अझीम प्रेमजी यांचा अमळनेरच्या सर्वसामान्यांना करोडपती बनवणारा तो निर्णय

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी

जळगाव जिल्ह्यात अमळनेर नावचा तालुका आहे. महाराष्ट्रातील एका सर्वसामान्य तालुक्यात सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या अंमळनेरच्या लोकांचं जीवन एका निर्णयामुळे बदललं.

भविष्याचा वेध घेऊन एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचा एक निर्णय कशा प्रकारे आपल्या कुटुंबाच्या भावी पीढीचं भलं करू शकतो. याचं उदाहरण तुम्हाला या गोष्टीतून कळेल.

1985-86 ची गोष्ट आहे. अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात अकाऊंट विषयाचे प्राध्यापक असलेल्या रमेश बहुगुणे यांच्याकडे जमा केलेले 20 हजार रुपये होते. त्यांना हे पैसे कुठेतरी गुंतवायचे होते किंवा सेफ डिपॉझीट करून बँकेत ठेवण्याचा त्यांचा विचार होता.

बहुगुणे सांगतात, "याबाबत सल्ला घेण्यासाठी माझाच एक पूर्वीचा विद्यार्थी सुनील माहेश्वरी यांच्याकडे मी गेलो होतो. सुनीलने मला हे पैसे विप्रोच्या शेअर्समध्ये गुंतवायला सांगितलं. अंमळनेरमध्येच कारखाना असल्यामुळे त्यांना यामध्ये गुंतवणूक करणं धोक्याचं वाटलं नाही."

"अनेकांनी शेअर्स घेतल्याचंसुद्धा माहिती होतं. जमा केलेल्या पैशामध्ये आणखी काही रुपयांची भर टाकून 330 रुपयाला एक असे एकूण 100 शेअर घेतले. नंतर या शेअर्समध्ये वाढ होत बोनस मिळत गेले."

प्रा. बहुगुणे पुढे सांगतात, "एक काळ असा होता की माझ्याकडे 1200 ते 1500 शेअर झाले होते. हळुहळू शेअरची किंमत वाढत गेली. तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत शेअर्सची किंमत वाढत गेली. काही शेअर्स विकून आलेल्या पैशातून मुलाला डॉक्टर बनवलं. आर्थिक चणचणीतून बाहेर पडून मुलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाची सगळी फी भरली. आज माझा मुलगा निखिल अमळनेरमध्ये आपलं 40 बेडचं हॉस्पिटल चालवत आहे."

अझीम प्रेमजी यांच्याबद्दल प्रा. बहुगुणे सांगतात, "विप्रोच्या शेअर्समुळे मला खूप फायदा झाला. मी विचारही केला नव्हता, इतका पैसा मी कमवला. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांच्या दानशूरपणाच्या बातम्या आम्हाला कळल्यानंतर आम्हालाही असं काम करण्याची प्रेरणा मिळाली. मी निवृत्त झाल्यानंतर लोकमान्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं. देशात अनेक श्रीमंत आहेत. पण अझीम प्रेमजी यांच्याइतका उदार अंतःकरणाचा माणूस आतापर्यंत पाहिला नाही."

मुलाकडे कार्यभार

भारताचे दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती अझीम प्रेमजी विप्रोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत. तब्बल 53 वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती घेऊन ते कंपनीचं कामकाज आपला मुलगा रिषद प्रेमजी यांच्याकडे देणार आहेत. 31 जुलै रोजी रिषद आपल्या वडिलांकडून अध्यक्षपदाची जबाबदारी अधिकृतरित्या स्वीकारतील.

कंपनीचे अध्यक्ष म्हणून निवृत्त होत असले तरी 74 वर्षीय अझीम प्रेमजी कंपनीचे संचालक आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून 2024 पर्यंत कार्यरत राहतील. अझीम प्रेमजी यांनी सुरुवातीला तेल आणि साबण बनवण्याचं काम करणाऱ्या आपल्या कंपनीला 1985 च्या दरम्यान आयटी क्षेत्रातही पुढे आणलं. इथूनच विप्रोचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं.

कशी झाली सुरूवात

पत्रकार चंद्रकांत पाटील सांगतात, "1945 मध्ये उद्योजक आणि अझीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद हुसैन हाशम प्रेमजी यांनी वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीची इथं स्थापना केली. या भागात मोठ्या प्रमाणावर भूईमूगाचं उत्पादन होत असल्यामुळे त्यांनी तेल, डालडा इत्यादी वस्तू बनवण्याचा कारखाना सुरू केला."

"मोहम्मद हुसेन प्रेमजी यांचे निधन झाल्यावर वयाच्या 21 व्या वर्षीच अमेरिकेतलं शिक्षण सोडत अझीम प्रेमजी यांच्या हातात धुरा आली. त्यांनी कंपनीचा विस्तार करण्यास सुरुवात केली. अमळनेरच्या उद्योगात त्यांनी 1985 मध्ये बदल केला. तिला ग्लोबल स्वरुप देत आयटी कंपनीत रुपांतर केलं."

"कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले नाव आणि ब्रँडव्हॅल्यू वाढविली. साहजिकच त्यांच्या शेअर्सच्या मूल्यातही वाढ झाली. अंमळनेरवासीयांना हे शेअर्स 100 ते 200 रुपये इतक्या नाममात्र किंमतीत त्यांनी दिले. या शेअर्सधारकांनी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण त्यांनी विकत घेतलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य काही हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे."

मुलगी जन्मली, लग्नाची जबाबदारी अझीमशेठजींची

"विप्रोच्या स्थापनेपासूनच अमळनेरकरांमध्ये विप्रो कंपनीची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. त्यावेळी आमचा तेल, साबण होलसेल विक्रीचा व्यवसाय होता. विप्रोही त्यावेळी साबण तेल, डालडा या वस्तू बनवायचे. विप्रो अतिशय प्रामाणिकपणे काम करत असल्याचं आम्हाला माहीत होतं," असं शेअर ब्रोकींग सल्लागार सुनील माहेश्वरी यांनी सांगितलं.

ते पुढे सांगतात, "अमळनेरमधले अनेकजण या कारखान्यात काम करायचे. त्यांचं व्यवस्थापन आणि कामकाज या गोष्टी सगळ्यांना जवळून माहीत होत्या. अनेकजण तर कंपनीत काम करत होते. त्यामुळे शेअर देत असल्याचं कळाल्यानंतर अनेकांनी ते विकत घेतले. मुलगी जन्मली की तिच्या नावे विप्रोचे शेअर्स घेऊन टाका, तिच्या लग्नाची जबाबदारी अझीम प्रेमजींची असं त्यावेळी अमळनेरमध्ये म्हटलं जायचं.

अंमळनेरचे वेल्थ क्रिएटर

चंद्रकांत पाटील सांगतात "1970 च्या दरम्यान 100 रुपयांना मिळणारे शेअर्स अनेकांनी विकत घेतले. बोनस आणि इतर कारणांमुळे वाढून त्याची किंमत आज सुमारे साडेपाच कोटी झाली आहे. अमळनेरमधल्या बहुतांश रहिवाशांनी त्यांचे शेअर्स विकत घेतले होते. कंपनीच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची हिस्सेदारी अमळनेरकरांची आहे. त्याची किंमत आजघडीला सुमारे 5 हजार कोटी रुपयांइतकी असल्याचा अंदाज आहे."

1971 पासून अनेक वेळा, कंपनीने बोनस शेअर्स जारी केले. प्रत्येक शेअर होल्डरने घेतलेला भाग पुन्हा दुप्पट, तिप्पट केला. त्यामुळे शेअर विकत घेतलेले बहुतांश जण आज करोडपती असल्याचंही पाटील सांगतात.

"अझीम प्रेमजी यांच्यासोबत अमळनेरकरांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांनी कार्यभार घेतला. तेव्हापासून कंपनीने प्रगतीचा उच्चांक गाठला. अझीम प्रेमजी यांच्या दूरदृष्टीमुळेच त्यांनी आयटी क्षेत्रात पाय रोवले. त्या माध्यमातून त्यांनी जगभरात नाव कमावलं."

"त्यांच्या प्रगतीमुळे अमळनेरकरांची प्रगती होत गेली. अझीमशेठ खऱ्या अर्थाने अमळनेरचे वेल्थ क्रिएटर आहेत. रिषद हेसुद्दा अशा प्रकारे कंपनीची जबाबदारी सांभाळतील," असं चंद्रकांत पाटील यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)