स्वाइन फ्लूमुळे महाराष्ट्रात पाच महिन्यात 156 रुग्णांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. स्वाइन फ्लूमुळे पाच महिन्यात 156 रुग्णांचा मृत्यू

जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये राज्यात स्वाइन फ्लूमुळे 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 34 नाशिकचे, पुण्यात 21, नगर जिल्ह्यात 14, कोल्हापूरमध्ये 9, मुंबईत 5 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूचे 908 रुग्ण आढळले असून या दोन महिन्यांमध्ये 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या वर्षी 1 लाख 28 हजार 26 व्यक्तींना फ्लूविरोधी लस दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. डेंगी या आजारामुळे 2016-2018 या काळामध्ये 168 जणांचा मृत्यू झाला. तसंच या कालावधीत हिवतापामुळे 59 जण दगावले असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

2. युद्धनौकेला लागलेल्या आगीमध्ये 1 ठार

माझगाव डॉकमध्ये युद्धनौकेला लागलेल्या आगीत बजेंद्र कुमार या कामगाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी INS विशाखापट्टणम युद्धनौकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डेकवर ही आग लागली होती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

बजेंद्र कुमार कंत्राटी कामगार असल्याची माहिती मिळाली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. लोकमतने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. शिवसेनेला उपसभापतिपद तर काँग्रेसला विरोधीपक्षनेतेपद

विधानसपरिषदेच्या उपसभापतिपदाचा दावा काँग्रेसने मागे घेतला असून प्रशांत परिचारक यांना सभागृहात येण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मान्यता दिली आहे. हे निश्चित झाल्यावर विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेकडे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

उपसभापतिपदाची निवडणूक आणि विरोधी पक्षनेतेपदावरील निवडीची घोषणा सोमवारी केली जाणार आहे. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यावर विरोधी पक्षनेतेपदी निवड करणं आवश्यक होतं.

विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाचा मार्ग मोकळा झाल्याशिवाय विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला जाणार नाही, असं सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेसने विधानपरिषद उपसभापतिपदावरील दावा मागे घेऊन विरोधीपक्षनेतेपद मिळवण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेला हे उपसभापतिपद हवं असल्यास परिचारक यांना असलेला विरोध मागे घेण्याचं आवाहन शिवसेनेला करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसनेही परिचारक यांना असलेला विरोध मागे घेतला.

4. GST भरण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवली

शुक्रवारी झालेल्या GST काउन्सिलच्या 35व्या बैठकीत GSTचा वार्षिक परतावा भरण्यासाठी मुदत 2 महिन्यांनी वाढवण्यात आली. आता हा परतावा 31 ऑगस्टपर्यंत भरता येणार आहे.

GST परतावा भरण्यासाठी एकाच अर्जाची पद्धती 1 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात येणार आहे.

GST काउन्सिलमध्ये सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात. या बैठकीचं नेतृत्व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं.

नॅशनल अँटी प्रॉफिटीअरिंग अथॉरिटीची मुदत दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेने प्रसिद्ध केलं आहे.

5. मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, अमरावती या चार जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंततर भीतीचे वातावरण पसरले. भूकंपामुळे काही घरांवरील पत्रे कोसळले असून भिंतींना तडे गेल्याची माहिती मिळत आहे. किनवट तालुक्यातील दहा घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सदोबा-सावळीपासून काही अंतरावर असलेल्या चिंचबर्डी, बारभाई, इचोरा, माळेगाव, वरुड-उमरी या गावात तसेच महागाव तालुक्यातही धक्के जाणवले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)