कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत की भीक? : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद

सांगली-कोल्हापूरमधला पूर ओसरला असला तरी मदतकार्य अजूनही सुरूच आहे. राज्यभरातून कोल्हापूर आणि सांगलीकडे मदतीचा ओघ येत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याची भावना स्वाभाविक असली, तरी एका मदतीवरुन सध्या चांगलाच वाद रंगला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पूरग्रस्तांसाठी 'गोळा' केलेल्या मदतीवर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी कडाडून टीका केली.

काय आहे प्रकरण ?

भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार असलेल्या संभाजी राजे यांनी सोमवारी पहाटे विनोद तावडे यांचा एक व्हीडिओ ट्विट केला. यामध्ये त्यांनी लिहिलं, की स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हीडिओ आत्ताच पाहिला. इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही."

लोकनियुक्त सरकारच्या मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन मदत पोहोचवावी, असा सल्लाही त्यांनी विनोद तावडेंना दिला.

संभाजी राजेंनी केलेल्या ट्विटला 24 तास उलटून गेल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारं निवेदन प्रसिद्ध केलं.

"गोर-गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले 10-10 रुपये मिळून 3.50 लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले 24.50 लाख रुपये, अशी एकूण 28 लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हा सर्वांना माहीत आहे. ही भीक नव्हे तर जिव्हाळ्याने केलेली मदत आहे. पण संभाजी राजे यांनी त्याची अवहेलना केली, याची मला खंत वाटते, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी म्हटलं आहे.

बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे, असंही विनोद तावडेंनी आपल्या निवेदनात म्हटलं.

"या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे, म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं."

"राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजी राजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे."

आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते, असं तावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

तावडे यांच्या निवेदनावर बीबीसी मराठीनं संभाजी राजे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी म्हटलं, की मला जे म्हणायचं होतं ते माझ्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. लोकांना व्हीडिओ बघितल्यानंतर ते काय आहे हे समजत आहे. त्यामुळे विनोद तावडे काय वक्तव्य करतात याच्याशी मला देणं घेणं नाही. पण मदत आणि भीक यामध्ये फरक काय एवढंच मला माहिती आहे"

कोल्हापूरकर संभाजी राजेंसोबत

याप्रकरणी संभाजी राजेंनी केलेल्या ट्विटनंतर कोल्हापूरकर त्यांच्या पाठिशी उभे राहिल्याचं दिसून आलं.

कोल्हापूरचे अतुल होवाळे सांगतात, "माननीय मंत्री विनोद तावडे हे कोल्हापूरकर जनतेची थट्टा करत आहेत. विनोद तावडे आधीपासूनच असे प्रकार करतात. यापूर्वीही शिक्षण म्हणजे बेरोजगार निर्मिती करणारा कारखाना आहे, असं ते म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी युवकांची चेष्टा केली. त्याचप्रमाणे आता त्यांनी कोल्हापूरकरांची थट्टा केली आहे. कोल्हापूरसाठी त्यांनी भीक मागितली. एकीकडे मुख्यमंत्री आणि शासन आम्हाला मदत करत आहे. त्यामुळे सरकारमध्येच दुफळी आहे का असं प्रश्न निर्माण होतो."

भाजप सरकारकडे पुतळे बसवायला, कुंभच्या निधीसाठी पैसे आहेत परंतु पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही, त्यामुळे संभाजी राजे यांच्या विधानाशी सहमत असल्याचं श्रीतेज चंदनशिवे यांनी सांगितलं.

"संभाजी राजे यांचं ट्विट म्हणजे संपूर्ण कोल्हापूरकरांची भावना आहे," असं सुभाष पाटील यांनी म्हटलं. "शासकीय मदत देणं हे तावडे यांचं काम आहे. पण यांनी पूरग्रस्तांना मदत मागण्यासाठी भीक मागण्याचा स्टंट केला. कोल्हापूरकरांना कधीच कुणाच्या भीकेची गरज पडली नाही. आम्ही समर्थ आहोत. ही वाईट परिस्थिती आहे. तरीसुद्धा या परिस्थितीला तोंड देऊन आम्ही नवं कोल्हापूर उभं करू."

सोशल मीडियावर विनोद तावडे ट्रोल

ट्विटरवर संभाजी राजे यांनी हा व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये कोल्हापूरकरांसह इतर नागरिक विनोद तावडे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. कोल्हापूरकर स्वाभिमानी असून त्यांच्या मदतीसाठी कुणाच्या भिकेची गरज नाही असा सूर ट्विटरवर उमटला.

"संभाजी राजेंचं विधान पोरकटपणाचं"

मूळचे कोल्हापूरचे असलेले आणि सध्या मुंबई महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांना मात्र संभाजी राजे यांचं विधान पोरकटपणाचं वाटतं.

"विनोद तावडे यांनी पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केल्यावर संभाजी राजेंना राग येण्याचं काय कारण आहे हे मला कळत नाही. माणूस त्याच्या कुवतीनुसार मदत करत असतो. त्यामुळे विनोद तावडे यांनी लोकांकडून मदत गोळा करून घेतली असेल तर त्यात काहीच गैर नाही. त्यामुळे भीक मागण्याचा आक्षेप चुकीचा आहे. अशा प्रकारे मदत मागण्याची जुनी परंपरा आहे. त्यातून एखाद्या आपत्तीसंदर्भात त्या लोकांच्या दुःखामध्ये अधिकाधिक लोकांना सामावून घेणं हा एक उद्देश असतो. एकाच व्यक्तीने 50 लाख देण्यापेक्षा अनेक लोकांनी मिळून ही रक्कम दिली तर त्यात त्यांच्याही भावना जोडल्या जातात," असं चोरमारे यांनी म्हटलं.

मराठा वर्चस्वाच्या राजकारणाचा पैलू

"भारतीय जनता पक्षातील मराठा वर्चस्वाच्या राजकारणाचा पदर याला असू शकतो. पण हा केवळ अंदाज आहे. भाजपअंतर्गत मराठा नेतृत्वाचं राजकारण आहे. भाजपमध्ये विनोद तावडे हे बराच काळ पक्षाचा मराठा चेहरा होते. त्यानंतर आशिष शेलार यांची उंची वाढवण्यात आली. त्यामुळे ते मुंबईतले त्यांचे स्पर्धक झाले. पण शेलार हे मुंबईपुरते मर्यादित होते. तावडे मागच्या दहा वर्षांपासून राज्याच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांना काऊंटर करण्याचा तो एक भाग असू शकतो."

"तावडे यांनी 11 ऑगस्टला ही मदत फेरी काढली होती. हा व्हीडिओ आज पाहण्यात आला असं संभाजी राजे म्हणतात. हा विषय आता का उकरून काढण्यात आला याबाबत प्रश्न पडतो," असं चोरमारे यांनी म्हटलं.

चोरमारे म्हणतात, "एखादी व्यक्ती मदत मागण्यासाठी उतरला तरी त्याला काय हरकत आहे. तावडे यांनी वैयक्तिक किती मदत केली हा प्रश्न त्यांना आपण विचारू शकतो पण तुम्ही मदत मागायला कसं उतरलात असं विचारणं चुकीचं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)