आंतरराष्ट्रीय योग दिवस: योगा करणाऱ्या श्वान पथकावर राहुल गांधींचं ट्वीट, वादाला फुटलं तोंड

21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतात अनेक ठिकाणी योगाची प्रात्यक्षिकं झाली. देशभरात विविध संस्थांनी योगाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. भारतीय लष्कराच्या श्वान पथकाने सुद्धा योग दिन साजरा केला.

लष्कराच्या प्रवक्त्यांनी योग दिनाच्या कार्यक्रमाची छायाचित्रं शेअर केली. त्यात लष्करातील जवानांबरोबरच लष्कराचे श्वानही योगा करताना दिसत आहेत. राहुल गांधींनी ही छायाचित्र आपल्या ट्विटरवरून शेअर केली आणि 'न्यू इंडिया' असं कॅप्शन दिलं.

त्यांनी हे फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या टाइम लाइनवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोक म्हणत आहेत की 'जर श्वानही या कार्यक्रमात सहभागी झाले तर बिघडलं कुठे. उलट हा फोटो तर क्युट आहे.' पण काही लोकांनी मात्र राहुल गांधींचं समर्थन करत म्हटलं आहे की 'त्यांच्याकडून योगा करून घेण्याचा नेमका उद्देश तरी काय आहे.'

राहुल गांधी यांच्या ट्वीटला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी लष्कराचा अवमान केल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 'आपलं लष्कर सदैव आपलं रक्षण करत असतं. त्यांचा जे कोणी अपमान करतील देव त्यांना सद्बुद्धी देवो अशी मी प्रार्थना करतो,' असं राजनाथ सिंह म्हणाले.

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रिपल तलाकवरून संसदेत जे सत्र झालं त्यावेळी काँग्रेसची नकारत्मकता दिसली आणि आता ते आपल्या लष्कराची खिल्ली उडवत आहेत असं ट्वीट शहा यांनी केलं.

बॉर्डर सेक्युरिटी फोर्सने देखील त्यांच्या श्वान पथकासोबत योगा करतानाचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हीडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

भारताच्या आर्मी युनिटचं छायाचित्र युनायटेड नेशन्सनेही शेअर केलं आहे. मानवाचा सर्वांत निकटचा मित्र असलेले श्वानही योगा करण्यात पाठीमागं नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)