You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महात्मा गांधींचा नेमका धर्म होता तरी काय?
- Author, कुमार प्रशांत
- Role, गांधीवादी विचारक, बीबीसी हिंदीसाठी
महात्मा गांधींना कुठल्यातरी एका मर्यादित परिघात बांधून किंवा त्यांना एखादी विशिष्ट ओळख चिकटवून त्याकाळी सर्वांवरच असलेला आणि समाजमनात आजही खोलवर रुजलेला त्यांचा प्रभाव कमी करण्याचे जे प्रयत्न आज होत आहेत, तसेच ते यापूर्वीही करण्यात आले आहेत.
या प्रयत्नात ते सर्व एकत्र आले होते जे इतर वेळी कुठल्याच बाबतीत एकत्र नसायचे. गांधींना आमच्या धार्मिक बाबींमध्ये काहीही बोलण्याचा अधिकार नाही, या एका गोष्टीवर सनातनी हिंदू आणि पक्के मुसलमान यांच्यात एकमत होतं.
गांधी खरे 'अस्पृश्य' होते
दलितांना वाटायचं, की दलित नसलेल्या गांधींना त्यांच्याविषयी काही बोलण्याचा, त्यांच्यासाठी काही करण्याचा अधिकारच नाही. ख्रिश्चनसुद्धा धर्मांतराच्या मुद्यावर उघडपणे गांधींच्या विरोधात होते.
बाबासाहेब आंबेडकरांनी ती तर निर्वाणीचं अस्त्र बाहेर काढलं होतं. तुम्ही मेहतर नाही, तर तुम्ही आमच्याविषयी कसं काय बोलू शकता? असा त्यांचा प्रश्न होता.
यावर उत्तर देताना गांधीजी केवळ एवढंच म्हणाले, ही काही माझ्या हातातली गोष्ट नाही. मात्र, मेहतर समाजासाठी काही करण्याचा एकमेव निकष या समाजात जन्म घेणं हा असेल तर माझी एवढीच इच्छा आहे, की माझा पुढचा जन्म मेहतरांच्या घरात व्हावा.
यावर आंबेडकरांकडे कोणतंच उत्तर नव्हतं. त्यापूर्वीसुद्धा स्वतः अस्पृश्य असल्याचा निरर्थक दावा करत त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जोरात असतानादेखील ते निरुत्तर झाले होते.
त्यावेळी गांधींनी म्हटलं होतं, "मी तुम्हा सर्वांपेक्षा जास्त खरा आणि पक्का अस्पृश्य आहे. कारण तुम्ही जन्माने अस्पृश्य आहात आणि मी स्वतःसाठी अस्पृश्य असणं निवडलं आहे."
गांधी आणि हिंदुत्वाचं समर्थन
गांधींनी जेव्हा ते रामराज्य आणू इच्छितात, असं म्हटलं होतं, तेव्हा हिंदुत्त्ववाद्यांना अमाप आनंद झाला होता. मात्र, त्याचवेळी गांधींनी हेदेखील स्पष्ट केलं की राजा दशरथाचा पुत्र म्हणजे त्यांचा राम नाही.
जनसामान्यांसाठी एक आदर्श राज्य ही रामराज्याची व्याख्या आहे आणि त्यांना या सर्वमान्य व्याख्येला स्पर्श करायचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रत्येक क्रांतीकारी जनसामान्यांमध्ये प्रचलित असलेल्या प्रतिकांना नवा अर्थ देतो आणि जुन्या माध्यमातून नवा अर्थ जनसामान्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो.
त्यामुळेच गांधींनी म्हटलं होतं, की ते सनातनी हिंदू आहेत. मात्र हिंदू असण्याची त्यांची परिभाषा अशी होती, की कोणत्याही कळसूत्री हिंदूचं त्यांच्या आसपास येण्याचं धाडस नव्हतं.
जाती व्यवस्थेचा मुद्दा
खरा हिंदू कोण? - गांधींनी संत कवी नरसिंह मेहता यांचं एक भजनच पुढे केलं. "वैष्णव जन तो तेणे रे कहिए जे/जे पीड पराई जाणे रे!" पुढे असंही म्हटलं, "पर दुखे उपकार करे तोय/मन अभिमान ना आणी रे!" हे भजनच पुढे केलं म्हटल्यावर कोण हिंदू येणार गांधींजवळ?
यानंतर मग वेदपरायणांनी गांधींना त्यांचाच वापर करून मात देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी युक्तिवाद केला, "तुम्ही सनातनी हिंदू असल्याचा दावा करता म्हणजे तुमचा वेदांवर विश्वास असेल आणि वेदांमध्ये जाती व्यवस्थेचं समर्थन केलं आहे."
यावर गांधींचं उत्तर होतं, "मी केलेल्या वेदांच्या अभ्यासाच्या आधारे मला असं वाटतं, की वेदांमध्ये जाती व्यवस्थेचं समर्थन केलेलं नाही. कुणी मला हे दाखवून दिलं, की वेदांमध्ये जाती प्रथेचं समर्थन आहे तर मी त्या वेदांना मानणार नाही."
"मी कुठल्याही विशिष्ट धर्माचा प्रतिनिधी नाही"
हिंदू आणि मुस्लीम यांच्यात वाढत चाललेली राजकीय दरी भरण्याचा प्रयत्न जिन्ना-गांधी यांच्या मुंबईतल्या एका भेटीत करण्यात आला. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेवेळी जिन्नांनी म्हटलं, "ज्याप्रमाणे मी मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी चर्चा करत आहे त्याचप्रमाणे तुम्ही हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून माझ्याशी चर्चा केली तरच आपण ही समस्या सोडवू शकू. मिस्टर गांधी, तुम्ही मात्र तुम्ही हिंदू-मुस्लीम दोघांचे प्रतिनिधी म्हणून माझ्याशी चर्चा करता आणि हे मला मंजूर नाही."
गांधींनी म्हटलं, "एखाद्या विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून सौदा करणं, हे माझ्या तत्वांच्या विरुद्ध असेल. या भूमिकेत मी कुठल्याच प्रकारची चर्चा करू इच्छित नाही."
गांधी परतले आणि त्यानंतर त्यांनी कधीच जिन्नाशी बातचीत केली नाही.
पुणे करारानंतर आपापली राजकीय पोळी भाजण्याचा हिशेब मांडून जेव्हा करार करणारे सर्वच करार मोडून बाजूला झाले तेव्हा एकटे गांधी उपवास आणि वयापेक्षा जीर्ण झालेल्या आपल्या देहाला सावरून देशव्यापी 'हरिजन यात्रेला' निघाले. "मी त्या कराराशी जोडलो गेलो आहे, असंच मी मानतो आणि म्हणूनच मी शांत कसा काय बसू शकतो?"
वन मॅन आर्मी - गांधी
गांधींची 'हरिजन यात्रा' ही देशभरात जाती प्रथा, अस्पृशता यासारख्या कुप्रथांविरोधात उठलेलं एक वादळच होतं.
गांधी 'वन मॅन आर्मी' आहेत हे लॉर्ड माउंटबॅटन यांनी खूप उशीरा ओळखलं. मात्र, एकाच व्यक्तिच्या या सैन्याने संपूर्ण आयुष्यात अशा कितीतरी लढाया लढल्या होत्या.
त्यांच्या या 'हरिजन यात्रे'चा वादळी वेग आणि दिवसागणिक वाढणाऱ्या प्रभावापुढे हिंदुत्वातले सगळे कळसूत्री समुदाय निरुत्तर आणि अगतिक होत होते.
त्यामुळे मग दक्षिण भारतातल्या यात्रेदरम्यान सर्वांनी मिळून गांधींना घेरलं आणि थेट हरिजनांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले, की तुमच्या अशा वागण्याने हिंदू धर्माचा नाश होईल.
गांधींनी तिथेच, लाखोंच्या सभेसमोर याचं उत्तर दिलं, "मी जे करत आहे त्याने तुमच्या हिंदू धर्माचा नाश होत असेल तर होऊ द्या. मला त्याची चिंता नाही. मी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आलेलो नाही. मी तर या धर्माचा चेहरामोहरा बदलू इच्छितो."
...यानंतर किती मंदिरं उघडली, किती धार्मिक आचार-विचार मानवीय बनले आणि किती संकुचित विचार दफन झाले, याचा हिशेब मांडला पाहिजे.
सामाजिक-धार्मिक कुप्रथांवर भगवान बुद्ध यांच्यानंतर कुणी सर्वात सखोल, घातक मात्र रचनात्मक प्रहार केला तर ते गांधीच आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे सर्व करताना त्यांनी कुठलाच धार्मिक समाज निर्माण केला नाही, कुठली वेगळी विचारधारा मांडली नाही आणि भारताच्या स्वातंत्र्याचा संघर्षही क्षीण होऊ दिला नाही.
'सत्य' हाच गांधींचा धर्म होता
सत्याच्या साधनेतील प्रवासामध्ये गांधींनी असा एक विचार जगासमोर मांडला जो यापूर्वी कुठल्याच राजकीय चिंतक, आध्यात्मिक गुरू किंवा धार्मिक गुरूने मांडला नव्हता.
त्यांच्या या एका विचाराने जगातल्या सर्व संघटित धर्मांच्या भिंती कोसळल्या. सर्व धार्मिक-आध्यात्मिक प्रथांनाच हादरवून टाकलं.
"ईश्वरच सत्य आहे" हे सर्वप्रथम म्हणणारे गांधीच होते.
त्यानंतर त्यांचं मत बदललं आणि ते या मतापर्यंत पोचले, "आपापल्या ईश्वरालाच सर्वोच्च स्थान देण्याच्या द्वंदानेच तर अराजकता माजवली आहे. माणसाला ठार करून, अपमानित करून, त्याला हीनतेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचवून जो प्रतिष्ठित होतो ते सर्व ईश्वराच्या नावाखालीच तर होतं."
विश्वाला गांधींची गरज
गांधींनी एक वेगळंच सत्य-सार आपल्यासमोर मांडलं आणि हे सार म्हणजे, "ईश्वरच सत्य आहे" हे नाही तर "सत्यच ईश्वर आहे."
"धर्म नाही, ग्रंथ नाही, प्रथा-परंपरा नाही, स्वामी-गुरू-महंत-महात्मा नाही. सत्य आणि केवळ सत्य."
सत्याचा शोध घेणं, सत्याला ओळखणं, सत्याला जन-संभव बनवण्याची साधना करणं आणि त्यानंतर सत्याला लोकांच्या मनात स्थापित करणं - हा आहे गांधींचा धर्म. हा आहे जगाचा धर्म, मानवतेचा धर्म.
अशा गांधींची आज जगाला जेवढी गरज आहे, कदाचित तेवढी गरज यापूर्वी कधीही नव्हती.
(या लेखातील विचार हे लेखकाचं वैयक्तिक मत आहे.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)