You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे: तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना टार्गेट केलं जातंय #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना टार्गेट केलं जातंय: नारायण राणे
ईडी आणि सीबीआय यांसारख्या संस्थांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांनी भाजपवर निशाणा साधल्याचे वृत्त 'सकाळ'ने दिले आहे. "तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षांना टार्गेट केलं जात आहे." असं नारायण राणे म्हणाले.
"एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचे असल्यास यासाठी काही एजन्सी काम करत आहेत. मी त्या एजन्सीच्या म्होरक्याला विचारले की असे का करत आहात, तेव्हा त्यांनी काही जणांच्या आदेशावरून असे करावे लागत आहे, असे सांगितले."
"तपास संस्था कोणासाठी काम करतात की पैशासाठी काम करतात हे मी सांगू शकत नाही. मात्र नेत्यांना बदनाम करण्यासाठी एजन्सी काम करत आहेत, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला."
2. उदयनराजेंना कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत बांधता येणार नाही - शिवेंद्रसिंहराजे भोसले
उदयनराजेंना कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत बांधता येणार नाही ते कोठेही असोत, त्यांची विधानसभा निवडणुकीत मला मदतच होणार आहे, असे मी यापूर्वीही सांगितले आहे आणि आजही सांगतो आहे. असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे सांगितल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशांच्या चर्चेबाबत शिवेंद्रसिंहराजे यांची काय भूमिका असणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेरीस आज शिवेंद्रसिंहराजे यांनी याबाबतचे आपले मत व्यक्त केले. 'कोणी कोणत्या पक्षात जावे हा निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा असतो. उदयनराजे हे माझे थोरले चुलत बंधू आहेत. ते कुठेही असले तरी मला मदत करणार आहेत. तेही आता भाजपमध्ये जाणार असे समजतं आहे. मी त्यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे यावेळेस विधानसभेला ते मला नक्की मदत करतील असे यापूर्वीही मी सांगितले आहे आणि आजही सांगतो. कारण, उदयनराजेंना कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत बांधता येणार नाही.'
3. पुरामुळे ४ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान
अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील तब्बल 4 लाख 9 हजार 516 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे वृत्त 'लोकमत'ने दिले आहे.
राज्य ओल्या आणि कोरड्या दुष्काळाला सामोरे जात असल्याने शेतीला दुहेरी फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील तब्बल 4 लाख 9 हजार 516 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, मराठवाड्यात कमी पावसामुळे मूग आणि उडिद पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
राज्यात ऊस पिक वगळून खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 140.69 लाख हेक्टर असून, 134 लाख हेक्टर (95 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊस पिकासह सरासरी क्षेत्र 149.74 लाख हेक्टर असून, त्या पैकी 135.05 लाख हेक्टरवर पेरणीची कामे झाली आहेत. राज्यात 1 जून ते 16 ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या 105.88 टक्के पाऊस झाला असला तरी राज्यात पावसाची विषमता आहे. पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आणि मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे पिकांना नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
4. भाज्यांची शंभरी, कांदाही महाग
घाऊक बाजारातील दरवाढीचा फायदा उचलत किरकोळ विक्रेत्यांनीही दर वाढवले आहेत अशी बातमी 'लोकसत्ता'ने दिली आहे.
पूरग्रस्त जिल्ह्य़ातून मुंबईत शेतमालाची आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या घाऊक दरांमध्ये वाढ होताच किरकोळ बाजारात पुराच्या नावाने ग्राहकांची लूट सुरू आहे. किरकोळ बाजारात सर्वच प्रमुख भाज्यांनी किलोमागे शंभरी गाठली आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ातील कांदा चाळींमध्ये पाणी शिरल्याने कांदादरही किलोमागे ३० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात होणारी शेतमालाची आवक घटली. त्यामुळे वाशी आणि कल्याण या घाऊक बाजारांमधील भाज्यांच्या दरातही वाढ झाली. पूरस्थितीच्या वेळी वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ३०० ते ३५० गाडय़ांमधून भाज्यांची आवक होत होती. गेल्या काही दिवसांपासून आवक वाढली असून, सद्य:स्थितीत वाशी बाजारात भाज्यांच्या ५५० ते ६०० गाडय़ांची आवक होत आहे. मात्र, भाज्यांचे दर फारसे कमी झालेले नाहीत. कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवार, कारली, पडवळ, काकडी, गाजर, वाटाणा आणि वांगी या भाज्यांचे घाऊक दर किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत.
5. सोशल मीडियाला नियंत्रित करण्याचा विचार नाही : मद्रास हायकोर्ट
सोशल मीडिया अकाउंट्सना आधारसोबत लिंक करण्याचा कसलाही विचार नसल्याचं मद्रास हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. 'द हिंदू'ने ही बातमी दिली आहे. अशाप्रकारे अकाउंट लिंक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी दरम्यान कोर्टानं हे स्पष्ट केलं आहे.
न्यायमूर्ती एस. मणिकुमार आणि सुब्रमणियम प्रसाद यांनी स्पष्ट केलं की या याचिकांमध्ये जी मागणी आहे, त्याची व्याप्ती वाढवण्याबाबत कोर्टानं यापूर्वीच विचार केलेला असून त्यासंदर्भात फेसबुक, गूगल, व्हॉट्स अॅप, ट्विटर आणि यूट्यूब यांना नोटीस बजावून सूचना दिलेली आहे की सायबर गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांनी आवश्यक असलेली माहिती त्यांनी उपलब्ध करून द्यावी.
अॅडव्होकेट जनरल विजय नारायणन यांनी कोर्टासमोर सांगितलं की व्याप्ती वाढवण्याच्या कोर्टाच्या सूचनेनंतर बऱ्याच गोष्टी घडल्या असून सोशल मीडिया कंपन्या याबाबत सहकार्य करण्यासाठी पुढे येत आहे. कोर्टानं अडव्होकेट जनरल यांचं हे म्हणणं मान्य केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)