कोल्हापूर, सांगलीत पाऊस आणि पूर कायम, पिण्याच्या पाण्याची टंचाई

    • Author, स्वाती पाटील राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी कोल्हापूरहून

कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुरुवारी सांगलीतल्या ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून नऊ जणांचा मृत्यू झाला.

पुरामुळे राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग, गावागावाना जोडणारे रस्ते बंद आहेत, त्यामुळे कोल्हापूर-सांगली एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प आहे. तर रेल्वे मार्गही बंद आहे. त्यामुळं प्रवासी अडकून पडलेत.

धरणांमधून पाण्याचा विसर्ग

अलमट्टी धरणातून 3 लाख 80 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे.

कोयना धरणामधून आज सकाळी 7 वाजता 69,075 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

कुठल्या धरणात किती पाणीसाठा?

  • तुळशी 3.30 टीएमसी
  • वारणा 32.19 टीएमसी
  • दूधगंगा 22.78 टीएमसी
  • कासारी 2.50 टीएमसी
  • कडवी 2.52 टीएमसी
  • कुंभी 2.48 टीएमसी
  • पाटगाव 3.72 टीएमसी
  • चिकोत्रा 1.41
  • चित्री 1.88 टीएमसी
  • जंगमहट्टी 1.22 टीएमसी
  • घटप्रभा 1.56 टीएमसी
  • जांबरे 0.82 टीएमसी
  • कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे :

राजाराम 52.11 फूट, सुर्वे 50.1 फूट, रुई 80.6 फूट, इचलकरंजी 77.6 फूट, तेरवाड 82.3 फूट, शिरोळ 77.5 फूट, नृसिंहवाडी 77.5 फूट, राजापूर 62.4 फूट तर नजीकच्या सांगली 57.5 फूट आणि अंकली 62.4 फूट अशी आहे.

सांगलीत आज पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पुराची स्थिती जैसे थे आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र दिलासा देणारी गोष्ट म्हणजे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 2 फुटांनी घट झाली आहे.

पंचगंगा नदीची सकाळी 7 वाजताची पाणीपातळी 52.11 फूट इतकी होती. जिल्ह्यातल्या 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अडकलेल्या 24 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. तसंच आंबेवाडीमधील 99 टक्के तर प्रयाग चिखली मधील 85 टक्के कुटुंबांचं स्थलांतर झालं आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पुराच्या पाण्याने पुणे-बंगळुरू हा राष्ट्रीय महामार्ग आजही बंद आहे, तर 29 राज्यमार्ग बंद आहेत त्यामुळे शहरात होणारा पुरवठा ठप्प आहे. त्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. पुरामुळे घरातच अडकलेल्या लोकांजवळच जीवनावश्यक वस्तू, दूध, पाणी संपल्याने त्यांचीही गैरसोय होतेय.

नद्यांवरील पंपिंग स्टेशन पाण्यात बुडल्याने शहरासह उपनगरात गेले 5 दिवस पाणीपुरवठा बंद आहे. पाणी ओसरायला आणखी 4 दिवस लागतील असा अंदाज आहे तोपर्यंत पाणीपुरवठा बंद राहिल्याने लोकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर विद्युत पुरवठा खंडित झाल्यानेही गैरसोय होत आहे.

जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शिरोळ तालुक्यामध्ये 30 बोटी पाठविण्यात आल्या असून 151 शिबिरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली.

पाणी ओसरल्यानंतर पडझड झालेल्या घरांचे, जनावरांचे पंचनामे करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. वीज जोडणी करणे, पाणी पुरवठा करणे, जनावरांना चारा पुरवठा करणे याचाही समावेश आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात 69 हजार लिटर पेट्रोल, 31 हजार लिटर डिझेलचा राखीव साठा करण्यात आला आहे. हा साठा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या वाहनांसाठी केला जात आहे. नागरिकांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

दोन दिवसांमध्ये महामार्गावरील पाणी कमी झाल्यानंतर लागलीच इंधन पुरवठा करावा अशा सूचना दिल्या आहेत. पाणी कमी न झाल्यास हवाई मार्गाने इंधन आणण्यात येईल त्याबाबत तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

एलपीजी सिलिंडर पुरवठ्याबाबतही नियोजन करण्यात आलं आहे. महामार्ग सुरु झाल्यानंतर नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध होतील असं नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मोबाईल सेवा कोलमडल्या आहेत त्याबाबतही कंपन्यांना पत्र दिलं आहे. ते ही सुरळीत सुरु होईल. प्राथमिक माहितीनुसार 2 लाख घरांमध्ये विद्युत पुरवठाही बंद आहे. जवळपास 400 पाणी पुरवठा योजना बंद आहेत. याबाबतही सूचना देण्यात आल्या असून त्या ही पूर्ववत होतील, असंही देसाई यांनी म्हटलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)