नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बॉलिवूड; शाहरुख खान, आमीर खान, कंगना रानौतचा पंतप्रधानांसोबत सेल्फी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (19 ऑक्टोबर) दिल्लीमध्ये शाहरूख खान, आमीर खान आणि कंगना रानौतसह चित्रपट आणि कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत गांधी विचारांवर चर्चा केली.

चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधींचे विचार आणि त्यांच्या जीवन मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या सर्व कलाकारांना भेटीदरम्यान केलं. तरूणांना गांधी विचारांशी जोडण्यासाठी कलाकारांनी मदत करावी, असंही पंतप्रधानांनी म्हटलं.

पंतप्रधानांनी म्हटलं, की चित्रपट हे संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन बनलं आहे.

शाहरूख खान, आमीर खान, कंगना रानौत, जॅकलीन फर्नांडिस, एकता कपूर, इम्तियाज अली, अनुराग बसू, बोनी कपूर, सोनम कपूर यांच्यासह सिनेक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

पंतप्रधानांना भेटून सर्वच कलाकर उत्साहित होते.

आमीर खाननं म्हटलं, "पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट मस्त झाली. त्यांचे विचार ऐकून खूप छान वाटलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायक आहे."

कंगना रानौतने म्हटलं, कला आणि कलाकारांना समजून घेणारं हे पहिलं सरकार आणि कदाचित हे पहिलेच पंतप्रधान असावेत, असं मला वाटतं. चित्रपट उद्योगाला इतका सन्मान यापूर्वी कोणीही दिला नसावा. यासाठी मी पूर्ण इंडस्ट्रीच्या वतीनं पंतप्रधानांचे आभार मानते.

एकता कपूरनं म्हटलं, माझ्यापेक्षाही जास्त कोणाला तरी इंडस्ट्रीची समज आहे, असं मला पहिल्यांदाच वाटलं. आमचं सामर्थ्य ओळखून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा कोणीतरी देत असल्याचं जाणवलं.

चित्रपट व्यवसायासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यामुळं फिल्म इंडस्ट्रीला जो फायदा झालाय, तो मी शब्दांत सांगू शकत नाही. वाजपेयीजींच्या काळातही भाजप सरकारनं चित्रपट उद्योगाकडे लक्ष दिलं होतं. वाजपेयींनी चित्रपट क्षेत्राला 'इंडस्ट्री' म्हणून मान्यता दिली. आणि त्यापूढे जाऊन मोदींनी समस्या सोडविण्यावर भर दिला आहे, असं चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी म्हटलं.

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी म्हटलं, "जेव्हा आम्ही चित्रपट बनवतो तेव्हा याचा उद्देश काय हा विचार वारंवार मनात येतो. मनोरंजन हा एक उद्देश आहेच, पण प्रत्येक चित्रपट निर्मात्याला हा प्रश्न नेहमी पडत असतो. आज आम्हाला एक उद्देश सापडला, दिशा मिळाली, मार्ग दिसला ज्याची आम्हा सर्जनशील लोकांना प्रचंड आवश्यकता होती."

दिग्दर्शक इम्तियाज अलीनं म्हटलं, "गांधीजींवर चित्रपट बनविण्याची कल्पना फिल्म इंडस्ट्रीसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण त्यांचे विचार समजून घेण्याची एक संधी मिळू शकते. आपण सारखं गांधी-गांधी असं म्हणतो, पण त्यांच्या विचारांपर्यंत पोहोचत नाही. आपण गांधी विचारांकडे परत जाऊ शकतो. ही परिवर्तनाची सुरूवात असेल."

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलाकारांसोबत साधलेल्या संवादात सर्व कलाकारांना दांडीमध्ये बनलेल्या गांधी म्युझियमला भेट देण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींनी म्हटलं, "तुम्ही सर्वांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीलाही भेट द्यायला हवी. इथं देशातूनच नाही तर परदेशातूनही लोक येतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)