अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील वादाची खरी कारणं काय? - विधानसभा निवडणूक

फोटो स्रोत, Twitter
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अजित पवार आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. दोन्ही नेते एकाच पक्षात आहेत पण एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेच्या मुद्द्यावरून अजित पवार हे छगन भुजबळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अजित पवार यांनी दिलेल्या त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या आमदारकीच्या राजिनाम्याच्या मुद्द्यावर म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"मला असं वाटतं, की त्यांनी आपल्या भावना दोन दिवस दाबून ठेवायला पाहिजे होत्या. त्यामुळं पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात फक्त EDची आणि पवारांवरच्या अन्यायाची चर्चा झाली असती. ते वातावरण निवडणुकीला जास्तीत जास्त पोषक झालं असतं. परंतु त्याच दिवशी राजिनाम्याची घोषणा केल्यामुळे एकदम फोकस तिकडे वळला. त्यामुळं शरद पवार बाजूला पडले, ईडी बाजूला पडली."
तिकडे अजित पवार यांनी मात्र यामुद्द्यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणतात, "मला वाटलं तेव्हा म्हणून माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटलं म्हणून राजीनामा दिला. मी काही टायमिंग बघून ते केलं नाही. भुजबळांचं मत त्यांचं आहे. प्रत्येकाची वेगळी मतं असू शकतात."
तर "बाळासाहेबांच्या अटकेवेळेस आम्ही ज्युनियर होतो. मला काही सगळं माहीत नाही. मी जे त्रयस्थ म्हणून वाटलं ते बोललो. भुजबळांनी कदाचित वेगळं उत्तर दिलं असतं," असं अजित पवारांनी म्हटलंय.
खरंतर या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या या वादाला अनेक किनार आहेत. तसाच तो वाद तितकाच जुना सुद्धा आहे. त्याची पाळंमुळं ही थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत जातात.
वादाला सुरुवात कशी झाली?
राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ हे राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पण कालांतरानं त्यांची जागा अजित पवार यांनी घेतली. हा नेतृत्व बदल होण्याच्या काळातच दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट येत गेलं असं राजकीय जाणकार सांगतात.
राजकीय विश्लेषक पद्मभूषण देशपांडे याबाबत सांगतात, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर छगन भुजबळ राज्यात क्रमांक दोनचे नेते होते. त्यांची त्याआधीची कारकीर्द आणि अनुभव पाहात ते पहिले प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री झाले. पण त्यानंतर शरद पवार जेव्हा खासदार म्हणून दिल्लीला गेले, त्यावेळेपासून अजित पवार यांचं पक्षातलं स्थान वाढलं. पक्षाचा कारभार हळूहळू त्यांच्या हाती जाऊ लागला. त्यानंतर शरद पवार स्वतः इतर कामांसाठी लोकांना अजित पवार यांच्याकडे पाठवायला लागले. आजही प्रदेशाध्यक्ष कुणीही असलं तर राज्यातले सर्व निर्णय अजित पवार यांच्याच कलानच घेतले जातात, हे सर्वश्रुत आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार यांच्यामते सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा कळीचा मुद्दा होता.
"2004च्या निवडणुकीत काँग्रेसचे कमी आमदार आले होतो आणि राष्ट्रवादीचे जास्त होते. पण तरीही मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे देण्यात आलं. भुजबळ तेव्हा उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू झाला. पण राष्ट्रवादीतल्या शरद पवारांसारख्या खंबीर नेतृत्वामुळे त्यांच्यातल्या भांडण फारसं समोर आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं नंतरच्या काळात रोटेशन पद्धतीनं उपमुख्यमंत्रिपद अनेक नेत्यांना दिलं. त्या काळात भुजबळ नाराज असायचे की अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि आपल्याकडे PWD खातं आहे," असं चुचुंवार सांगतात.
तुरुंगवासामुळे अजित पवारांवर भुजबळ नाराज?
या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या वाक्-युद्धाला भुजबळ यांना भोगावा लागलेला तुरुंगवास हे एक मोठं कारण असल्याचंही राजकीय विश्लेषकांना वाटतं.

फोटो स्रोत, Twitter
प्रमोद चुंचुवार सांगतात, "भुजबळांच्या मनात कुठेना कुठे तरी हे खुपत आहे की अजित पवारांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी त्यांना तुरुंगात पाठवलं, राजकीय वर्तुळात ही चर्चा असतेच. सिंचन घोटाळ्याची चर्चा 2014 निवडणुकांआधी खूप होती. पण ज्या घोटाळ्यासाठी भुजबळांना तुरुंगात जावं लागलं त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याची फारशी चर्चा नव्हती. सिंचन घोटाऴ्याची चर्चा होऊनही अजित पवार 5 वर्षं मोकळे राहिले. त्याची खंत भुजबळांच्या मनात दिसते.
"त्याचवेळी प्रचाराची गाडी बाळासाहेबांच्या अटकेच्या प्रकरणापर्यंत आणण्यात आली. मधल्या काळात भुजबळ शिवसेनेच्या दारापर्यंत जाऊन आले, पण शिवसेनेतूनच त्यांच्या घरवापसीला विरोध झाला. भुजबळ मनाने राष्ट्रवादीत आहेत, असं म्हणण्याची स्थिती नाही. ते नाराज आहे आणि त्यांच्यासमोर पर्याय नाहीत."
पद्मभूषण देशपांडे यांचं सुद्धा असंच मत आहे. ते सांगतात, "अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. त्यांच्यावर एवढे आरोप होऊनही त्यांना काही झालं नाही, पण भुजबळांवर कुठलंही दोषारोपपत्र नसतांना त्यांना मात्र तुरुंगवास भोगावा लागला. याची चर्चा बाहेर आणि पक्षात दोन्हीकडे होती. त्याचवेळी अजित पवारांनी बाळासाहेबांच्या अटकेच्या प्रकरणाचा विषय काढल्यावर त्याला वाचा फुटली आहे."
छगन भुजबळ यांना या प्रकरणाध्ये गोवण्यात आलं, असं त्यांच्या समर्थकरांना वाटत असल्याचं राजकीय विश्लेषक धवल कुलकर्णी सांगतात.
जातीय राजकारणामुळे वाद?
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी भुजबळ हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पण कालांतरानं अजित पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधलं स्थान दुसऱ्या क्रमांकावर येऊ लागलं. त्याला जातीय कराण असल्याचंही बोललं जातं.

फोटो स्रोत, Twitter
याबाबत देशपांडे सांगतात, "सुरुवातीला दोन्ही नेत्यांमधला हा संघर्ष फार सुप्त होता, पक्षातल्या सर्व मराठा नेत्यांमध्ये शरद पावरांनी अजित पवारांना महत्त्व द्यायला सुरुवात केली, तेव्हा अजित पवार हे यापुढे कारभारी असतील हे स्पष्ट होत गेलं. त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिकाधिक मराठाबहुल पक्ष होत गेला तेव्हा अजित पवारांची ताकद वाढत गेली आणि पक्षातल्या मराठेतर नेत्यांची घुसमट वाढत गेली. त्यातले काही आता पक्ष सोडूनही गेले."
चुंचुवार यांच्यामते मात्र मराठा राजकारण करणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची व्यवहार्य गरज होती. ते सांगतात, "राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा पक्ष, अशी त्यांची इमेज होती, ती त्यांची व्यवहार्य गरजही होती, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी त्यांना हे करावं लागलं होतं. शिवाय त्यांच्या पक्षात भुजबळ सोडून इतर सर्व मोठे नेते मराठाच होते. त्या पॉलिटिकल कंप्लशनमुळे शरद पवारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करून एक राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला होता."
"त्याचं कारण म्हणजे मराठा नेते बहुजन नेतृत्व सहजासहजी स्वीकारत नाहीत. मराठा समाजातल्या प्रस्थापित नेत्यांच्या मनात अहम भाव असतो. त्यामुळेच सुशीलकुमार शिंदे यांचं पद गेलं आणि भुजबळांसारखा नेता मोठा असूनदेखील बाजूला सारला गेला. भुजळांनी अनेकदा पत्रकारांशी अनौपचाकीक गप्पा मारताना त्यांची हतबलता व्यक्त केली होती."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारताना भुजबळांनी त्यांच्याबाबत घडणाऱ्या या घडामोडींबाबत बरेचदा सांगितल्याच धवल कुलकर्णी सुद्धा सांगतात.
"भुजबळ उपमुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांना ते फारसं आवड नव्हतं, 2002 विलासराव देशमुख यांच्या सरकारचा पाठिंबा काही अपक्ष आणि लहान पक्षांनी काढला होता तेव्हा त्याला हे कारण होतं," असंही कुलकर्णी सांगतात.
वाद आताच का उफाळून आला?
पण हे सर्व आताच का घडत आहे हा एक गहन प्रश्न आहे. याच्या टायमिंग बद्दल सांगताना देशपांडे म्हणतात, "शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधल्या मतभेदाचे जे दाखले सध्या चर्चेला आले, त्यालाच अधिक सपोर्ट करणारं अजित पवार याचं हे वर्तन आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 4
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








