You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चांद्रयान 2: ऑर्बिटरने खरंच विक्रम लँडरचा फोटो पाठवला आहे?
अंतराळातून काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा फोटो विक्रम लँडरचा असल्याचं सांगत शेअर होत आहे.
चंद्राभोवती परिक्रमा करत असलेल्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा हा थर्मल फोटो पाठविला असून इस्रोनं तो प्रसिद्ध केल्याचा दावा व्हायरल होत असलेल्या मेसेजमधून करण्यात येत आहे.
47 दिवसांच्या प्रवासानंतर शनिवारी (7 सप्टेंबर) चांद्रयान-2 चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर होतं. त्याचवेळी विक्रम लँडरचा इस्रोच्या बंगळुरू इथल्या केंद्रासोबतचा संपर्कच तुटला.
चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरनं विक्रम लँडर नेमकं कोठे आहे, हे शोधून काढलं आहे. मात्र अजूनपर्यंत या लँडरसोबत कोणताही संपर्क प्रस्थापित झाला नाहीये, अशी माहिती मंगळवारी (10 सप्टेंबर) सकाळी इस्रोनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली. विक्रमसोबत पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचंही इस्रोनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
याआधी रविवारी (8 सप्टेंबर) इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं, की इस्रोला चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रम लँडरचे फोटो मिळाले आहेत. ऑर्बिटरनं विक्रम लँडरची थर्मल इमेज घेतली आहे. हा फोटो पाहून विक्रम लँडरचं हार्ड लँडिंग झालं असल्याचं वाटत आहे.
मात्र सोशल मीडियावर विक्रम लँडरचा म्हणून शेअर केला जाणारा हा फोटो वस्तुस्थितीला धरून नाहीये. इस्रोनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा फेसबुक अथवा ट्विटर अकाउंटवरून विक्रम लँडरचा कोणताही फोटो प्रसिद्ध केलेला नाहीये. इस्रोनं तसं कोणतंही पत्रकही प्रसिद्ध केलं नाहीये.
व्हायरल फोटोचं नेमकं सत्य
इस्रोनं सोडलेल्या 'ऑर्बिटरनं घेतलेली विक्रम लँडरची थर्मल इमेज' म्हणून जो फोटो शेअर होत आहे, तो खरंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या अपोलो-16 चा असल्याचं रिव्हर्स इमेज सर्चमधून समोर आलं आहे.
18 जून 2019 ला नासानं आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या एका लेखात याच फोटोचा वापर केला होता. या लेखातील माहितीनुसार हा अपोलो-16 च्या लँडिग साइटचा फोटो आहे.
16 एप्रिल 1972 ला 12 वाजून 54 मिनिटांनी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर इथून नासानं अपोलो-16 चं प्रक्षेपण केलं होतं. चंद्रावर उतरण्यासाठी नासाच्या एका टीमनं अपोलो-16 चा वापर केला होता. तीन जणांच्या या टीमचं नेतृत्व जॉन डब्ल्यू यंग करत होते.
नासाच्या या अपोलो-16 मोहिमेदरम्यान या तीन अंतराळवीरांनी चंद्रावर जवळपास 71 तास, दोन मिनिटांचा वेळ घालावला होता. 11 दिवस चाललेली नासाची ही मोहिम 27 एप्रिल 1972 ला पूर्ण झाली.
इस्रो आणि के. सिवन यांचे बनावट अकाउंट
सोशल मीडिया (विशेषतः ट्विटर) वर गेल्या काही दिवसांमध्ये इस्रो आणि इस्रोचे प्रमुख के. सिवन यांच्या नावानं काही बनावट अकाउंट तयार करण्यात आले आहेत. हे अधिकृत अकाउंट असल्याचा दावा केला जात आहे. मात्र इस्रोनं हे सर्व अकाउंट आणि प्रोफाईल बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे.
इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार के. सिवन यांचं सोशल मीडियावर कोणंतंही पर्सनल अकाउंट नाहीये. त्यांचा फोटो असलेल्या बनावट अकाउंटवरून जी माहिती दिली जात आहे, त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन इस्रोनं केलं आहे.
यासोबतच इस्रोनं आपल्या वेबसाइटवरून अधिकृत ट्विटर, फेसबुक आणि यू-ट्युब लिंक प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)