You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सांगली-कोल्हापुरातला महापूर ही मानवनिर्मित आपत्ती?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोल्हापूर-सांगलीचा महापूर अद्याप पूर्णपणे ओसरला नाही आहे. उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करायलाही किती काळ लागेल हे माहित नाही. पण पश्चिम महाराष्ट्राला पाण्याखाली घालणारा हा महापूर केवळ अतिवृष्टीचा परिणाम होता का? की काही मानवनिर्मित कारणंही पुराचा परिणाम वाढवण्यामागे होती? अतिवृष्टी नाही, पण पुराची दाहकता कमी करता आली असती का? ती तशी करता आली असती, असं मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ माधव गाडगीळ यांचं आहे.
'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली मतं विस्तारानं मांडली आहेत.
त्यांचा रोख मुख्यत्वे धरणांतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या नियोजनाकडे आहे. धरणं पूर्ण भरण्यापर्यंत वाट न बघता, स्थानिक लोकांवर विश्वास ठेवून जर अगोदरच धरणांतून पाणी सोडणं सुरु केलं असतं तर परिस्थिती इतकी बिकट झाली नसती असं मत गाडगीळ यांनी मांडलं आहे.
"महाराष्ट्रातल्या धरणांच्या बाबतीत हेच झालं असणार. अलमट्टी धरणाच्या बाबतीत तर हे स्पष्टच आहे ज्यावेळी त्यांनी पाणी सोडायला पाहीजे होतं त्यावेळेस ते सोडलं नाही. त्यामुळे पूरस्थिती आली यात काहीच संशय नाही. झगडे नावाचे माजी आय ए एस अधिकारी आहेत, त्यांनीही हे स्पष्ट सांगितलं आहे. 2005 मध्ये जेव्हा अशी स्थिती आली होती त्यावेळेस अगोदर पाणी सोडायला राजकीय लोकांकडून त्यांना विरोधही झाला होता. पण नंतर परिणाम दिसले तेव्हा प्रशंसा झाली. त्यामुळे धरणांतून पाणी ते भरण्याची वाट न पाहता अगोदर सोडायला हवं होतं," माधव गाडगीळ म्हणाले.
केवळ महाराष्ट्र नव्हे तर दक्षिणेकडे कर्नाटक आणि केरळमध्ये पसरलेल्या पश्चिम घाटामध्ये सर्वत्र पूरपरिस्थिती आहे.
शेकडो लोकांचे जीव गेले आहेत. याच पश्चिम घाटातल्या पर्यावरणाच्या स्थितीवर 2011 मध्ये माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं दिलेला अहवाल प्रत्येक राज्यातल्या, आधीच्या आणि सध्याच्या, सगळ्या सरकारांनी डावलला. पण त्या अहवालात पश्चिम घाटातल्या मानवी हस्तक्षेपामुळे भविष्यात काय आव्हानं येऊ शकतात याचं सूतोवाच करण्यात आलं होतं. आता वारंवार येणा-या पुरांचं पण सुतोवाच त्यात केलं गेलं होतं का?
"इतक्या तपशीलात कोणीही भाकित करू शकलं नसतं की अहवाल २०११ मध्ये पूर्ण केला आणि २०१९ मध्ये हे असं होईल. पण या ज्या प्रवृत्ती होत्या, त्यांच्याकडून होणारा जमिनीचा गैरवापर, उभ्या चढांवर होणारी बांधकामं, दगडखाणी किंवा इतर खाणी या सगळ्यांचा दुष्परिणाम होईल हे स्पष्ट दिसत होतं आणि आम्ही ते मांडलं होतं.
केवळ नुसतं सुतोवाच नाही तर आम्ही सारी शास्त्रीय माहिती गोळा करून, ती नमूद करून जे म्हणायचं ते स्पष्ट म्हटलं होतं. मुख्य म्हणजे स्थानिकांना तिथल्या निसर्गाची आणि हवामानाची माहिती अधिक असते. तेव्हा त्यांचं म्हणणं विचारात घ्या असं आम्ही म्हटलं होतं. केरळात तर काही पंचायतींनी पाणी सोडायला सांगितलं होतं, पण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं गेलं." गाडगीळ या मुलाखतीत म्हणाले.
पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला जातोय
माधव गाडगीळ यांनी या मुलाखतीत ज्या प्रकारे जलसंवर्धनाची काम चालली आहेत आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला जातो आहे, त्याबद्दलही आक्षेप व्यक्त केला आहे.
"'जलयुक्त शिवार' सारखे कार्यक्रम महाराष्ट्रात चालू आहेत. माझे अनेक तज्ञ मित्र मला सांगताहेत की जेसीबी वगैरे वापरून ज्या प्रकारे कामं केली जाताहेत ती अयोग्य आहेत. ते सांगताहेत की मोठ्या नद्या नाही, पण नद्यांलगत जे ओढे आहेत किंवा पाणी जातं आहे त्यांचे प्रवाह बदलले जाताहेत. काही नागमोडी आहेत ते सरळ केले जाताहेत. ओढे खोदलेत त्यामुळे रेती निघून गेली आहे. त्यामुळे निष्कारण खूप वेगानं पाणी जातं जातं आहे.
"सांगली कोल्हापूरबद्दल आपण बोलतो आहोत. पण बाकी ठिकाणी असं होतं आहे त्याबद्दलही बोललं पाहिजे. नद्यांमध्ये वेगानं पाणी गेल्यानं पूरपरिस्थिती वाढायला मदत होते. जर या उपनद्यांमधून, ओढ्यांमधून पाणी जोरानं कृष्णेसारख्या नद्यांमध्ये गेलं नसतं तर या पूराचा परिणाम थोडा तरी कमी झाला असता. त्यामुळं इथंही काही चुका केल्या गेलेल्या आहेत. त्याबाबतचे जे दावे आहेत त्यांच्यावर संशोधन केलं गेलं पाहिजे," असं गाडगीळ या मुलाखतीत म्हणाले.
नदीपात्रातून वाळूचा होणारा उपसा आणि पूररेषेच्या आत शहरी भागात होणारी अनियंत्रित बांधकामं यांच्यामुळेही पूराची दाहकता अधिक वाढली असं माधव गाडगीळ म्हणाले.
कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही शहरांत अशा अनेक इमारती या पुराच्या काळात पाण्याखाली गेल्या. "पूररेषेच्या आत अशा प्रकारची बांधकामं केल्यानं पुरानं होणारं नुकसान वाढतं यात काहीही संशय नाही. रेतीउपशामुळेही परिणाम अधिक भयावह होतो. पाणी झिरपत नाही. ते अधिक वेगानं वाहतं आणि पूरकाळात ते अधिक वेगानं पसरतं. त्यामुळं अतिवृष्टीमुळे येणा-या पुराला हे असे उद्योग मदतच करतात," गाडगीळ म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)