You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चांद्रयान 2 : भारतीय व्यक्ती कधी चंद्रावर जाऊ शकेल?
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्रो) पुन्हा चंद्रावर आपलं यान पाठवणार असल्याची घोषणा केली आहे. याआधी ऑक्टोंबर 2008 मध्ये इस्रो चांद्रयान -1 या यानाला चंद्रावर पाठवलं होतं.
इस्रोने यावेळी चांद्रयान -2ची घोषणा केली असून या यानाला 15 जुलैला सकाळी 2.51 वाजता आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटाहून प्रक्षेपित केलं जाईल. या अंतराळ मोहिमेचा संपूर्ण खर्च हा 600 कोटीपेक्षा अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.
3.8 टन वजन असलेल्या चांद्रयान-2 ला जीएसएलवी मार्क-तीन वरून अंतराळात प्रक्षेपित केलं जाईल.
चांद्रयान-2 ही अत्यंत महत्त्वाची अंतराळ मोहीम असून यात एक ऑर्बिटर आहे, एक 'विक्रम' नावाचं नवं लँडर आहे आणि एक 'प्रज्ञान' या नावाचं रोव्हर आहे. या मोहिमेव्दारे पहिल्यांदाच भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. असं लॅंडिंग अवघड आहे असं म्हटलं जातं.
असं झालं तर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होईल. आणि म्हणूनच ही मोहीम भारतासाठी महत्त्वाची आहे. याव्दारे भारत चंद्राविषयी अजून संशोधन करू शकेल. इस्रोला वाटतं की ही मोहीम यशस्वी ठरेल.
चांद्रयान -1 किती यशस्वी ठरलं?
चांद्रयान -1 ही मोहीम दोन वर्षांची होती, पण उपग्रहात बिघाड झाल्यामुळे ती एका वर्षात पूर्ण करावी लागली. इस्रोने आधीच्या मोहिमेवरून धडा घेतला असून या दुसऱ्या मोहिमेच्या वेळेस अनेक बदल आणि सुधारणा केल्या आहेत.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, त्यांनी चांद्रयान-2 ला अशा पद्धतीनं बनवलं आहे की त्याचं ऑर्बिटर एक वर्षभर चंद्राच्या कक्षेत काम करेल. तर लँडर आणि रोव्हर हे 14 दिवसांसाठी चंद्राच्या पृष्ठभागावर काम करतील.
लँडर आणि रोव्हर 70 डिग्री अक्षांशातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जातील. आजपर्यंत एकाही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काम केलेलं नाहीये. जिथे भारत जातोय तिथवर अजून कोणत्याही देशाने जायची हिंमत केलेली नाही.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब सापडले म्हणून या मोहिमेत तिथं पाणी सापडण्याची शक्यता जास्त आहे. असं झालंच तर चंद्रावर मानवी वसाहत निर्माण करण्याचे रस्ते उघडतील. हेच चांद्रयान-2 चा उद्देश आहे.
भारतीय व्यक्ती कधी चंद्रावर जाणार?
भारताच्या अंतराळ मोहिमेचं उदिष्ट भारतीय लोकांना फायदा व्हावा हे आहे. यात इस्रोला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे.
भारतातील शेतकरी, मच्छिमार किंवा सामान्य नागरिक कोणीही आज सहजपणे ATM वरून पैसे काढू शकतात. हे फक्त भारतीय उपग्रहांमुळे शक्य झालेलं आहे. येत्या काळात इस्रोला विज्ञानच्या क्षेत्रात अधिक काम करायचं आहे.
इस्रोची इच्छा आहे की भविष्यात 2022 पर्यंत 'गगनयान' या मोहिमेव्दारे भारतीय व्यक्तीला भारतीय जमिनीवरून अंतराळात, खासकरून चंद्रावर पाठवावं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं असून भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून ही मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे.
अंतराळ मोहिमांच्या बाबतीत भारताच्या पुढे कोण?
चीन प्रत्येक बाबतीत भारताच्या खूप पुढे आहे. पण कार्यक्षमतेच्या बाबतीत भारतही मागे नाही.
भारताने अंतराळ संशोधनात मोठ्या प्रमाणात यश कमावले आहे आणि हे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारताकडे सर्वांत जास्त उपग्रह आहेत.
भारताच्या अंतराळातील कामगिरीचा दबदबा संपूर्ण जगभर नावाजला जातो आणि भारताचे हे प्रयत्न जनतेच्या फायद्यासाठीचे आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)