'आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवलंच नाही', हा दावा किती खरा, किती खोटा?

अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग याने चंद्रावर पाऊल ठेवलं, त्या घटनेला यंदा 45 वर्षं पूर्ण होत आहेत. मात्र, आजही अनेकांचा या घटनेवर विश्वास नाही. अमेरिकेने चांद्रमोहिमेविषयी खोटी माहिती पसरवल्याचा त्यांचा आरोप आहे.

20 जुलै 1969 रोजी अमेरिकेचं अपोलो-11 हे अंतराळयान चंद्रावर उतरलं आणि हा ऐतिहासिक क्षण साऱ्या जगाने आपल्या टिव्हीवर बघितला.

मात्र, अनेक जणांच्या मते मानवाने कधीही चंद्रावर पाऊल ठेवलेलं नाही.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाच्या माहितीनुसार जवळपास 5% अमेरिकन नागरिकांना पहिल्या चांद्रमोहिमेविषयी अमेरिकेने खोटा दावा केल्याचं वाटतं. ही आकडेवारी कमी वाटत असली तरी ही मोहीम म्हणजे एक षडयंत्र असल्याच्या सिद्धांताला बळ देण्यासाठी पुरेशी आहे.

या षड्यंत्र सिद्धांताच्या समर्थकांचा महत्त्वाचा युक्तीवाद म्हणजे 60 च्या दशकात अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राकडे चांद्रमोहीम यशस्वी करून दाखवण्यासाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञानच नव्हतं.

यावरून एक तर्क बांधता येतो की चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी आवश्यक क्षमता आपल्याकडे नाही, याची कल्पना असूनही नासाने रशियाशी (त्यावेळचा सोव्हियत युनियन) असलेल्या अंतराळ स्पर्धेमुळे चंद्रावर यान उतरवण्याची मोहीम आखली असावी. त्यावेळी अमेरिका आणि रशिया यांच्यात जोरदार अंतराळ स्पर्धा सुरू होती आणि या स्पर्धेत रशिया आघाडीवर होता.

चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आर्मस्ट्राँगचे पहिले शब्द होते, "इटस् अ स्मॉल स्टेप फॉर मॅन, अ जायन्ट लीप फॉर मॅनकाइन्ड". मात्र, हे अपोलो-11 यान पृथ्वीवर पोहोचताच, त्याच्या कामगिरीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

मात्र, 1976 साली We Never Went to the Moon: America's Thirty Billion Dollar Swindle हे पुस्तक प्रकाशित झालं आणि पहिल्या चांद्रमोहिमेवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना बळ मिळालं.

बिल केसिंग या पत्रकाराने हे पुस्तक लिहिलं होतं. नासा कॉन्ट्रॅक्टरच्या पीआर विभागात तो नोकरीवर होता.

चंद्रावर पाऊल ठेवल्याची बातमी खोटी होती, या दाव्याच्या समर्थनार्थ पुस्तकात अनेक युक्तीवाद करण्यात आले आहेत.

हवा नसलेल्या वातावरणात अमेरिकेचा झेंडा 'फडकणे'

युक्तीवादांच्या या यादीत छायाचित्रामध्ये दिसणाऱ्या 'पुराव्यांचा' उल्लेख आहे. यात विशेषतः चंद्रामागच्या आकाशात चांदण्या का दिसत नाही आणि चंद्रावर हवा नसताना अमेरिकेचा झेंडा कसा फडकला, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

कॅलिफोर्निया विद्यापीठात खगोलशास्त्राचे संशोधक असलेले मायकल रिच सांगतात की हा दावा खोटा आहे, हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रीय स्पष्टीकरण आहे.

झेंड्याचा दांडा जमिनीत खूपसताना आर्मस्ट्राँग आणि सहकारी अंतराळवीर बझ आल्ड्रीन यांनी जोर लावला. त्यामुळे झेंडा चुरगळला गेला आणि चंद्रावरचं गुरूत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा सहा पटीने कमी आहे. त्यामुळे झेंड्याचा आकार तसाच राहिला. म्हणून तो फडकल्यासारखा दिसतो, असं रिच यांचं म्हणणं आहे.

'चांदणीविरहीत' आकाश

चांद्रमोहिमेवर शंका उपस्थित करणारे आणखी एक तर्क देतात. ते म्हणजे चंद्रामागच्या आकाशात चांदण्या दिसत नाहीत. छायाचित्रात या भागात संपूर्ण काळोख दिसतो.

मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे छायाचित्र कृष्णधवल म्हणेच ब्लॅक अँड व्हाईट आहे.

रॉचेस्टर तंत्रज्ञान संस्थेत खगोलभौतिकीचे प्राध्यापक असलेले ब्रायन कोबरलेन सांगतात की चंद्राचा पृष्ठभाग सूर्यकिरण परावर्तीत करतो आणि त्यामुळेच तो छायाचित्रात खूप चकचकीत (ब्राईट) दिसतोय.

या तेजामुळे तुलनेने कमी असलेला चांदण्यांचा प्रकाश अधिक मंदावला. शार्प कॉन्ट्रास्टमुळे अपोलो-11 च्या छायाचित्रात चांदण्या दिसत नाहीत.

'पावलांचे खोटे ठसे'

चंद्रावर पाऊल ठेवण्याला 'षडयंत्र सिद्धांत' म्हणणारे चंद्रावर मानवी पावलांच्या ठशावरही प्रश्न उपस्थित करतात.

त्यांचा दावा आहे की चंद्रावर दमट वातावरण नाही. अशा परिस्थितीत चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीर आल्ड्रीन यांच्या पावलाचे ठसे उमटणं अशक्य आहे.

यावर अॅरिझोना स्टेट विद्यापीठात प्राध्यापक असलेले मार्क रॉबिनसन स्पष्टीकरण देतात.

ते सांगतात, "चंद्रावरच्या मातीवर 'regolith' नावाच्या दगड आणि धुळीचा थर आहे. हा थर खूप हलका आहे आणि त्यावर दाब दिल्यास सहज दाबला जातो.

तसंच मातीच्या कणांचा गुणधर्म एकत्र जोडून राहण्याचा (cohesive) आहे. त्यामुळे पाऊल उचलल्यावर पावलाचे ठसे तसेच राहिले."

पुढे रॉबिनसन असंही सांगतात, "चंद्रावर वातावरण नाही आणि वारंही नाही. त्यामुळे तिथल्या जमिनीवर पडलेले ठसे लाखो वर्षं तसेच राहतील."

'रेडिएशनमुळे अंतराळवीरांचा मृत्यू झाला असता'

आणखी एक लोकप्रिय सिद्धांत मांडला जातो. तो म्हणजे पृथ्वीभोवती असलेल्या रेडिएशन (उत्सर्जन) पट्ट्यांमुळे अंतराळविरांचा मृत्यू झाला असता. या पट्ट्यांना व्हॅन अॅलन बेल्ट्स म्हणतात. सौरवादळं आणि पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र (मॅग्नेटिक फिल्ड) एकत्र आल्याने हे बेल्ट्स तयार झालेत.

अंतराळ स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळात शास्त्रज्ञांसाठी रेडिएशन एक मोठी समस्या होती. या रेडिएशन्समुळे अंतराळविरांवर घातक किरणांचा परिणाम होण्याची भीती त्यावेळी वाटत होती.

मात्र, नासाने दिलेल्या माहितीनुसार चंद्राच्या दिशेने प्रवास करत असताना अपोलो-11 यान व्हॅन अॅलेन बेल्ट्समध्ये केवळ 2 तासांसाठी होतं आणि ज्या ठिकाणी रेडिएशन्स सर्वाधिक घातक असतं त्या परिसरात तर केवळ पाच मिनिटं होतं. म्हणजेच अत्यंत कमी वेळ त्या बेल्ट्समध्ये असल्याने अंतराळवीरांच्या शरिरावर कुठलाही विपरित परिणाम झाला नाही.

षड्यंत्र सिद्धांत खोटा ठरवणारी चंद्राची आधुनिक छायाचित्रं

हे लक्षात घेणंही महत्त्वाचं आहे की चंद्राची छायाचित्रं टिपणाऱ्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) या यानाने जी छायाचित्रं काढली आणि नासाने प्रसिद्ध केली त्यात अपोलो यान जिथे उतरलं होतं ती जागा स्पष्ट दिसते.

2009 सालापासून चंद्राभोवती फिरणाऱ्या यानाने काढलेल्या छायाचित्रांमध्ये चंद्रावर यान उतरवण्यात आलं होतं, याचे ठोस पुरावे आढळतात.

या अनेक छायाचित्रांपैकी एकामध्ये अपोलो-11 यान जिथे उतरलं त्या भागाचा फोटो आहे. त्यात मातीवर यानाच्या खुणा आणि यानाचे काही भागही दिसतात.

या छायाचित्रांमध्ये चंद्रावर आतापर्यंत उतरलेल्या सहा पथकांनी फडकवलेल्या झेंड्यांच्या प्रतिमाही दिसतात. चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या झेंड्याच्या सावल्या छायाचित्रात स्पष्ट दिसतात.

याला केवळ एक अपवाद आहे. अपोलो-11 यान चंद्रावरून उडालं तेव्हा त्याच्या इंजिन एक्झॉट्सची जमिनीला धडक झाल्याचं आल्ड्रीन यांनी सांगितलं होतं.

शेवटी : षडयंत्र सिद्धांताला रशियाने समर्थन का दिलं नाही?

वर उल्लेख केलेले षडयंत्र सिद्धांत खोटे ठरवण्यात आले असले तरी ते खूप लोकप्रिय आहेत.

असं असलं तरी वास्तवात 20 जुलै 1969 या दिवशी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवलं, याचे अनेक वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत.

षडयंत्र सिद्धांत मांडणाऱ्यांना एक प्रश्न वारंवार विचारला जातो. तो म्हणजे जर पहिली चांद्रमोहिम खोटी होती तर अमेरिकेसोबत शीतयुद्ध करणाऱ्या आणि स्वतः गुप्तपणे चंद्रावर मानव पाठवण्याची मोहीम आखणाऱ्या रशियाने कधीच हे आरोप का केले नाही?

नासाचे माजी मुख्य इतिहासकार रॉबर्ट लॅव्युनिस म्हणतात, "आम्ही चंद्रावर पाऊल ठेवलंच नव्हतं आणि आम्ही खोटं बोलत असू तर ते सिद्ध करण्याची रशियाची क्षमताही होती आणि त्यांची तशी इच्छाही होती."

ते पुढे म्हणतात, "त्यांनी (रशियाने) कधीच चकार शब्दही काढला नाही आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)