काश्मीर कलम 370: श्रीनगरमध्ये मोठी निदर्शनं, सुरक्षादलांकडून बळाचा वापर

    • Author, रियाज मसरुर
    • Role, श्रीनगरहून, बीबीसी प्रतिनिधी

काश्मीरमध्ये जम्मूतील पूंछ, राजौरी, डोडा आणि किश्तवाड प्रदेशात सलग सहा दिवस जमावबंदी लागू आहे. या सगळ्या ठिकाणी कर्फ्यूसारखं वातावरण आहे.

श्रीनगरमधील सौरा प्रदेशात सरकारच्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात विरोध पाहायला मिळाला. ही निदर्शने किरकोळ असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र आम्ही ज्या ठिकाणी पोहोचलो त्याठिकाणी जुम्याच्या नमाजनंतर आम्हाला मोठ्या प्रमाणात माणसं पाहायला मिळाली.

ईद सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जमावबंदीच्या नियमातून सूट देण्यात येईल असं सरकारनं जाहीर केलं होतं. मात्र ज्या ठिकाणी आंदोलनं-निदर्शनं सुरू आहेत त्याठिकाणी कडक नाकाबंदी लागू करण्यात आहे.

श्रीनगरमधील सौरामध्ये आंदोलनाचा व्हीडिओ

सौरातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसहून ईदगाहकडे रस्ता जातो. त्या रस्त्यावर अर्ध्या तासात हजारोंच्या संख्येने माणसं उतरलेली पाहायला मिळाली.

ही सगळी माणसं सरकारच्या निर्णयाचा विरोध करत होती. सुरुवातीला सुरक्षा यंत्रणांनी त्यांना जाऊ दिलं. मात्र थोड्या वेळानंतर सुरक्षायंत्रणांनी त्यांच्यादिशेने गोळीबार सुरू केला.

सुरुवातीला पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नंतर त्यांनी पॅलेट गनचा वापर केला. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. प्रत्येकजण स्वत:ला वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागला.

सौरा इन्स्टिट्यूटमध्ये आठ जखमींना दाखल केल्याचं आम्ही पाहिलं. यामध्ये दोन महिलांचा समावेश होता. एका तरुण मुलाच्या पायाला गोळी लागली होती. बाकी लोकांना पॅलेट लागल्या होत्या.

ईदची तयारी

ईदचा सण काही दिवसांवर आला आहे. ईद-उल-अजहा असं त्याचं नाव आहे. यात कुर्बानी हा विधी असतो. लोकांनी या सणासाठी अनेक बकऱ्या आणि बोकड लोकांनी तयार ठेवले आहेत.

ज्या लोकांसाठी कुर्बानी देणं महत्त्वाचं आहे, त्यांना बकरी किंवा बोकड मिळणं अवघड झालं आहे. कारण ईदगाहच्या ठिकाणीच प्राण्यांचा बाजार भरतो.

ईद सणासाठीचं उत्साही वातावरण कुठेही अनुभवायला मिळत नाहीये. खरेदीचं वातावरण दिसत नाहीये. ज्या रस्त्यावर जाण्याची सूट देण्यात येत आहे तिथे माणसं खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. शोपिया, पुलवामासारख्या ठिकाणी तर जनजीवन ठप्प झालं आहे. याठिकाणी कलम 370 हटवण्याविरोधात सर्वाधिक प्रमाणावर आंदोलनं-निदर्शनं झाली आहेत.

ईदच्या तयारीबाबत आम्ही लोकांना विचारलं. त्यावेळी त्यांनीच आम्हाला ईद कधी आहे? असा प्रश्न विचारला. सरकारच्या निर्णयाने या भागात किती नाराजी आहे हे स्पष्ट होतं.

रोजचं आयुष्य कसं आहे?

काश्मीर खोऱ्यात कर्फ्यू लागणं नवीन नाही. त्यांना या सगळ्याची सवय झाली आहे. याआधी खोऱ्यात अनेकदा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

यावेळी फरक हा की खोऱ्यात लागू कर्फ्यूसह लोकांच्या मनात विचित्र भावना आहे. काश्मीरमधील प्रभावशाली व्यक्ती मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यासारखी माणसंही असहाय्य आहेत. या नेत्यांचे जे कार्यकर्ता आहेत त्यांना आग्र्याला पाठवण्यात आलं आहे.

सुरक्षा यंत्रणांचा दृष्टिकोन काय?

सुरुवातीला आम्ही जिथे गेलो तिथे सुरक्षायंत्रणांचा दृष्टिकोन आम्हाला मवाळ वाटला. ज्याठिकाणी जाण्यास मज्जाव होता त्याबद्दल सुरक्षायंत्रणांनी सविस्तरपणे सांगितलं.

आम्ही जम्मू काश्मीर पोलिसांशी बातचीत केली. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ एकत्रितपणे काम करतात असं पोलिसांनी सांगितलं. यावेळी सीआरपीएफचं वागणं थोडं बदललं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे.

सुरक्षा प्रोटोकॉलनुसार सीआरपीएफला जम्मू काश्मीर पोलिसांच्यात अखत्यारीत येतं. श्रीनगरमधील सौरामध्ये आंदोलन झालं त्याठिकाणी जम्मू काश्मीर पोलिसांकडून फायरिंग करण्यात आलं. सीआरपीएफने या आंदोलनकर्त्यांना तीन नाक्यांवरून पुढे जाऊ दिलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)