You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका तयार करणार अंतराळात लढू शकणाऱ्या फौजा - डोनाल्ड ट्रंप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेच्या सैन्याची सहावी शाखा सुरू करू इच्छितात. त्याचं नाव स्पेस फोर्स असेल. स्पेस फोर्स म्हणजे अंतराळात लढू शकेल असं सैन्य.
देशाच्या सुरक्षेसाठी अंतराळात अमेरिकेची फक्त उपस्थितीच नाही तर ती दमदार उपस्थिती असावी असं ट्रंप यांना वाटतं.
त्यांनी सांगितलं की हे एक वेगळं सैन्य असेल. त्यामुळे देशाची सुरक्षा तर वाढेलच, पण त्याचबरोबर नवीन नोकऱ्यासुद्धा तयार होतील आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल.
रशिया किंवा दुसऱ्या देशांना यामध्ये पुढे जाऊ देणार नसल्याचही ट्रंप म्हणालेत.
अमेरिका पुन्हा चंद्रावर जाईल आणि लोकांना मंगळावर पाठवण्याचं आश्वासनसुद्धा ट्रंप यांनी दिलं आहे.
ट्रंप यांनी घोषणा केली, "हे अतिशय महत्त्वाचं आहे. मी संरक्षण विभाग आणि अमेरिकेच्या सैन्याची सहावी शाखा म्हणून स्पेस फोर्स तयार करण्याच्या दृष्टीनं काम सुरू करण्याचा आदेश देत आहे. वायुसेनेशिवाय अमेरिकेची आणखी एक शाखा असेल. अंतराळात जे सैन्य असेल ते वायुसेनेसारखंच असेल."
ट्रंप राष्ट्रीय स्पेस काऊंसिल बरोबर होणाऱ्या बैठकीच्या आधी एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
"मी डिसेंबरमध्ये या ऐतिहासिक आदेशावर सही केली होती. मी म्हटलं होतं की 1972 नंतर अमेरिकेला मी पुन्हा चंद्रावर घेऊन जाईन. यावेळेला आम्ही चंद्रावरच नाही तर मंगळावर जाण्यासाठी आपलं मिशन सुरू करू, हे सगळं खूप लवकर होईल," असं ते पुढे म्हणाले.
ट्रंप यांनी आपल्या या वक्तव्यातून वेगानं वाढणाऱ्या स्पेस इंडस्ट्रीला बरोबर घेऊन काम करण्याचे संकेत दिले आहेत.
त्यांनी सांगितलं की, ते देशातल्या धनाढ्य लोकांना आपल्या संपत्तीचा वापर रॉकेट लाँच करण्यासाठी परवानगी देतील.
पण हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरेल, नवीन स्पेस फोर्सचं काय रूप असेल, ते कसं काम करेल याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
लष्कराची एक नवीन शाखा तयार करण्यासाठी त्यांना काँग्रेसमध्ये एक नवा कायदा संमत करून घ्यावा लागेल. त्यानंतरच या निर्णयाला वैधता प्राप्त होईल.
बीबीसीच्या व्हाईट हाऊसच्या प्रतिनिधी तारा मॅकेल्वीसुद्धा या पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या. त्या सांगतात की ट्रंप या भाषणादरम्यान अतिशय खूश दिसत होते.
त्या म्हणाल्या, "ट्रंप यांनी स्पेस फोर्सची घोषणा केल्यावर लोकांना धक्का बसला. काही लोक हसायला लागले."
खरंतर ही नवीन संकल्पना नाही. याआधी डोनाल्ड रॅम्सफेल्ड यांनी 2000 मध्ये एक स्पेस फोर्स तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याचं पुढे काहीही झालं नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)