी कमी असते. बऱ्याचदा छोट्या फरकाने विजय होतो. ज्याठिकाणी मनसेचा प्रभाव आहे किंवा निर्माण होईल त्याठिकाणी मनसेची मतं महत्त्वाची - निर्णायक ठरू शकतात. पण राजकीय अस्तित्त्व टिकण्यासाठी त्यांनी ही निवडणूक लढवणं, हा अपरिहार्य भाग आहे."
मनसेने निवडणूक लढवली तरी काही फरक पडणार नाही, असं मत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. "राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत प्रचार करूनही फरक पडला होता. मग आता काय फरक पडणार आहे? निवडणूक लढवायची की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांचं त्यांनी बघावं. ज्यांना लोकांनी नाकरलेलं आहे, त्यांनी निवडणूक लढवली काय, नाही लढवली काय?" असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








